विजय आप्पा वाणी, vijay appa wani
मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५
मंगळवार, २४ जून, २०२५
लेख (१९९) २५ जून २०२५
म.टा. दिनांक २४ जून २०२५ अंकातील "एस टी महामंडळाची श्वेतपत्रिका "लेख वाचला. एस टी महामंडळाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढून परिवहन मंत्र्यांनी स्वतःच्याच खात्याची खरी परिस्थिती समोर आणली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. "प्रवाशांच्या सेवेसाठी" ब्रीद वाक्य असणाऱ्या, प्रवाशांना कशा सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत, याचाही विचार व्हावा. प्रत्येक स्थानक, स्टँड, आगार यांची आजची परिस्थिती अत्यंत दयनीय, दुर्लक्षित आहे. कानाकोपऱ्यात उभ्या असलेल्या एस्ट्या, त्यांची तुटलेली तावदाने, गावांच्या नावांच्या वाकड्या तिकड्या ठेवलेल्या पाट्या, आगारातील खड्डेमय रस्ते, तुटलेल्या शेड्स, त्यामधील आसन, अर्धवट जाळीची चौकशी केबिन, फुटलेल्या फरशा , अस्वच्छता, रात्री अंधारलेले फलाट, दुर्गंधीयुक्त उघड्या मुताऱ्या, शौचालयाची तर बोंब असते. आदी सर्व त्रासांसह प्रवासी प्रवास करत असतात. लांबच्या प्रवासातील चहा पानासाठी दिलेल्या रेस्टॉरंटचे वर्णन तरी काय करावे. जास्तीचा मोबदला घेऊन, गल्लाभरू मालक प्रवाशांवर उपकार करत असतात. परिवहन मंत्र्यांनी, सर्व आगारांची, बसेसची योग्य निगा राखण्यासाठी विभागावर विशेष भरारी पथकाची स्थापना करून दैनंदिन लेखाजोगा घ्यावा, त्यास वर्तमान पत्रात प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून संबंधित काम करण्यांवर दबाव राहील. आधुनिकतेसाठी रेल्वेचे यूटीएस ,खाजगी बसचे रेडबस सारखे ऍप बनवून ऑनलाईन तिकिटे बुकिंगची सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. यामुळे शासनाच्या उपक्रमातील महामंडळ चांगल्या स्थितीत राहिल्यास प्रवासी जास्तीत जास्त एस टी चा वापर करतील.
विजय आप्पा वाणी, पनवेल
लेख (१९८) २४ जून २०२५
गुरुवार, २९ मे, २०२५
केदारनाथ बद्रीनाथ यात्रा (२१-२६ मे २०२५)
बुधवार दिनांक २१ मे २०२५ रोजी डेहराडून जॉली ग्रँट विमानतळावर पाऊसाने आमचे जोरदार स्वागत केले. पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. नियोजनात व्यत्यय आल्यामुळे हिरमोड झाला. पण २३ मे आठवणीत राहणारा दिवस ठरला, जोरदार पाऊस पडून गेल्यामुळे, सूर्याचे किरणे अस्पष्टच होती , परंतु आमची नजर सारखी त्या अनंत आकाशाकडे लागून राहिली होती, जिथून देवभूमीकडे नेणाऱ्या प्रवासाची सुरुवात होणार होती. डोंगर दऱ्यात पसरलेल्या डेहराडूनच्या सहस्रधारा हेलिपॅड हून आम्ही उंच झेप घेणार होतो – केदारनाथ शिरशीच्या पवित्र पर्वताकडे.
विमान प्रवास हा एका बंदिस्त कुपीतून प्रवास होतो, तसा छोट्याशा सहा आसनी हेलिकॉप्टर ने प्रवास करणे अवघड वाटत होते. आमचा सर्वांच्या जीवनातील पहिलाच हेलिकॉप्टर प्रवास होता, एक अनामिक भीती मनात होती. दुपारी २.२० वाजता, आम्ही सहस्रधारा हेलिपॅडवरून आकाशात झेप घेतली. सुरुवातीला, शहराचे गजबजलेले रस्ते, घरांचे जाळे आणि वाहनांची वर्दळ दिसत होती. पण जसजसे आम्ही उंच जात गेलो, तसतसे हे सर्व मागे पडत गेले आणि समोर उलगडू लागलं एक अद्भुत विश्व – हिमालयाचं शांत, विशाल, आणि तेजस्वी रूप.
हेलिकॉप्टरच्या खिडकीतून नजर टाकली, तर हिरव्या गर्द झाडांनी आच्छादलेले डोंगर, त्यामधून वाहणाऱ्या नद्या, आणि उंचच उंच हिमाच्छादित शिखरं – हे सर्व दृश्य डोळ्यांना मंत्रमुग्ध करत होतं. हिमशिखरांवर नुकतीच पडलेली बर्फाची चादर सूर्यप्रकाशात चकाकत होती. काही क्षण असे वाटलं, जणू आपण पृथ्वीवर नाही, तर एखाद्या स्वर्गसदृश जागेत आहोत.
पर्वतरांगांवरून हेलिकॉप्टर जात असताना हवेमधील दाब जाणवत होता. हेलिकॉप्टरच्या पंख्यांचा आवाजाने कानात किर्र होत होते. वाऱ्याचा जोर, आणि हेलिकॉप्टरच पुढ सरकणे अद्भुत होते. हे सर्व शारीरिक जाणिवा जागृत करत होतं. पण त्याच वेळी अंतर्मन मात्र एखाद्या ध्यानावस्थेसारखं शांत होतं. मनात एकच विचार – देवाच्या अधिक जवळ पोहचतोय.
डेहराडून – ऋषिकेश – श्रीनगर -गढवाल – रुद्रप्रयाग – अगस्त्यमुनि – फाटा – शिरशी गावे , अलकनंदा, मंदाकिनी नद्यांच्या काठी वसलेली, पौराणिक महत्त्वाची आहेत. प्रवासात वापरलेले हेलिकॉप्टर सहा प्रवाशांची क्षमता असलेले लहानसे होते. खिडकीतून बाहेरचं दृश्य सहज पाहता येत होतं. उत्तम प्रशिक्षित पायलट, आणि सुरक्षिततेची सर्व काळजी घेतलेली असल्यामुळे प्रवास अधिकच आरामदायक झाला.
सुमारे ४० मिनिटांचा प्रवास केल्यानंतर आम्ही शिरशी हेलिपॅडवर पोहोचलो. आता केवळ काही किलोमीटरची यात्रा उरली होती. पण मन मात्र केव्हाच केदारनाथाच्या पवित्र मंदिरात पोहोचलेलं होतं. आकाशातून पाहिलेली ती शांतता, भव्यता आणि दिव्यता मनात खोलवर कोरली गेली होती.
ईश्वराच्या मनात काय दडलेले होते, त्याचे त्यालाच ठाऊक, कारण मध्य रात्री केदार टॉप आणि शिरशि बेस परिसरात प्रचंड पाऊस आणि हिमवर्षाव झाला. मनात शिव भेटीची आस तीव्र होती पण पाऊस त्यास व्यत्यय आणत होता. जागरण करतच पहाट झाली, आणि बाहेरील दृश्य पाहताच डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, सहस्र किरणांनी रवी राजाने पर्वतांवर सोन्याची तलम वस्त्र पांघरल्याचा भास झाला. बर्फाच्छादित हिमशिखरे श्री महादेवाच्या वास्तव्याची साक्ष देत होती. आणि २४ मे रोजी सकाळी १० वाजता आमचे केदार टॉप वर जाण्याचे नियोजन झाले. शिरशी बेस कॅम्पवर सूर्यप्रकाशाचा सोनरी स्पर्श पसरला होता. हवेत गारवा होता, आणि मनात एक अव्यक्त स्पंदन – कारण आज साक्षात महादेवाच्या दर्शनाचा योग होता. पर्वतरांगांच्या कुशीत, ३५०० मीटर उंचीवर वसलेलं केदारनाथ – जिथे पोहोचणं म्हणजे फक्त एक प्रवास नाही, तर ती एक आध्यात्मिक उंची गाठण्याची झेप होती. १०.३० वाजता, आमचा नंबर लागला, हेलिकॉप्टरने उंच भरारी घेतली. फक्त सात मिनिटांचा प्रवास, पण त्या क्षणांनी जीवनभर पुरेल असं काहीतरी गाठीला दिलं. खाली पसरलेल्या बर्फाच्छादित हिमालयाच्या अंगाखांद्यावरून जाताना, जणू साक्षात शिवशंभूची उपस्थिती जाणवत होती. आकाश, पर्वत, आणि नीरव शांततेत मिसळलेली एक आध्यात्मिक ऊर्जा – ज्याने अंतःकरण भारावून गेलं. काही क्षणांतच हेलिकॉप्टर उतरलं.
साक्षात केदारनाथ मंदिराच्या पायथ्याशी आम्ही उभे होतो. पाय खाली ठेवताना वाटलं – जणू पवित्रतेच्या भूमीत पाऊल टाकतो आहे.
एस्कॉर्ट टीम ने आम्हाला सुमारे ४०० मीटरवर असलेल्या मंदिराकडे नेलं. वाटेत चालताना थोडा दम लागत होता – कारण उंची होती, थंडी होती, आणि त्या जागेचं एक विलोभनीय गूढ होतं. पण त्या क्षणी, शरीराचं अस्तित्व मागे पडलं – आणि मन पूर्णपणे ईश्वराच्या ओढीने भरून गेलं. मंदिराच्या प्रांगणात पाऊल ठेवलं, तेव्हा नजर एकटक त्या प्राचीन शिवमंदिरावर खिळली. हजारो वर्षांची परंपरा, भक्तांची आस्था, आणि हिमालयाचं रक्षण करणारा देव – हे सर्व एकत्र समोर उभं होतं.
सामान्य दर्शनासाठी प्रचंड रांग होती – भक्तांची गर्दी अगणित.
पण खाजगी दर्शनाच्या मार्गाने आम्ही अगदी एक तासात गर्भगृहात प्रवेश केला. गर्भगृहात पाऊल टाकताच काळ, वेळ, आणि अस्तित्व विसरून गेलो. त्या अंधार्या, पण तेजस्वी जागेत गुरुजींनी जल, चंदन, हळद, तुपाचा अभिषेक करून घेतला. डोळे मिटले... आणि संपूर्ण अस्तित्व एकाच मंत्रात विरून गेलं – “ॐ नमः शिवाय।”. त्या गर्दीत उभं राहून, नामस्मरण करणंही कठीण होतं – पण त्याच गर्दीत, देवाच्या सान्निध्यात, त्याचा स्पर्श आणि ओढ – ही एक वेगळी अनुभूती होती.
शब्दही नाहीत, आणि भावना तरीही ओसंडून वाहणाऱ्या – अशा त्या दर्शनाचा क्षण आयुष्यभरासाठी हृदयात साठवला.
दर्शन संपलं, पाय पुन्हा एकदा पृथ्वीवर टेकले – पण मन अजूनही त्या गर्भगृहातच होतं. गर्दीतून मार्ग काढत, आम्ही बद्रीनाथाच्या दिशेने निघालो – पण मनात मात्र शिवाची छबी, केदारनाथाची गूढता, आणि आकाशातून साक्षात्कार झालेल्या त्या अनुभवांचा भार होता. हा प्रवास केवळ स्थळांमध्ये नव्हता – तो अंतर्मनात घडणारा एक आध्यात्मिक प्रवास होता.
केदारनाथ मंदिरात महादेवाच्या सान्निध्यात वेळ घालवून, अंतर्मन शांत झालं होतं. काही क्षणांत आम्ही केदारनाथ टॉप हेलिपॅडवरून परत शिरशी बेस कॅम्पला परतलो. पण आमचा अध्यात्मिक प्रवास संपला नव्हता – आता होता शिवाच्या चरणांपासून विष्णूच्या पायाशी पोहोचण्याचा योग. शिरशी बेस कॅम्पवर उतरल्यानंतर , लगेच आमचं दुसरं हेलिकॉप्टर तयार होतं – गंतव्य स्थान: बद्रीनारायण मंदिर, देवभूमीतील दुसरं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र.
शिरशीहून बद्रीनाथकडे रस्ते मार्गे गेल्यास, चढण, वळणं, नदीखोऱ्यांमधून जात १०–१२ तास सहज लागतात. पण हेलिकॉप्टरने फक्त ३० मिनिटं – आणि त्यात जो निसर्गदृश्यांचा खजिना मिळतो, तो अवर्णनीय. फाटा – चोपता – उखीमठ – जोशीमठ ही ठिकाणं हेलिकॉप्टरच्या वाटेवरून दिसत होती. अलकनंदा नदी, तिचे प्रवाह आणि त्यावरचे धबधबे व पूल, नीलगिरी, नंदादेवी आणि त्रिशूल पर्वतांची उंच शिखरं जवळून पहायला मिळालीत. एकदम हिमाच्छादित, तेजस्वी आणि दिव्य वाटणारी. काही ठिकाणी बर्फाचे साठे, गडद झाडी, पांढऱ्या ढगांतून डोकावत चाललेली डोंगरशिखरं – जणू आकाशातील स्वर्गाची वाटच.
हेलिकॉप्टर बद्रीनाथ हेलिपॅडवर उतरलं, तेव्हा समोर हिमालयात वसलेलं ते बद्रीनाथ धाम एकदम भव्य आणि प्रसन्न वाटत होतं.
३,१३३ मीटर उंचीवर वसलेलं हे मंदिर, अलकनंदा नदीच्या काठी, भारताच्या एका टोकाशी – एक पवित्र शांततेत उभं आहे. मंदिराचं प्रवेशद्वार रंगीबेरंगी, त्यावर गरुड, विष्णू आणि देवी-देवतांची चित्रं कोरलेली आहेत. आत गेल्यावर मुख्य गर्भगृहात शाळग्रामाच्या काळ्या पाषाणाची श्री बद्रीनारायणाची मूर्ती आहे – ध्यानस्थ मुद्रेत, पद्मासनात विराजमान. मूर्तीभोवती कुबेर, नारद, उद्धव, गरुड आणि लक्ष्मीदेवी यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात वातावरण अत्यंत शांत, सुवासिक धूप, घंटानाद आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ चा अखंड जप. मंदिराच्या समोरून वाहणारी अलकनंदा नदी खळखळत मंदिराच्या पवित्रतेला पूरक वाटते. तिच्या थंड पाण्याचा स्पर्श – जणू भक्तांच्या पापांचं प्रक्षालन करणारा. नदीकाठी उभं राहून ध्यान करताना वाटतं – आपण या शरीराच्या पलीकडे काहीतरी अनुभवतोय. मंदिराच्या दर्शनानंतर बद्रीनाथ गावातील वरच्या भागातील, म्हणजेच भारताचे चीन सीमेवरील पहिले गाव, माना गाव जे अगणित वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. येथील गणेश गुहेत, श्री गणपतीने महाभारत लिहिलं, अशी श्रद्धा आहे. गुहेत शांतता, आणि शिलालेखासारख्या रचना पाहायला मिळतात. व्यास गुहेत व्यासांनी महाभारताची रचना केली, असं मानलं जातं. भीम पुल , द्रौपदीला नदी पार करून देण्यासाठी भीमाने ठेवलेला विशाल खडक – अजूनही पायवाटेवर दिसतो. स्वर्गरोहिणी द्वार, अशी मान्यता आहे की पांडव याच वाटेने स्वर्गाच्या दिशेने गेले. हा मार्ग पर्वतरांगांमधून वर-वर जात चीनच्या सीमेपर्यंत पोहोचतो.
शिवाच्या पावन दर्शनानंतर विष्णूच्या सान्निध्यात वेळ घालवणं म्हणजे जीवनाच्या दोन्ही तत्त्वांचं समतोल दर्शन – संहार आणि पालन. केदारनाथाचं गूढ, बद्रीनाथाची तेजस्विता, आणि हिमालयाचं निःशब्द गूढ सौंदर्य – या प्रवासाने देह थकलाही असेल, पण आत्मा मात्र जागृत झाला. हा प्रवास एका भक्ताच्या अंतर्मनातील परिवर्तनाचं प्रतीक आहे. जिथे शरीर फक्त माध्यम ठरतं, आणि अंतर्मन ईश्वराच्या चरणाशी विलीन होतं.
शिवाच्या आशिर्वादाने आरंभ, विष्णूच्या कृपेने पूर्णत्व.
२४ मेचा दिवस – भक्ती, ध्यान आणि अनुभवांनी भरलेला.
केदारनाथ आणि बद्रीनाथ – विश्वाचे दोन ध्रुव, दोन तत्त्वं – संहार आणि पालन यांचं साक्षात दर्शन घेऊन, २५ मे रोजी आम्हाला पुन्हा डेहराडूनला परतायचं होतं. पण निसर्गाचं रूप काही वेगळंच होतं – जणू त्यालाही आमचं थोडं थांबावं असं वाटलं. बद्रीनाथ मंदिर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. ढगांनी झाकोळलेलं आकाश, गडगडणाऱ्या वीजा, आणि हवेत पसरलेली धूसर ओल. क्षणभर वाटलं, की आता प्रवास पुढे सरकेल का? मनात थोडं खट्टू झालं. पण दुपारी जेवणानंतर साक्षात देवानेच बहुधा आकाश थोडं स्वच्छ केलं – पावसाने थोडी उघडीप दिली... आणि हेलिकॉप्टरची गडगड पुन्हा एकदा आशेचा आवाज बनली.
कॅप्टन धर्मेश सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बद्रीनाथ ते डेहराडून या सर्वात मोठ्या हवाई प्रवासासाठी निघालो.
पर्वत रांगा, घोंघावणारे ढग, अधूनमधून दिसणारे बर्फाच्छादित शिखरं – आणि मधेच पडणाऱ्या पावसाच्या सरी...हेलिकॉप्टर जणू निसर्गाच्या चक्रव्यूहातून वाट काढत जात होतं. हेलिकॉप्टरच्या खिडकीतून डोकावलं, तर समोर पसरलेलं एक स्वप्नवत दृश्य , नीलगिरी, त्रिशूल, नंदादेवी यांसारख्या पर्वतरांगा, बर्फाने झाकलेल्या. मधूनच ढगांचा समुद्र जणू काही आपल्या वाटेवर चाललाय. एखादं शिखर खूप जवळून जातं, तर एखाद्या दऱ्यातून हेलिकॉप्टर झेप घेतं होत. आभाळ फाटतं, पावसाच्या सरी अंगावर झेलतो, आणि त्यातूनच पायलट सेठी यांच्या कुशलतेने हेलिकॉप्टर पुन्हा स्थिर वाटेवर येतं होत. त्या क्षणी एक विश्वास – केवळ विज्ञानात नाही, तर मानवाच्या सामर्थ्यात आणि दैवाच्या कृपेतही होता. जवळपास ४०–४५ मिनिटांच्या प्रवासानंतर, डेहराडूनच्या सहस्रधारा हेलिपॅडवर आम्ही अगदी अलगद उतरलो. ढगांच्या दाटीतून निसर्गाशी लढा देत आलेला प्रवास एका शांत, हिरव्यागार हेलिपॅडवर थांबला. हृदयात मात्र एकच भावना – "देवांच्या सान्निध्यातून, निसर्गाच्या कुशीतून, माणसाच्या धैर्याच्या बळावर – आम्ही सुखरूप परत आलो आहोत.". या प्रवासात आम्ही केवळ स्थळं पाहिली नाहीत – ती जगलोत, पर्वतांची शौर्यगाथा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवली. ढगांचं मौन अनुभवलं, पावसाच्या थेंबांमध्ये देवाच्या कृपेचा स्पर्श घेतला.
दोन धाम यात्रेनंतर शरीर थकलेलं असलं, तरी मन अजीबात थकलेलं नव्हतं – कारण पुढील प्रवास होता ऋषिकेशच्या पवित्र गंगेच्या काठावर. संध्याकाळचे साडेसहा वाजले होते, सूर्य पश्चिम क्षितिजाकडे झुकत होता. आभाळात केशरी आणि सोनरी रंगांची सर्जनशील उधळण सुरू होती. आम्ही पोहोचलो – त्रिवेणी घाटावर. जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्या एकत्र येतात – आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनातही श्रद्धा, शांती आणि समर्पणाची त्रिवेणी वाहू लागते. घाटावरच्या पायऱ्यांवर आम्ही स्थानापन्न झालो. सामोर भागीरथी गंगेचं तेजस्वी, शांत आणि खळखळणारं पाणी, आणि त्याच्या दोन्ही तीरांवर श्रद्धाळूंची प्रचंड गर्दी – हजारो नव्हे, लाखोंच्या संख्येने. सात वाजता, सायंआरतीला सुरुवात झाली.
धोतर-उत्तरीय परिधान केलेले अकरा गुरुजी, एका रांगेत उभे राहिले. त्यांच्या हातात मोठमोठे धूप-दीपांचे पंचमुखी दीपक, आणि गंगेच्या दिशेने धूपाची लाट जणू नृत्य करू लागली.
मंत्रोच्चार, शंखनाद, घंटानाद – साऱ्या वातावरणात कंपन पसरले. गंगेच्या प्रवाहात प्रतिबिंबित होणारे तेजस्वी आरतीचे दीपक, आकाशात उमटणारे मंत्रांचे नाद, आणि गर्दीत हरवलेली श्वासांची एकजूट. त्याच समयी महिला हातात फुलांनी भरलेली द्रोणं, धूप आणि पेटते दीप घेत, संथ पावलांनी गंगेच्या पायऱ्या उतरत, अलगद ती आरती गंगेमातेला अर्पण करत होत्या. दीपांनी भरलेली द्रोणं पाण्यावर जसं तरंगत जातात, तसं अंतर्मनही काही काळासाठी सर्व शंका, दु:ख आणि थकवा विसरून प्रकाशात मिसळून जातं. गंगेच्या पात्रात हात टाकून, त्या थंड पाण्याचा स्पर्श केला, ते केवळ पाणी नव्हतं, तो होता शांतीचा स्पर्श, आईच्या मायेचा हात, आणि परमेश्वराची उपस्थिती. त्रिवेणी घाटावरची ही आरती – अनुभवण्याची गोष्ट आहे, शब्दांनी पूर्ण मांडण्याची नाही. कारण इथे शब्द कमी पडतात आणि भावनाच संवाद साधतात.
चारधाम यात्रा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाची तीर्थयात्रा मानली जाते. त्यातील केदारनाथ आणि बद्रीनाथ हे दोन अत्यंत पवित्र आणि दिव्य धाम, जिथे पोहोचण्याची प्रत्येकाचीच एक अंतःकरणपूर्वक इच्छा असते. ही यात्रा सहजसोप्या मार्गाने पार पडणारी नसते. उंच डोंगररांगांतून, कधी थंडी, कधी पाऊस, कधी दमछाक करणारी चढाई अशा अनेक अडचणींचा सामना करतच ही यात्रा पूर्ण होते.
श्री. उज्वल आणि सौ. सुलभा सुर्वे, श्री. अभय आणि सौ. सुषमा सुर्वे तसेच श्री. विजय आणि सौ. सुवर्णा वाणी या तीन कुटुंबांनी एकत्रितपणे, मनोमन एकत्र राहून सुफळ-संपूर्ण केली.
या यात्रेचा खरा गाभा होता – एकमेकांवरील विश्वास, समंजसपणा, विचारांची देवाणघेवाण आणि सकारात्मक दृष्टीकोन. प्रत्येक दिवस नव्या अनुभवांनी भरलेला होता. पकेदारनाथाच्या उंच पर्वतांमध्ये जोरदार वारे अंगावर आदळत होते, तेव्हा सुलभा वहिनींच्या ओठांवर ‘हर हर महादेव’चा अखंड गजर होता. उज्वलजींची संयमित आणि सूज्ञ नेत्रुत्वाची भावना संपूर्ण समूहाला दिशा देत होती. विजयजी आणि सुवर्णा वहिनी यांचा उत्साह, त्यांची विनोदी शैली हे थकलेल्या क्षणांतही हास्याचे वायुमंडल निर्माण करत होते. आणि अभयजी – सुषमा वहिनींच्या संयमी आणि समजूतदार वर्तनामुळे प्रवासातील प्रत्येक निर्णय समंजसपणे आणि एकमताने घेतला गेला. थकवा आला तरी कुणी कुणाची कुरबूर केली नाही. ही यात्रा फक्त देवदर्शनाची नव्हती, ती होती आत्मदर्शनाची, परस्परांच्या सहवासातून नात्यांची पुन्हा नव्याने उलगडलेली वीण होती. बद्रीनाथ मंदिराच्या पायऱ्या चढतानाचा प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवण्यासारखा होता. "जय बद्रीविशाल" या जयघोषात, प्रत्येकाच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू दाटून आले. केवळ देहाने नाही, तर मनाने, भावनेने आणि श्रद्धेने अनुभवलेला हा प्रवास होता. ही यात्रा एकतेचा, प्रेमाचा आणि श्रद्धेचा अद्वितीय संगम आहे आणि म्हणूनच, ही यात्रा पूर्णत्वाला गेली, आणि प्रत्येकाच्या मनात एक अविस्मरणीय आठवण बनून घर करून राहिली.
मंगळवार, ६ मे, २०२५
७ मे २०२५
"युद्धाच्या काळातलं घाटकोपर – मी पाहिलेलं"
डिसेंबर १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या काळातील परिस्थिती. लहान वय होतं, पण काहीतरी वेगळं घडतंय, हे जाणवत होतं, पंधरा दिवस चाललेल्या युध्दात, रात्री आकाश पूर्ण काळोखात बुडायचं. आकाशात मोठ्या आवाजात विमाने घिरट्या घालायची. कधी कधी आवाज इतका जवळ यायचा की वाटायचं, जवळच बॉम्ब वर्षाव होतोय. त्या काळात रेडिओ एकच माध्यम होते, ज्यावरून युद्धाचे वार्तांकन होत होते. सगळे लोक गंभीर होते. सगळ्या घरांच्या दरवाजांच्या गॅप मध्ये वर्तमान पत्राच्या घड्या, आणि खिडक्यांवर काळे कागद चिकटवले होते. कुठेच प्रकाश झिरकू नये म्हणून. रस्त्यावरील लाईट बंद असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट असे. लोकलच्या, वाहनांच्या हेड लाईटला, अर्धा काळा रंग लावल्याचे आठवत आहे, जो पुढे कित्येक वर्ष दिसत होता. दररोज संध्याकाळी सायरन वाजायचा आणि ब्लॅक आऊट ला सुरुवात व्हायची. युद्धाच्या काळात घाटकोपर, हे एक महत्त्वाचं नागरी वस्ती असलेलं क्षेत्र होतं. गोळीबार मैदान, जे घाटकोपर पश्चिमेत वसलेलं आहे, येथे ब्लॅकआउट सराव, हवाई हल्ला सराव व सायरन यंत्रणा तपासणी केली जात होती. लालबत्तीच्या डोंगरावर असलेले खंडोबा मंदिर जिथून विमानतळ परिसर, धावपट्टी दिसायची. महत्वाचे म्हणजे विमानांचा धावपट्टीवर उतरण्याचा मार्ग घाटकोपरहून जात असे, (जो आजतागायत आहे). अत्यंत संवेदनशील परिसरामुळे धोक्याची भिती नक्कीच जास्त होती. रात्री विमानांचा आवाज ऐकू येत असे, आणि लोक मैदानाच्या दिशेने पाहत असत, आकाशात चकाकणारे प्रकाश (flak/trace fire) दिसल्याच्या गोष्टी आठवतात. अशा अनेक आठवणी आजच्या मॉकड्रील मुळे जागृत झाल्यात.
मंगळवार, २२ एप्रिल, २०२५
लेख (१९७) २३ एप्रिल २०२५
म टा दिनांक २२ एप्रिल २०२५ अंकातील " गुंतवणूक संधीचे सोने " संपादकीय वाचले . भारतीयांचा सोन्याकडे ओढा केवळ आर्थिक नाही तर सांस्कृतिक , सामाजिक आणि भावनिकदृष्ट्याही खूप खोलवर रुजलेला आहे. सोन दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानलं जात कारण त्याची किंमत महागाईबरोबर वाढत जाते . सहज विकता येणार, तारण ठेवता येणार आणि कुठेही खरेदी करता येणारं एवढी सुलभता गुंतवणुकीच्या कोणत्याच व्यवहारात नाही . जागतिकीकरणाच्या ११९० च्या आधी सोनं हीच मुख्य गुंतवणूक मानली जायची , ग्रामीण भागात सोनं म्हणजे संपत्तीची खात्री. आर्थिक सुधारणानंतर शहरी भागात शेअर बाजार , म्युच्युअल फंड यांचा पसारा वाढला. शहरांच्या तुलनेने आजही साठ टक्के सोन्याची खरेदी ग्रामीण भागात केली जाते . स्वातंत्र्यांनंतर १९५० साली १०० रुपयांचा असणारा भाव , २०२५ मध्ये लाख रुपयांवर गेला, यावरून सोन्याची भाववाढ वाऱ्याच्या वेगात होत आहे. परंतु सोन्याच्या भाव वाढीमुळे देशाच्या आर्थिक सुधारणांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत . बहुतांश सोने आयात करावे लागल्यामुळे आयात खर्च वाढल्यामुळे चालू खात्यातील तूट वाढते . निष्क्रिय गुंतवणुकीमुळे उद्योग रोजगार आणि उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक कमी होते परिणामी बँकांकडे कमी निधी राहून आर्थिक गती मंदावते . सरकारला याबाबत तातडीचे उपाययोजना करणे गरजेचे आहे .
रविवार, २० एप्रिल, २०२५
लेख (१९६) २१ एप्रिल २०२५
अव्यवस्थेमुळे शिक्षणासोबत राज्याचीही यत्ता घसरगुंडीची.
म टा दिनांक १९ एप्रिल २०२५ अंकातील " साक्षेप - शिक्षणाची यत्ता कंची ? श्री पराग करंदीकरांचा लेख वाचला. राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या धरसोड नियोजनामुळे सर्वच विद्यापीठांची परिस्थिती खालावलेली आहे. शासनाच्या अखत्यारीतील आठ- दहा विद्यापीठे
विजय आप्पा वाणी, पनवेल
मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५
लेख (१९५) ५ फेब्रुवारी २०२५
लोकसत्ता दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ अंकातील " किती मी राखू तुमची " संपादकीय वाचले. अमेरिकेचे स्थान जागतिक पटलावर सम्राज्ञीनीचेच आहे . भारताच्या साडे तीन ट्रिलियन अर्थ व्यवस्थेत तुलनेने वीस ट्रिलियन अर्थ व्यवस्था असलेल्या चीन सोबत अमेरिका दोन हात करताना विचार करणारच. गेली कित्येक वर्षे अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमुळे गुंतवणूकदारांचे आकर्षण डॉलरकडे वाढल्यामुळे इतर देशांच्या चलनांवर दबाव येतो. चीन आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थांची तुलना करताना काही प्रमुख घटक विचारात घेणे आवश्यक आहे. हे दोन्ही देश जागतिक अर्थव्यवस्थेत प्रबळ स्थान राखून आहेत, अमेरिका खुल्या बाजाराची अर्थव्यवस्था खाजगी उद्योगांना प्राधान्य या उलट चीनची राज्य नियंत्रित संकरित अर्थव्यवस्था आहे. अर्थात अमेरिकेच्या आर्थिक धोरणांपुढे, दबावापुढे, चीनची मध्यवर्ती बँक चलनाचे मूल्य स्थिर ठेवत ,चीनच्या अर्थव्यवस्थेवर कमी परिणाम दिसून येतील याची काळजी घेतल्याने युआन ची पडझड कमी प्रमाणात होऊन शेअर बाजारावरही फारसा परिणाम होत नाही. गुंतवणूकदारांनी सुरक्षित म्हणून डॉलरची निवड केल्यामुळे , भारतीय रुपयावर याचा परिणाम होत असून, डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर राहत आहे. भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत असल्यामुळे भारताच्या आयात खर्चात वाढ होते, ज्यामुळे रुपयावर दबाव येतो. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातील गुंतवणूक कमी करून चीनकडे आपला निधी वळवला आहे. . राजशिष्टाचाऱ्या मुद्द्यात शपथविधीस भारतीय पंतप्रधानांना आमंत्रित न करणे हे गूढच आहे . गेल्या अकरा वर्षात नऊ वेळा अमेरिका दौऱ्याने पंतप्रधानांनी व्हाईट हाऊसशी जवळीक साधली होती . सप्टेंबर २०१९ मधील हाऊडी मोदी कार्यक्रमाने तर गर्दीचे सर्वच उच्चांक मोडून दोन्ही देशांमधील संबंध , धोरणात्मक भागीदारी दर्शविली गेली होती . शपथविधीनंतर मात्र दोन्ही नेत्यांची भेटीतील तृश्यता दूरध्वनीद्वारे जोडली गेली . भेटीचे आमंत्रण दिले गेले परंतु ट्रम्प यांच्या प्रचारातील भारतासंबंधीची वाक्ये , आयातीवर शुल्क , ब्रिक्स देशांना चलन न करण्याची मागणी, असे अनेक कंगोरे आहेत . त्यामुळे ट्रम्प यांच्या जुन्या ओळखीचा फायदा, नव्या फडात सामील असलेले सम्राज्ञी भारताला सहजासहजी घेऊ देणार नाहीत असे चित्र तरी दिसत आहे .
बुधवार, २९ जानेवारी, २०२५
लेख (१९४) ३० जानेवारी २०२५








