मंगळवार, २४ जून, २०२५

लेख (१९९) २५ जून २०२५


श्वेतपत्रिकेतील कार्यवाहीत प्रवाशांचाही विचार व्हावा.

म.टा.  दिनांक २४ जून २०२५ अंकातील "एस टी महामंडळाची श्वेतपत्रिका "लेख वाचला. एस टी महामंडळाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढून परिवहन मंत्र्यांनी स्वतःच्याच खात्याची खरी परिस्थिती समोर आणली आहे, त्याबद्दल त्यांचे  अभिनंदन. "प्रवाशांच्या सेवेसाठी" ब्रीद वाक्य असणाऱ्या, प्रवाशांना कशा सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत, याचाही विचार व्हावा.  प्रत्येक स्थानक, स्टँड, आगार यांची आजची परिस्थिती अत्यंत दयनीय, दुर्लक्षित आहे.  कानाकोपऱ्यात उभ्या असलेल्या एस्ट्या, त्यांची तुटलेली तावदाने, गावांच्या नावांच्या वाकड्या तिकड्या ठेवलेल्या पाट्या, आगारातील खड्डेमय रस्ते, तुटलेल्या शेड्स, त्यामधील आसन,  अर्धवट जाळीची चौकशी केबिन, फुटलेल्या फरशा , अस्वच्छता, रात्री अंधारलेले फलाट, दुर्गंधीयुक्त उघड्या मुताऱ्या, शौचालयाची तर बोंब असते. आदी सर्व त्रासांसह प्रवासी प्रवास करत असतात.  लांबच्या प्रवासातील चहा पानासाठी दिलेल्या रेस्टॉरंटचे वर्णन तरी काय करावे. जास्तीचा मोबदला घेऊन,  गल्लाभरू मालक  प्रवाशांवर उपकार करत असतात.  परिवहन मंत्र्यांनी, सर्व आगारांची, बसेसची योग्य निगा राखण्यासाठी विभागावर विशेष भरारी पथकाची स्थापना करून दैनंदिन लेखाजोगा घ्यावा, त्यास वर्तमान पत्रात प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून संबंधित काम करण्यांवर दबाव राहील. आधुनिकतेसाठी रेल्वेचे यूटीएस ,खाजगी बसचे रेडबस सारखे ऍप बनवून ऑनलाईन तिकिटे बुकिंगची सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. यामुळे शासनाच्या उपक्रमातील महामंडळ चांगल्या स्थितीत राहिल्यास प्रवासी जास्तीत जास्त एस टी चा वापर करतील.

विजय आप्पा वाणी,  पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: