दाढी कालची आणि आजची
दाढी नित्यनियमाने रोज सकाळी उठून करण्याचा एक सोपस्कार. ऑफिसला जाणारे, स्वतःचा व्यवसाय असणारे, वेळेनुसार सवडीनुसार रोज किंवा एक दिवसाआड दाढी स्वतः, घरी किंवा जमेल तेव्हा सलून मध्ये जावुन करत असतात.
फार पूर्वी ते अगदी आताच्या दशकापर्यंत दाढी करणार्यांचा एक डब्बा असायचा, त्याची एक ठरलेली जागा असायची. डब्बा कसा असावा याचे सुद्धा प्रमाण असायचे. अर्ध्या फुटाचा आणि दोन पेर बोट आत जाई एवढी खोली असलेला पत्र्याचा किंवा नंतर प्लॅस्टिकचे उपलब्ध होऊ लागल्यामुळे सर्रासपणे त्याचाच वापर होऊ लागला.
तर या डब्यात असणार्या वस्तु सुद्धा प्रमाणशीर असायच्या. बहुधा गोदरेज कंपनीचा गोल शेव्हिंग साबण डबी सह मिळायचा. लाकडाचा निमुळता वर चॉकलेटी कलर तंतूमय मऊशार केस असलेला ब्रश, रेझर म्हणजे स्टीलचे एक दांडी, त्यावर एक ब्लेड राहील असे पाते मध्ये ब्लेड आणि त्यावरून पून्हा एक जाड पाते असा सेट, सेव्हनओक्लॉक, टोपाझ, सुपरमॅक किंवा त्या त्या काळात/वेळेत/ठिकाणी उपलब्ध असणारी ब्लेड. दाढी झाल्यावर फिरवण्यासाठी तुरटीचा खडा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्टँड असणारा डब्यात राहणारा आरसा, अशी सगळी सामुग्री असणारा दाढीचा डब्बा, याची जागा सुद्धा ठरलेली, त्यात इकडे तिकडे सुद्धा हललेली किंवा जागा बदललेली कुटुंब प्रमुखांस चालायचे नाही.
नित्य नियमाने दाढी करणारे म्हणजे कुटुंब प्रमुखच. शिक्षक असो, कार्यालयात असो, बँकेत असो किंवा व्यावसायिक असो त्यांचा एक सन्मान असायचा धाक असायचा. सकाळी प्रातर्विधी आटोपल्यावर, चहाचा कप आणि वर्तमानपत्राचे वाचून झाल्यावर, आंघोळी आधी दाढी असायची. दाढी करण्याची जागा ठरलेली, उजेड हवा म्हणुन खिडकी जवळ किंवा अगदी दारातच येण्या जाण्या मार्गात असायची. दाढीचा डब्बा घेऊन बसण्याआधी वाटीत / मग भर पाणी ठेवले जायचे.
दाढीचे प्रकार पण मजेशीर. संपूर्ण गालावर फेसयुक्त ब्रश फिरवायचा. मिशी असणारे गालावरून आणि मिशी नसणारे, ब्रश फिरवताना दोन्ही ओठ आत दाबून ब्रश फिरवायचे. ब्रश फिरवून झाल्यावर दाढी नरम होण्यासाठी गप्पा किंवा चर्चा करीत, हळूच ब्लेड काढून, दांडी आणि पात्यात अडकविले जाई. कल्लेपासून हनुवटी पर्यन्त ब्लेड फिरवताना गाल अशा रीतीने फुगवले जाई की ब्लेड सरसर फिरवून गुळगुळीत करीत असे. मिशी नसणारे पुन्हा ओठ आत दाबून ब्लेड फिरवत. दाढी पूर्ण झाल्यावर तुरटीचा खडा पाण्यात बुडवून दाढीवरून फिरविणे, ब्लेड स्वच्छ करून पुन्हा पाकिटात ठेवणे, एका ब्लेडने किती दाढ्या केल्या याची नोंद ठेवणे, आणि पुन्हा डब्बा योग्य त्याच ठिकाणी ठेवणे. असे सारे सोपस्कार मर्यादित वेळेतच व्हायचे हे महत्वाचे असे.
आता या सर्व सोपस्कारत पूर्णपणे बदल झाल्याचे जाणवत आहेत. डब्याची जागा मिरर सेल्फ मधील कंपार्टमेंट ने घेतली. ब्लेड आणि त्याची सामग्री ची जागा युज अँड थ्रो ब्लेड, मॅक थ्री, ट्रिमर , गोल साबणाची जागा शेव्हिंग क्रिम, फोम, आणि हे सर्व सोपस्कार वॉशरूम मधील आरश्यात घाईघाईत काही क्षणात केले जातात. पूर्वी दाढी कुटुंबातील सदस्यांसमोर केला जाणारा एक संस्कार होता. त्यात दाढी करणाऱ्याचे वर्चस्व दिसत असले तरी त्यात प्रेमरुपी आदर असायचा, जो आजही असला तरी पूर्वीचे असे बंध असंख्य चित्रपटात, गोष्टीत अजूनही रेखाटलेली जातात. आता तर कोविड प्रादुर्भाव प्रेरित असलेल्या विश्वात मास्क लावणे क्रमप्राप्त बंधनकारक असल्यामुळे मिशी आहे का? दाढी केली का? हेच मुळी दिसत नाही, त्यामुळे दाढी केली का नाही केली काय फरक पडतोय.
विवा
060421
ReplyForward |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा