गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

लेख (२१) २४ नोव्हेंबर २०२२

 शेषन निर्माण होण्यास यांचाच मज्जाव.

दिनांक २४ नोव्हेंबर २२ मधील संपादकीय लेखात सरकारच्या निवडणूक आयुक्त नियुक्ती संबंधी केंद्राचे वाभाडे काढले आहेत. शेषन यांची तत्कालीन प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या कार्यकालात डिसेंबर ९० मध्ये नियुक्ती आणि नरसिंह राव सरकारच्या ९६ पर्यंत केलेले पूर्ण कार्य हे अधोरेखित करावेसे वाटते. दोन्हीही पंतप्रधानांच्या काळात शेषन यांना स्वतःच्या शैलीत नियमांच्या आधारे कार्य करण्यास संधी मिळाली.  

जी काम करण्याची संधी शेषन यांना देण्यास नरसिंह राव सरकारने उदारता दाखविली कोणतेही राजकारण केले नाही, तशी संधी देशातील होऊन गेलेल्या १४ पंतप्रधान (चंद्रशेखर आणि नरसिंह राव सोडून) अथवा सर्वच राज्यातील शंभराच्या वर होऊन गेलेले मुख्यमंत्री यांनी दाखविली असती तर आज कायदा सुव्यवस्था, प्रशासन निष्पक्ष पणे कार्यरत राहून, बेताल वाचाळता, भ्रष्टाचार, कामातील दिरंगाई , प्रत्येक गोष्टीत कोर्टबजी, याचे प्रमाण शून्यावर तरी आले असते. 

आज, आय ए एस, आय पी एस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयास दाबून ठेवले जाते, जनतेच्या आडून त्यांना आव्हान देण्यात येऊन त्यांची त्वरीत बदली केली जाते. कायदा सुव्यवस्था प्रशासना ऐवजी पक्ष संघटना, गटबाजी महत्वाची वाटते. शेषन यांच्या कार्यकाळात त्यांना कोणतीही आडकाठी न आणणारे नेते इतिहासातील किंवा परदेशातील नसून गेल्या तीस वर्षातील आपल्याच देशातील आहेत हे यांना अवगत नसावे. हाच अनुभव पाठीशी घेऊन विद्यमान सरकार आणि साऱ्या राज्य सरकारांनी प्रशासन सुधारावे, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना काम करण्याची थोडीशी उसंत दिली संधी दिली तर , अधिकाऱ्यांच्या नियुक्ती साठी कोर्टात जायची वेळ येणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे कोरडे खायची वेळ येणार नाही. 

 

विजय आप्पा वाणी, पनवेल

मन

माणसांप्रमाणे वागा सारे काही मनावर आहे; मनातील शक्तीवर आहे। बाह्य जगाला आपणच शक्ती देत असतो. शक्तीचा साठा आपल्या मनात आहे. बाहेरच्या जगाने कितीही ऐट मारली तरी ती पोकळ आहे. बाह्य जग हे आपल्या मनाचे खेळणे आहे. आपल्या मनातील विचारांचेच बाह्य जग हे प्रतिबिंब आहे. “आपली आजची जी स्थिती आहे, ती आपल्या विचारांचे फळ आहे, आपल्या चिंतनाचा तो परिणाम आहे.” “विचार आपणांस आकार देत असतात, रंगरूप देत असतात. जीवनाची सारी इमारत मनातील विचारांवर उभारलेली असते.”असे आहे म्हणूनच जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे. आपले मन कार्य करण्यास सदैव सज्ज असले पाहिजे. जे काम करावयाचे असेल ते छोटे असो वा मोठे असो; केव्हाही मन इच्छाशक्तीच्या हुकमतीखाली राहिले पाहिजे व त्याला हाक मारताच त्या त्या कर्मात रंगले पाहिजे। कोणताही प्रश्न असो, त्यात खोल दृष्टी पोचवण्यास मन समर्थ पाहिजे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मनाला नीट देता आले पाहिजे. मन दुबळे होऊन मात्र चालणार नाही. पोटाची उपासमार झाली तरी होऊ दे., परंतु मनाची होता कामा नये. शरीर दुबळे झाले तरी होवो, परंतु मन खंबीर राहो. योग्य व तेजस्वी शिक्षण मिळालेच पाहिजे. मनाला भरपूर खाद्य, पोटभर भाकरी मिळालीच पाहिजे.तुम्ही कोणता विषय शिकता, ही गोष्ट महत्त्वाची नाही. प्रश्न आहे तो मनाचा आहे. जो विषय अभ्यासिलात, त्या विषयाच्या अध्ययनाने मनाला कोणते सामर्थ्य मिळाले, किती शक्ती मिळाली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बाहेरचे तंत्र, बाहेरची कवाईत काहीही असो; बौध्दिक सामर्थ्य त्यामुळे नीट पुष्ट झाले पाहिजे. दोन मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. 
(१) ज्या विशिष्ट साधनांचा आपण उपयोग करू ती साधने. 
(२) ज्या मानसिक शक्तीने आपण ती ती साधने, ते ते विषय पकडतो त्या मानसिक शक्तीचे शिक्षण. तरवारीचा परिचय असणे हे नि:संशय चांगले आहे; परंतु बाहूंत सामर्थ्य असणे ही त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही संस्कृत शिका की इंग्रजी शिका; काव्य शिका किंवा इतिहास शिका; शास्त्र शिका किंवा धंदेशिक्षण घ्या; ह्या निरनिराळ्या साधनांनी मन तयार होत असते. हे निरनिराळे खेळ खेळून मनाची शक्ती कमवायची असते. आपणांस शक्ती पाहिजे आहे. विचाराची शक्ती, एकाग्रतेची शक्ती. एकाग्रतेच्या अभ्यासाने विचारशक्तीच मिळत असते. आपणास कधी काळी जर समाधीचा अनुभव आला, तर तिचाही हाच अर्थ आहे, असे कळून येईल. प्रार्थना, पूजा, जपजाप्य, पुनश्चरणे- सर्व साधनांचा हाच एक हेतू असे. मनाला ताब्यात ठेवण्याची पराकाष्ठेची निग्रहशक्ती मिळविणे हाच हेतू असे. उद्योग चालू दे, अभ्यास सुरू असू दे. यत्नदेवो भव. ढिलाई नको. शिथिलता नको. असे करीत राहिलेत म्हणजे गेलेले स्वत्व एक दिवस तुम्ही मिळवून घ्याल. वेळ काही अजून गेली नाही. आपण आपली श्रेष्ठता प्रकट केली पाहिजे. तिचा कोंडमारा करता कामा नये. आपण आपल्या श्रेष्ठतेचे समर्थन केले पाहिजे. आत्मसंयमन करा व नीट ध्येय पाहून पुढे चला. स्वत:ला गती द्या. प्रत्येक साधनाचा उपयोग करा. कोणताही उपाय वगळू नका. प्रयत्नांची शर्थ करा, जिवाचे रान करा, रक्ताचे पाणी करा, ह्या जागतिक स्पर्धेत, प्रत्येक गोष्टीत पुढे या, प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला चीत करीन, मागे टाकीन, अशी हिंमत बाळगून पुढे या. अर्वाचीन शास्त्रीय ज्ञान - ते इतरांच्या इतकेच आपलेही आहे- करा तर ते आपलेसे. सत्याचा शोध नाना रूपांनी करावयास आपणही सुसज्ज झाले पाहिजे; आपल्यासाठी भाग्य उभे आहे, मानसन्मान उभे आहेत। नवीन नवीन अपरिचित अशाही कर्मक्षेत्रांत व ज्ञानक्षेत्रांत घुसून तेथेही पूजार्ह आपण होऊ या. सामुदायिक जाणीव, सामुदायिक सामाजिक व्यक्तित्व होय, ह्या गोष्टीही आपल्याजवळ आहेत. सारे काही आपणाजवळ आहे. फक्त नवीन कार्यक्षेत्रात नवीन रूपाने त्यांचा आविष्कार करावयाचा आहे एवढेच. सामाजिक कार्य करण्याची आवड, त्यागाची वृत्ती- यांना आपण काही पारखे नाही.वरच्या शब्दांनी दिग्दर्शित झालेले ध्येय गाठण्यासाठी, सर्वांगीण शिक्षणासाठी आपण अहोरात्र धडपडले पाहिजे. कोंडलेला मनुष्य शुध्द हवेसाठी, दुष्काळात सापडलेला अन्नासाठी, तहानलेला पाण्यासाठी, त्याप्रमाणे आपण नवीन ज्ञानासाठी, नवीन अनुभवासाठी आतुर व उत्कंठित झाले पाहिजे. जागतिक स्पर्धेत नीट टक्कर देता यावी म्हणून सर्व साधने प्रथम हस्तगत करून घेऊ या. आणि मग अर्वाचीन सुधारणेच्या सर्व कसोटयांचा प्रकाश जरी आपल्यावर सोडण्यात आला, तरी आपण दिपावून जाणार नाही. हे अर्वाचीन संस्कृती ! 

त्यागवृत्ती समाजात निरनिराळ्या विशिष्ट भलभलत्याच चुकीच्या कल्पना व भलभलतेच विचार रूढ होत असतात. त्या त्या काळात अशा भ्रामक कल्पना आपणास नेहमी दिसून येतील. आजच्या काळातील लोकांचीही अशीच एक चुकीची दृष्टी बनली आहे. आज कोणाला काहीही करावयास सांगा, एखादे नवीन तत्त्व सांगा, एखादा नवीन विचार सांगा, एखादे नवीन स्वदेशीचे व्रत, एखादा नवीन आचार सांगा, - की लगेच ते विचारतील, “यापासून लभ्यांश कोणता ? आमचा फायदा काय होईल ? किती होईल ?” स्वत:चा फायदा हेच व्यक्तीचे नेहमी उद्दिष्ट दिसून येत असते. अमक्या अमक्या तर्‍हेने वागल्यास, काही ठराविक मुदतीत तुमचा अमुक फायदा होईल, असे सांगितले तर लगेच तसे करावयास माणसे तयार होतात. फायदा होणार असेल तरच करणे योग्य, नाहीतर अयोग्य - असे आजचे योग्यायोग्यतेचे बाजारी माप आहे.व्यक्ती या शब्दांतील अर्थ विशाल असेल तर हरकत नाही. ‘आमचा फायदा काय,’ असे विचारताना, ‘आमचा’ हा जो शब्द त्यात सर्व समाज, सारे राष्ट्र येत असेल, तर हरकत नाही. ‘फायदा’ हा जो शब्द त्याचा अर्थही विशाल असेल, केवळ चार दिडक्या एवढाच नसेल तरीही हरकत नाही. परंतु असा विशाल अर्थ घेण्यास मनुष्य तयार नसतो. अशी ही विशाल दृष्टीच कोणाला मुळी नसते. ‘चांगले कर’ असे सांगताच, फायदा काय असे विचारतात. परंतु स्वत: वाटेल तसे रोज वागतात, त्या वेळेसही ‘असे केल्याने फायदा काय,’ असे जर स्वत:ला विचारतील तर किती छान होईल मानवी ज्ञानात जी जी मौल्यवान् भर पडली, जो जो प्रत्येक नवीन शोध लागला, नवीन शोध मिळाला, त्या सर्वांच्या मुळाशी त्याग आहे। जे जे नवीन तत्त्व सापडले, जी जी नवीन सिध्दी मिळाली, त्या सर्वांच्या मुळाशी यज्ञ आहे. मानवजातीचा इतिहास ही गोष्ट निरपवाद शतमुखांनी सांगत आहे. “त्यागेन एकेक अमृतत्वमानशु ।” ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या स्वार्थावर पाणी सोडले, मानवजातीच्या कल्याणासाठी अहोरात्र अखंड श्रम करण्यातच ज्यांनी जीवनाची सफलता मानली, अशा व्यक्तींकडूनच ज्ञान संवर्धिले गेले, सत्य प्रकट केले गेले. भारतवर्षात आपण असे चटकन् म्हणायचा संभव आहे, की त्याग फक्त संन्याशाने करावा !परंतु प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कार्यात संन्याशी लागत असतात, ही नवीन गोष्ट आज आपणास शिकावयाची आहे. समाजाच्या नानविध क्षेत्रांत संन्यास आज वावरू लागला पाहिजे; त्याची सर्वत्र जरूरी आहे. ज्या कामात संन्यास नाही, ज्या वर्गात संन्यास नाही, तेथे तेज चढत नाही। कोणतेही हाती घेतलेले कार्य हे नेहमीच आरंभापासूनच फायदेशीर होऊ लागते असे नाही। फारच थोड्या गोष्टी अथपासून इतिपर्यंत पैसे देणार्‍या असतात- फायदा करून देणार्‍या असतात. उदाहरणार्थ, समाजाच्या हिताच्या दृष्टीने शिक्षणाइतके महत्त्वाचे दुसरे काही नाही. ज्या चळवळीत त्याग नाही, ज्या चळवळीच्या मुळाशी त्यागाची आध्यात्मिक शक्ती नाही, ज्या चळवळीत संन्याशाचे धगधगीत तेज नाही; त्या चळवळीची कोणासही भीती वाटावयास नको। परंतु त्यागावर उभारलेली चळवळ, फकिरांनी चालविलेली चळवळ ही विश्वाला गदागदा हलवील. या अशा संन्याशाच्या मनात समाजाच्या हिताची व कल्याणाची कल्पना सदैव जागृत असते. ज्या ज्या वेळेस नवीन संबंधाचे नवीन स्वरूप दाखवले जाते, त्या त्या वेळेस नवीन युगाचा उदय होत असतो, नवती मनूचा आरंभ होत असतो। “ज्याला भय नाही व इच्छा नाही असा जो निरिच्छ, नि:स्पृह, निर्भय पुरुष, तोच संन्यासी.” संन्याशाच्या वेशाने नटलेला, गेरूचा रंग दिलेला, भगवा पोषाख केलेला नव्हे; तर अंतरी त्यागाने रंगलेला संन्यासी वेषाचा नव्हे, तर संन्यस्तवृत्तीचा. ज्याला भय नाही. आशा-कामना नाहीत; आजच्या पराजयांतूनही भावी पिढीला दिव्य विजय मिळेल या आशेने व श्रध्देने आजचे पराजयही स्वीकारावयास सज्ज असलेला; स्वत:च्या कामावाचून दुसरे ज्याला घर नाही; नि:स्वार्थ हेतूशिवाय अन्य ज्याची मालमत्ता नाही; जे ध्येय त्याला स्वत:ला दिसत असते व ज्याच्यासाठी तो स्वत:चे रक्त सांडीत असतो, जिवाचे रान करीत असतो, ‘ते ध्येय माझ्या इतर बंधूंच्याही दृष्टिपथात मी आणीन, त्यांनाही ते अनुभवयास व पूजावयास लावीन,’ या विचाराशिवाय, या आशेशिवाय ज्याला अन्य कसली आशा नसते;

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

लेख १९

 इथे मराठीयांचे सरदार कोलमडले 

सकाळ बिट्वीन द लाइन्स विपरीत बुद्धी - श्री प्रफुल्ल फडके यांचा अतिशय सविस्तर आणि धक्कादायक माहिती देणारा लेख वाचला. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळानंतरही काँग्रेसजनांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची कायम उपेक्षा आणि अवहेलना केली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अगणित वीरांनी आपापल्या परीने कष्ट घेतलेत, वीरमरण पत्करले. पण काँग्रेसच्या लेखी काँग्रेसच्याच समूहात, जथ्यात , अधिपत्यात राहणाऱ्या , विचारांशी बांधिलकी असणाऱ्यांना मान सन्मान दिला. स्वातंत्र्य मिळाल्यावर पाठ्यपुस्तके द्वारा, प्रसिद्धी माध्यमांद्वारे त्याचा पुनरुच्चार केला. पण स्वा. सावरकरांच्या विषयी ओकली जाणारी गरळ मळमळ या काळातच का येत आहे, त्याचे समर्पक मत, लेखकाने मांडले आहे, पटते आहे. आपण साऱ्यांनी एकलेले वाचलेले अनुभवलेले स्वातंत्र्यवीर आणि अशी गरळ ओकणारी विषवल्ली ऐकली का तळपायाची आग मस्तकात जाते. त्यात सांसद, विधायक, प्रदेशाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष राहिलेले आणि महाराष्ट्राचेच नाना? पटोले यास दुजोरा देतात, कुठे गहाण ठेवली आहे यांनी स्वतःची आत्मियता स्वाभिमान, त्यांची री ओढणारे , अशा वेळेस गप्प राहणारे राज्याचे सर्व सर्वा जाणते राजे आणि त्यांचे सरदार, कुठे ठेवली यांनी राज्याची अस्मिता आणि कायम टोमणे मारणारे मराठीयांची मक्तेदारी घेतलेले यांचे वारसदार गळा भेट घेऊन कमरेत वाकतायेत , जोडो का फोडो यात्रा करतायेत, या अंजन घालणाऱ्या बिट्वीन द लाइन्स लेखाचे त्यांनी पुन्हा पुन्हा वाचन करावे आणि त्यांना भारतरत्न मिळवून द्या आणि आम्हालाही द्या अशा, स्वा सावरकरांच्या सदना शेजारीच आपण दसरा मेेळावे घ्यावेत, कितपत मनाला पटते.

विजय आप्पा वाणी, पनवेल 

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

लेख १८ (प्रसिद्धी लोकसत्ता १२ नोव्हेंबर २२)


 रोजगार संधीचा बुडबुडा.


शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २२ "बडबडे बुडबुडे" संपादकीय लेखात आय टी संबधित क्षेत्रातील कंपन्यांच्या मनुष्य बळ कपाती विषयी भाष्य केले आहे. यातील अंतिम परिच्छेद अत्यंत महत्वाचा आहे. अधिकाधिक रोजगारक्षम उद्योग, कारखानदारी, कृषी क्षेत्राला प्राधान्य, या सेवांमध्ये मनुष्यबळ , रोजगार उपलब्ध होण्याची संधी जास्त प्रमाणात असते. देशाची आर्थिक स्थिती, कोरोनाची कारणे, रशिया युक्रेन युद्धामुळे वाढलेले तेलाचे भाव, साऱ्यांचा विचार बाजूला ठेवून, महाराष्ट्राचा विचार (एमपीएससी अभ्यासक्रम नुसार) केल्यास १० ते ११ कोटी लोकसंख्येत, २५ टक्के विद्यार्थी, २५ टक्के निवृत्त आणि वयस्क धरल्यास, उर्वरित ५० टक्के म्हणजे ५ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध असावयास हवा. त्यापैकी २० टक्के म्हणजे २ कोटी शेतकरी, २० टक्के म्हणजे २ कोटी व्यापार रोजंदारी किरकोळ फेरीवाले, २.५ टक्के म्हणजे २५ लक्ष सर्व शाळा महाविद्यालय बँका राज्य आणि केंद्र शासकीय निमशासकीय आस्थापना, खाजगी कंपन्या, कारखाने इत्यादी विभागला गेला. तरीपण उर्वरित ७.५ टक्के म्हणजे ७५ लक्ष कशातही न मोडणारा वर्ग आहे, ज्यास रोजगार साधनं उपलब्ध नाही. याचाच अर्थ महाराष्ट्र राज्याचे उदाहरणात साधारणतः ७५ लक्ष आणि अधिक बेरोजगारी समस्या कायम रहात आहे. यासाठीचे नियोजन आयोजन वर्षानुवर्षे अपुरे राहिले आहे. राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यातील एमआयडीसी, आयटी पार्क, सेझ, टेक्स्टटाईल्स पार्क, यांच्या ४० हजाराच्या वर छोट्या मोठ्या कारखान्यात १० लक्ष रोजगार उपलब्ध आहे. गेल्या ५० वर्षातील कापड गिरणी, हातमाग, सुत गिरणी, साखर कारखाने, सिमेंट कारखाने, यांची आजची स्थिती समाधानकारक नसून वाईट आर्थिक अवस्थेत आहेत. या सर्व कारखान्यांची डागडुजी, आर्थिक बळ देऊन नूतनीकरण आणि गुंतवणूकीद्वारे येणारे नवीन प्रकल्प यांचा ताळमेळ साधला तर लोकसंख्येच्या गणितात कमीतकमी ५ टक्के रोजगार संधी उपलब्धता करता येईल. त्याप्रमाणेच कृषी क्षेत्रात छोट्या शेतकऱ्यांसाठी स्थानिक पातळीवर कॉन्ट्रॅक्ट शेतीचा पर्याय स्वीकारून नांगरणी ते पीक विक्री करण्याची व्यवस्था निर्माण करून, एक ठराविक उत्पन्न शेतकऱ्यास मिळेल जेणेकरून कर्ज घेण्याची वृत्ती कमी होऊन स्थिरता प्राप्त होईल. या रोजगार उपलब्धतेवर, लोकांची क्रय शक्ती वाढून पुढची निवास, व्यापार, मनोरंजन, प्रवास,या क्षेत्राची अर्थ व्यवस्था हळू हळू मजबूत होण्यास विलंब लागणार नाही. कारण आयटी क्षेत्रातील दोलायमान परिस्थिती , मध्येच बंद होणारे स्टार्ट अप किंवा राजकीय इर्षेपोटी कागदावर घोषणा केलेले प्रकल्प असो, येत राहतील आणि मोडीत कधी निघतील पत्ता लागत नाही. पण रोजगार निर्मितीत अस्थिरता निर्माण होते. कायमचा रोजगार निर्मिती साठी, सत्ताधाऱ्यांकडून इच्छा शक्ती हवी, अभ्यासपूर्ण नियोजन हवे, अर्थात सत्ता सरकारकडे तेवढा कालावधी हवा हे ही महत्वाचे आहे, म्हणजे मग रोजगार संधीचा बुडबुडा न तुटता फुटता राहील, त्यामुळे राज्याची स्थिती सुधारली तरच देशाची सुधारेल. 


विजय आप्पा वाणी, पनवेल 

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

लेख ५ (सर्व वृत्तपत्र ८ नोव्हेंबर)


लोकमत १४ नोव्हेंबर २०२२.
उद्वेग आणणाऱ्या जनांचे काय करावे. 

राज्यातली गुंतवणूक गेली, पक्ष चिन्ह गोठविले, पुल दुर्घटना, एमसीए क्रिकेट निवडणूक, महिला पत्रकाराची कुंकू टिकली, हिमाचल गुजरात निवडणूक घोषणा आधी का नंतर का, महिला खासदारांविषयी असभ्य अर्वाच्य भाषा, ऐतिहासिक चित्रपटात लिखाणावरून छत्रपतींचे वारसदार त्रस्त, राजकीय वारसदारांनी हर हर महादेव शो थांबविले, २४ तासात कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट रद्द, यात्रा थांबवून दाखवा, या आणि अनेक मनास उद्वेग आणणाऱ्या बातम्या मागच्या आठवड्यात आणि विशेषतः सोमवार, मंगळवारच्या वृत्तपत्रात वाचावयास मिळाल्यात. खरचं असेच चित्र आहे का राज्यात, काहीच सकारात्मक घडत नाही का?  

गेले कित्येक महिने सारे वृत्तपत्र, साऱ्या चित्रवाहिन्यावर हेच चित्र दिसत आहे. कंटाळा आणलाय यांच्या वागण्याने. एकही गोष्ट चांगल्या नजरेने बघितली जात नाही. काही घडले , काही केले तर त्याच्या दुसऱ्या बाजुत वाईटच दडले आहे आणि ते इतके ठासून वाजवून सांगितले जाते आणि बिंबविले जाते. साऱ्याच वृत्तपत्र / चित्रवाणी माध्यमातून यावर ताशेरे ओढले जातात, परंतु कुणीही ऐकण्याच्या मुड मध्ये नाही. प्रत्येक क्षेत्रातील वृत्तावर सारेच तज्ञ आहेत. अगदी अमेरिकेच्या मंगळावरील यानावर सुद्धा कमेंट्स करण्याचा यांना अधिकार आहे, तर त्यापुढे देशाची अर्थव्यवस्था, जिडीपी, जीएसटी, न्यायाधीशांचे निकाल, निवडणूक आयुक्तांचे अधिकार ते कुणास एक्स, वाय , झेड सिक्युरिटी काढणे पुरविणे, निष्ठावान का गद्दार, पूर्वीचे वैरी गळ्यातले ताईत बनणारे, हेच या साऱ्या विषयांचे तज्ञ हिरहिरीने किंचाळत, केकटून बाईट्स देण्यास तयारच असतात. निवडणूक राजकीय विषेतज्ञ असा आविर्भाव आणतात की यांना प्रत्येक मतदार संघाचे, राजकीय पक्षाचे ज्ञान आहे, पणं निकालानंतर हे सारेच गायब होतात आणि हे असे होणारच होते अशी पुष्टी जोडायला देखील यांना कमीपणा वाटत नाही. यांना ऐन केन प्रकरण प्रसिद्धी हवी असते. 

यात खरे हेच असते की प्रत्यक्ष काम करणारे , चांगले काम करणारे , कृती करणारे एक दोन जणच असतात, पणं त्यांच्या या कृतीवर तुटून पडणारे असंख्य असतात. त्यामुळे या अनेकांच्या प्रहाराने सकारात्मक विषय सुद्धा , नकारात्मक होऊन डोक्यात भिनला जातो आणि खरोखर वाचनीय, कौतुक वाटणाऱ्या वृत्तांवर अक्षरशः पांघरूण घातले जाते. त्यामुळे खरोखरचं वृत्तपत्र वाचन, टिव्ही वरील २४ तास चालणाऱ्या बातम्या पाहण्याचा उबग आला आहे. वृत्तपत्रातील स्तंभलेख, अग्रलेख, विचारवंतांचे लेख वा एखाद्या पुस्तकाचे परीक्षण एवढेच वाचावेसे वाटते आणि टिव्हीवर देखील २४ तास चालणाऱ्या बातम्या, सूनांच्या भांडणा व्यतिरिक्त, संतांच्या सिरीयल आणि कॉमेडी शो अगदी बिग बॉस सुद्धा बघावेसे वाटतात. 

या साऱ्या घडामोडींचा परामर्श घेणाऱ्या तज्ञ , जाणकारांना सुद्धा याची जाणीव होत आहे पणं हि मंडळी, या साऱ्यांपुढे हतबल आहेत, असमर्थ आहेत कारण त्यांनाही इतका उबग आला आहे यांचा, कारण या कमेंट्स वाचाळ विरानी , एलान मस्कच्या ट्विटरच्या संबधित सुद्धा ताशेरे ओढले आहेत की ज्यांना एकूण व्यवहारात किती शून्य आहेत हे सुध्दा सांगता येणार नाही. कुणी थांबवू शकते का हे, सगळ्याच विषयांवर साऱ्यांचेच कमेंट्स करणे. सामान्यांना अभिप्रेत आहे आपआपल्या क्षेत्रात असलेल्या विषयांवर मर्यादित कमेंट्स , टीका टिप्पणी करणे. पण दुर्दैव आहे याला आता पायाबंद घालणं मुश्किल होऊन बसले आहे. या साऱ्यांना वृत्तपत्र चित्रवाणी माध्यमांनी, व्यक्त होण्यास संधी दिली नाही तरी, हे कमेंट्स महाशय व्हॉट्सॲप, एफ बी, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल साईट्स वर मुक्तपणे व्यक्त होतील आणि वादांची परंपरा चालूच ठेवतील. मरण हे सामान्य वाचकांचे वेळ काढून टिव्ही पाहणाऱ्यांच्या नशीबी आले आहे आणि हेच सांगणे आम्हा साऱ्यांचे आहे.

विजय आप्पा वाणी, पनवेल 

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

लेख १६ (सकाळ ४ नोव्हेंबर २२)

 परिवर्तन का तीन दशके सत्ता टिकविणे

आजच्या ४ नोव्हेंबर सकाळ आवृत्तीत दांडिया आणि भांगडा अग्रलेख वाचला. १९९५ ते आजतागायत गुजरात राज्यात एकच पक्षाची सत्ता आहे आणि आजही सदर पक्ष या निवडणुकीसाठी सुद्धा वरचढ दाखविण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील नेते सत्तेत केंद्रात प्रमुख असले तरीही या मातब्बर पक्षास गुजरात राज्याची निवडणूक सहजासहजी सोप्पी राहिली नाही.  

पारंपरिक विरोधी पक्ष काँग्रेस कडे नेतृत्वाचा अभाव दिसत असला तरी भारत जोडो यात्रा आणि श्री खरगे यांची पक्षाध्यक्षापदी झालेली निवड यामुळे नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसच्या प्रचाराच्या आघाडीत श्री खरगे, श्री राहुल गांधी यांनी जोमाने प्रचार केला तर काँग्रेसकडे गेल्या निवडणुकीत मिळविलेल्या जागात नक्कीच भर पडेल. दुसरा प्रबळ दावेदार आप पक्ष श्री केजरीवाल यांच्या प्रयत्नाने निवडणूक घोषणे पूर्वीपासून गुजरात राज्यात क्रियाशील आहे. पद्धतशीर पणें प्रचाराचे

नियोजन, गोबेल्स निती वापरून सारखे सारखे नवीन विषय घोषित करून मतदारांपुढे येण्याचे धारिष्ट्य , मुख्यमंत्री पदाचे नाव घोषित करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. आप ने ही सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न निर्माण करून प्रमुख विरोधी पक्ष होण्याइतके प्रबळ दावेदार होतील निर्विवाद सत्य आहे. 

यात महत्वाचा मुद्दा आहे परिवर्तन, १९९५ पासून तब्बल २७ वर्षे एकाच पक्षाची सत्ता उलथवून टाकण्याचे तंत्र श्री केजरीवाल यांना उमगले आहे. गुजराती भाषेतून सवांद, मोफत वीज, मोफत शाळा आणि सत्ता मिळविणे हेच लक्ष मानून, दोन्ही विरोधकांवर सौम्य शब्दात टिका, त्यामुळे विरोधकांना यांना शिंगावर घेण्यास मुद्देच उरत नाहीत. यामुळे श्री केजरीवाल, साऱ्यांच्या पसंतीस उतरतील हे नक्कीच. 

पारंरिक सत्तेला कौल का परिवर्तन ते ही दोन राज्यातील सत्ताधीशांना (आप आणि काँग्रेस) यांना संधी, हे चित्र येत्या महिना अखेरीस नक्कीच स्पष्ट होईल. पण निवडणूक घोषित झाल्यापासून सत्ताधाऱ्यांना घाम फुटला आहे हे नक्कीच. 


विजय आप्पा वाणी, पनवेल, (हल्ली मुक्काम फ्रँकफर्ट )


गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

लेख १५ (लोकसत्ता- विचार स्तंभ)

दिनांक २ नोव्हेंबर आजचा विचार मधील "सर्वस्व गमावले आता विचार स्व चा" स्विसएड या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जून ते सप्टेंबर या महिन्यातील कोविड मूळे पतींचे निधन झालेल्या स्त्रियांच्या सद्य परिस्थितीचा अभ्यास सादर केला आहे. ह्या गंभीर आणि अतिशय नाजूक विषयाचा विचार करणे, त्यासंबंधी सर्वेक्षण करून माहिती जमा करणे आणि मिळविलेल्या माहिती आधारे प्रत्येक घटकाचा अनेक मुल्यांकांवर अभ्यास करून विचार सादर करणे असे प्रचंड मेहनत असलेले वंदन करण्या सारखे कार्य यांनी केले आहे.  

खरे म्हणजे कोणतीही आपत्ती, घटना एखाद्या गावात, जिल्ह्यात, राज्यात घडली असता संबधित शासन यंत्रणेद्वारे अशा घटना पुन्हा घडू नये किंवा घडल्यास त्याचे कमीतकमी परिणाम व्हावेत त्या संबंधी उपाय योजना कराव्यात. त्यातही या घटना घडल्यानंतर , आपत्ती धारकांचे निवारण करण्याची जबाबदारी सुद्धा शासनाची आहे. परंतु घटना घडणे, मंत्र्यांचे दौरे होणे, तात्काळ मदत जाहीर करणे, चौकशीचे आदेश देणे, पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योजना जाहीर करणे अशा अनेक चक्रांमधून सदर घटना महिना न महिना जातो आणि सर्व बासनात गुंडाळून जाऊन पुन्हा पुढची घटना घडते आणि पुन्हा तेच सारे चित्र निर्माण होते.  

विचारवंतांच्या माध्यमातून अनेक एन जी ओ म्हणून कार्य करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या आहेत. त्यांच्याकडे अपुरी आर्थिक स्थिती आणि अपुरे मनुष्यबळ असूनही वाखाणण्याजोगे कार्य अशा संस्थे द्वारे उभे केले जाते. सत्ताधारी , शासनाद्वारे अशा संस्थाचा गौरव देखील होत नाही, त्यासाठी वृत्तपत्र माध्यम दखल घेऊन सणासुदीचा प्रसंग पाहून यांचा सन्मान करीत असतात. 

असेच कार्य स्विसएड या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. निवडक स्त्रियांचा अनेक मुद्द्यांचा निकषावर अभ्यास केला, त्याचा सारांश केला आणि प्रत्यक्ष शासकीय मदत, प्रत्यक्ष उभे राहण्याची जिद्द कशी निर्माण होईल याचे पायरी पायरीने नियोजन केले आहे. प्रत्यक्ष शासनाच्या सेवेत असणाऱ्या, अशा प्रकारच्या कामाची जबाबदारी असणाऱ्या , ग्रामसेवक , तल्हाटी, जिल्हाधिकारी, सचिव तसेच यांच्यासह राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या, पंचायत सदस्य, आमदार ते खासदार ते मंत्री यांच्या कुणातही असे नियोजनपूर्वक, अभ्यासपूर्वक कार्य करण्याची इच्छा नाही का ते विचारच करू शकत नाही.  


या शिवाय सदर छापून आलेला लेख आणि स्विसएड संस्थेने केलेल्या अभ्यासाचे , नीट वाचन जरी केले आणि प्रत्येक घटकाने आपल्या परीने गाव पातळीवर सरपंच, जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, पालक मंत्री, संबधित खाते मंत्री , एक एक प्रश्न सोडविण्याचा विचार करून जरी अमलात आणला तरी स्विसएड संस्थेद्वारे केलेल्या अभ्यासाचे चीज होवो ना होवो पणं पती निधनामुळे हाल अपेष्टा स्त्रियांना कमीत कमी कष्ट घेऊन संसार करण्याची , मुलांना वाढविण्याची जिद्द तरी निर्माण होईल.


विजय आप्पा वाणी, पनवेल, (हल्ली मुक्काम फ्रँकफर्ट )