अभियांत्रिकी पदवी नंतरही नोकरीची शाश्वती नसल्याने अतिरिक्त जागा रिक्तच राहतात .
म टा दिनांक १२ सप्टेंबर २०२४ संपादकीय लेखात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहण्याबाबत अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे . दरवर्षी राज्यात एकूण १२ लाखांच्या वर विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होत आहेत . लेखात म्हटल्याप्रमाणे साडेतीनशेहुन अधिक महाविद्यालये आणि एक लक्ष चौसष्ट हजार जागा असताना ५१ हजाराहून अधिक जागा रिक्त आहेत , याचाच अर्थ उत्तीर्णांच्या फक्त नऊ ते दहा टक्के विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीकडे आहे असे दिसून येते . याचे महत्वाचे कारण म्हणजे गेल्या दहा वर्षात साडेतीनशे महाविद्यालयांपैकी फक्त मोजक्याच महाविद्यालयात आय टी कंपन्यांतर्फे कॅम्पस रिक्रुटमेंट केली जात असून फक्त हजाराच्या आतच विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होतो आहे , प्रत्येक वर्षी उर्वरित लाख भर विद्यार्थी वर्षानुवर्षे अक्षरशः बेकार फिरत असतात कारण उत्पादन , व्यवस्थापन , मार्केटिंग, सेवा आदी क्षेत्रातील कारखान्यात कित्येक वर्षे भरती प्रक्रिया राबविली जात नाही. या विद्यार्थ्यांना पर्यायी सेवा क्षेत्रात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अथवा स्पर्धात्मक परीक्षेद्वारे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करावे लागतात . या कारणांमुळेही जागा रिक्त होण्याचे प्रमाण वाढत असण्याची शक्यता नाकारता येत नाही .
विजय आप्पा वाणी , पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा