"युद्धाच्या काळातलं घाटकोपर – मी पाहिलेलं"
डिसेंबर १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या काळातील परिस्थिती. लहान वय होतं, पण काहीतरी वेगळं घडतंय, हे जाणवत होतं, पंधरा दिवस चाललेल्या युध्दात, रात्री आकाश पूर्ण काळोखात बुडायचं. आकाशात मोठ्या आवाजात विमाने घिरट्या घालायची. कधी कधी आवाज इतका जवळ यायचा की वाटायचं, जवळच बॉम्ब वर्षाव होतोय. त्या काळात रेडिओ एकच माध्यम होते, ज्यावरून युद्धाचे वार्तांकन होत होते. सगळे लोक गंभीर होते. सगळ्या घरांच्या दरवाजांच्या गॅप मध्ये वर्तमान पत्राच्या घड्या, आणि खिडक्यांवर काळे कागद चिकटवले होते. कुठेच प्रकाश झिरकू नये म्हणून. रस्त्यावरील लाईट बंद असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट असे. लोकलच्या, वाहनांच्या हेड लाईटला, अर्धा काळा रंग लावल्याचे आठवत आहे, जो पुढे कित्येक वर्ष दिसत होता. दररोज संध्याकाळी सायरन वाजायचा आणि ब्लॅक आऊट ला सुरुवात व्हायची. युद्धाच्या काळात घाटकोपर, हे एक महत्त्वाचं नागरी वस्ती असलेलं क्षेत्र होतं. गोळीबार मैदान, जे घाटकोपर पश्चिमेत वसलेलं आहे, येथे ब्लॅकआउट सराव, हवाई हल्ला सराव व सायरन यंत्रणा तपासणी केली जात होती. लालबत्तीच्या डोंगरावर असलेले खंडोबा मंदिर जिथून विमानतळ परिसर, धावपट्टी दिसायची. महत्वाचे म्हणजे विमानांचा धावपट्टीवर उतरण्याचा मार्ग घाटकोपरहून जात असे, (जो आजतागायत आहे). अत्यंत संवेदनशील परिसरामुळे धोक्याची भिती नक्कीच जास्त होती. रात्री विमानांचा आवाज ऐकू येत असे, आणि लोक मैदानाच्या दिशेने पाहत असत, आकाशात चकाकणारे प्रकाश (flak/trace fire) दिसल्याच्या गोष्टी आठवतात. अशा अनेक आठवणी आजच्या मॉकड्रील मुळे जागृत झाल्यात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा