सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

लेख (१७८) २४ सप्टेंबर २०२४

 

पक्ष फोड्याची प्रतिमा बदलून प्रामाणिक पणाची प्रतिमाच भाजपाला वाचवू शकेल .  
 
लोकसत्ता दि २३ सप्टेंबर २०२४ अंकातील "लालकिल्ला" सदरातील भाजपला विकास तारेल कि हिंदुत्व ? लेख वाचला .  भाजपच्या परायज आणि विजयाचे असे दोन पर्व आहेत . जनसंघाचे नामांतर करून १९८० मध्येच पंच निष्ठा तत्वांवर ठाम राहून , भाजपने राजकीय वाटचाल सुरु केली.  ८४ मध्ये इंदिराजींच्या हत्येने सार्वत्रिक निआवडणुकीचे वारे बदलल्यामुळे केवळ २ जागा मिळाल्यामुळे निराशेने , भाजपने बस्तान गुंडाळण्याची भाषा केली, परंतु पुढे ८९ ते २००९ पर्यंत चढत्या क्रमाने जागा मिळवत २०१४ पहिल्यांदा सत्तेचा सोपान चढून २०२४ पर्यंत सत्ता कायम ठेवली .  भाजपच्या या चढत्या क्रमात मुख्यत्वे हिंदुत्वाची , देशप्रेमाची किनार महत्वाची होती .  अनेक वर्षे विरोधात काम केल्यामुळे विजयासाठीच्या प्रयत्नांत जे सातत्य होते ते हळुवारपणे उतरून सत्तेची नशा चढू लागली . २०१४ मधील एकहाती सत्ता मिळविल्यावर ,  अनेक लोकोपयोगी कामांचा धडाका लावला, जनतेप्रती निष्ठेचा क्रम बदलत गेला .  सत्तेच्या पहिल्या पर्वात विरोधी पक्षांना शत्रूपेक्षा कमी लेखण्याचा प्रमुख अजेंडा राबविला गेला,  व्यक्ती सापेक्ष प्रेम भक्ती सुरु झाली,  अकारण राज्याराज्यांत घटनात्मक पेच निर्माण केले गेले, सीबीआय, ईडीच्या धाकावर व्यक्तींना टार्गेट करत पक्षांतरे राबविली गेलीत आणि इथेच खरी वाताहाताला सुरुवात झाली आणि त्याची कडू फळे २४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पिछेहाटीत दिसून आलीत . आता खरा प्रश्न कि विकास का हिंदुत्व ? तर यातले कोणतेच कारण भाजपला तारू शकणार नाहीत .  यातून बाहेर पडायचे असेल तर आधी विरोधकांना कमी लेखण्याची वृत्ती,  व्यक्ती द्वेष, पक्षांची फोडाफोडी, सीबीआय , ईडीचे प्रयोग, पक्षांतर केलेल्यांना सत्तेपासून दूर ठेवून, वर्षानुवर्षे कार्य करणाऱ्या निष्ठावंतांना न्याय दिला पाहिजे .  विरोधकांच्या कोणत्याही कृतीवर आक्षेप टाळावा ,  दोन तीन महिने तरी पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांचे सर्व आंतर राज्यीय दौरे थांबवावेत आणि विशेष स्तोम न माजवता विकास कामांचे उदघाटन स्थानिक पातळीवर करावी .  जनतेचा पुन्हा विश्वास मिळविण्यासाठी, प्रामाणिकता आणि  पारदर्शिकता दाखवित, पक्षाच्या ध्येय धोरणात, नेंत्यांच्या वागण्यात बदल, जनतेला जाणवेल तेव्हा साहजिकच विजयाच्या अपेक्षा वाढतील .  जनता आता कंटाळली आहे , आपापसातील हेवेदाव्यांना, चढाओढीच्या राजकारणाला , त्यांना फक्त हवे साधे आणि शांत जीवन .   

विजय आप्पा वाणी , पनवेल 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: