धुके . . . . .
धुक्यात सूर्याची कोवळी किरणे जणू हरवून गेल्यासारखी वाटतात. निसर्गाने धुक्याच्या चादरीत त्या लपवून ठेवल्या आहेत, जणू त्या कोवळ्या किरणांनाही थोडा विराम हवा आहे. आकाशात लपलेल्या सूर्यासारखीच ती कोवळी किरणं धुक्याच्या मखमली पडद्यामागे लपून कधी अलवार डोकावतात, तर कधी पुन्हा धुक्याच्या पांघरुणात शिरतात.
धुक्यातून चालताना वर्तमानात वावरत असल्याचा भास होत असला तरी मन मात्र भूतकाळात रमते किंवा भविष्याच्या अनिश्चिततेत हरवते. धुकं जसं आजूबाजूचं स्पष्ट दिसू देत नाही, तसंच आपल्या जीवनातील काही गोष्टींवर पडलेल्या काळ्या-पांढऱ्या पडद्याची आठवण करून देतं, जणू धुक्यातच हरवलेली ती गोष्ट पुन्हा सापडावी.
पहाटेच्या प्रसन्न क्षणी पसरलेले धुके हे निसर्गाचे अलौकिक रूप असते. काळसर-निळसर आकाशात अलवार झिरपणारा प्रकाश जसा सृष्टीला साद घालतो, तसाच धुक्याचा मखमली स्पर्श धरतीला शांततेची शाल पांघरत असतो. गवताच्या पानांवरून ओघळणारे दवबिंदू आणि त्यावरून प्रतिबिंबित होणारे पहाटेचे कोवळे सूर्यकिरण यांचे दृश्य जणू स्वप्नातल्यासारखे वाटते.
झाडांभोवती अलगद गुंडाळलेले धुक्याचे पट, डोंगरमाथ्यावरून सहज खाली उतरलेले धुक्याचे जाळे, आणि दरवळणाऱ्या गार वाऱ्याबरोबर नाचणारी धुक्याची चादर मनाला ताजेतवाने करते. दूरवर दिसणाऱ्या गावाच्या वस्तीला धुक्याने मिटून टाकलेले असते, जणू निसर्गाने तीला पांघरूण घातले आहे.
धुक्याच्या या मखमली कुशीत सृष्टी शांत आणि गूढ दिसते. निसर्गाचा हा सौम्य आणि मनमोहक क्षण मनाला शांतीचा अनुभव देऊन जातो.
विवा . . .२८१२२४

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा