सोमवार, २९ मार्च, २०२१

. . . . रुग्णालयातील बेडवरून . . .

 . . . . रुग्णालयातील बेडवरून . . .


शनिवार 13 मार्च, (का कुणास ठावूक 13 शुभ का अशुभ), सकाळी-सकाळी 07.40 च्या सुमारास शरीराच्या मध्यवर्ती केंद्राने काही मागण्यांसाठी संप पुकारण्याची हाळी दिली, पेशी सैरावैरा धावून घामाघूम झाल्या आणि बाह्यांग हादरल्याची जाणीव झाली. सौ ने काहीतरी धोक्याची सूचना दिली. पण मेंदूला त्वरित सूचना केली आणि तडक स्वतःहून सोसायटीतील मित्र डॉक ला समोरून साद घातली. डॉक आणि अन्य सवंगडी सावरले आणि त्वरेने प्राथमिक तपासणी करून कार्डियोलॉजिस्ट ना कल्पना देऊन अ‍ॅडमिट केले. कार्डियाक नियमानुसार चाचणी, उपचार सुरू झाले. परंतु मध्यवर्ती संस्था ऐकण्याच्या स्थितीत अजिबात नव्हती. रुसुन हटुन बसली आणि उपचारकर्त्या डॉकची काळजी वाढविली. याची कल्पना या जागृत मनाने हेरली (हे विशेष होते की संपाने अजून मनावर ताबा मिळविला नव्हता) याच अनुषंगाने विचार करून जेएनपीटीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचा पाठ असलेला नंबर सांगून, पुढील ट्रिटमेंट साठी अपोलो रुग्णालयात जाऊया असे सुचवल्यावर मित्र डॉक आणि कार्डियोलॉजिस्ट ने आतापर्यंत धीराने आणि संयमाने उपस्थित असलेल्या सौ ला अणि चिरंजीवाला विचारून त्वरित निर्णय घेतला.

कार्डियाक रुग्णवाहिकेतला प्रवास सुरू झाला. एरवी हायवेवर पापु... पापु.... करत जाणारी रुग्णवाहिका दिसली तरी काळजात धस्स होते, कसा असेल आतला रुग्ण , आपण आपल्या वाहनात असल्यावर रुग्णवाहिकेला मार्ग देतो, सिग्नलला न थांबता वाट करून दिली जाते, असेच आता सुद्धा रुग्णवाहिकेचे होत असेल का ? असा पुसटसा विचार मनाला चाटून गेला आणि अपोलो आले, रुग्णवाहिकेतील डॉकने बॉईजना सूचना दिल्यात आणि सरळ प्रवेश देत चेकिंग सेंटर ला पोहोचलो.

जेएनपीटीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या आगाऊ सूचनेनुसार अपोलोचे कार्डियोलॉजिस्ट उपस्थित होतेच. जुजबी चाचण्या, ईसीजी, टूडिइको, कोरोना चाचणीचे सोपस्कार आटोपल्यावर ओटीकडे नेण्यात आले. या प्रवासात देखील ओटी म्हणजे लाल दिवा, बंद दाराआड चालू असलेली तोंडाला मास्क लावून डॉ ची धावपळ, ट्रे घेऊन इकडे तिकडे धावणाऱ्या नर्सेस आणि आत भितीने अधिक कुलिंगने गारठलेला पोटात पाय घालून बापुडा देह असे चित्र तराळून गेले.

ओटी टेबलावर विराजमान झाल्यावर शस्त्रक्रियेसाठी लागणार्‍या सर्व गोष्टींची पूर्तता होत होती. मुख्य डॉ सर्वाना सूचना देत होते. मघाशी म्हटल्याप्रमाणे गारठलेला देह आणखीनच गोठला कारण नाजूक जागेच्या दुखण्यावर नाजूक भागातूनच सुरुवात करणार होते त्यामुळे अनावृत्त करण्यात आले होते.

( अँजिओग्राफी - अ‍ॅन्जिओप्लास्टी थोडक्यात)

अँजिओग्राफी करण्यासाठी मांडीचा सांधा जवळ असलेले क्षेत्र ॲनस्थेटीकने  बधीर केले जाते. धमनीमध्ये एक लहान नळी घातली जाते जी कॅथेटर म्हणून ओळखली जाते. कॅथेटरमध्ये डाय टाकून इंजेक्शन दिले जाते आणि रक्तवाहिन्यांमधून डाय असलेल्या रक्तासहित एक्स रे घेतला जातो. याने रक्तपेशीतील कोणत्याही प्रकारचा अडथळा उठून दिसतो आणि या तपासणीत कोरोनरी आर्टरीला अवरोध (Block) असल्याचे निदर्शनास आले, आणि डॉ नी अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय त्वरित घेतला.

यामध्ये कॅथेटर मधून एक सूक्ष्म स्टीलची अशी गाइडिंग वायर पुढे सरकवतात. या वायरची हालचाल एक्स-रे स्क्रीनिंग मशीनमध्ये व्यवस्थित दिसते, नियंत्रित हालचाली करून हृदयरोगतज्ज्ञ ही वायर अवरोध असलेल्या आर्टरीमध्ये शेवटपर्यंत आत ढकलण्याचा प्रयत्न करतात. या वायरच्या साहाय्याने या वायरवरूनच डायलेटेशन कॅथेटरनामक एक छोटी नळी अवरोधापर्यंत (ब्लॉक पर्यंत) नेण्यात येते. या कॅथेटरच्या पुढील टोकास एक लांबूळका फुगा असतो ( बलून डिलेशन कॅथेटर) एक्स-रे स्क्रीनिंगच्या साहाय्याने समोरच्या मॉनिटरवर बघून हा बलून अवरोध जिथे आहे, त्या योग्य ठिकाणी ठेवून त्याला फुगवण्यात येते. काही वेळानंतर मग फुग्यातील दाब कमी करण्यात येतो. अवरोध हा मुख्यत: चरबीने बनलेला असल्यामुळे या बलूनद्वारे दाबला जातो व आर्टरी पूर्ववत होऊ शकते. मग वायर, बलून कॅथेटर आणि गाइडिंग कॅथेटर काढून घेण्यात येतात. बलून फुलवण्यात येतो तेव्हा ब्लेडद्वारे कडक अवरोध कापला जातो आणि मग तेथे अ‍ॅन्जिओप्लास्टी केली जाते. त्यानंतर त्याच जागी अवरोधाच्या आकारमानाप्रमाणे स्टेंट निवडला जातो आणि बलून अ‍ॅन्जिओप्लास्टी प्रमाणेच त्या ठिकाणी स्टेंट बसवण्यात येतो.

आणि या प्रकारे 13 मार्च शनी सकाळी 0740 सुरू झालेल्या त्रासाची सांगता 1230 ला झाली, आता देखरेखीखाली 24 तास आय सी यू मध्ये राहण्याचे आदेश देऊन डॉक मार्गक्रमित् झाले.

आय. सी. यू.चा गणवेश अंगावर चढला होता. पायजमा कमरेत ढीलाढाला, शर्टाला गुंडय़ा, हे सारं नवं होतं. कारण आता अस्तित्वच मुळी फक्त एक पेशन्ट असे उरले होते. पुढचे 24 तास तीच माझी ओळख होती. त्याच्याच जोडीला हॉस्पिटलचा एक बारकोड स्टिकर्सवर मनगटावर मिरवत होता. सत्तावन्न वर्षांचे माझे आयुष्य दोन सेंटिमीटरच्या बारकोडमध्ये सामावले गेले होते. माझी नोकरी, ज्ञान, अनुभव, पदे, प्रतिष्ठा जणू सारं काही विरघळलं किंवा वितळलं होतं आणि मी फक्त एक रुग्ण म्हणून उरलो होतो. पुढचे 24 तास माझ्या क्युबिकलमधून मी फक्त निरीक्षण करू शकत होतो. आय.सी.यू.तले सगळे उग्र वास, माझ्याच हृदयाची गती, स्पंदने आणि खाली वर होणारे प्राणवायूचे आकडे. दोन्ही हातांना थ्रीवे निडल्स खुपसलेले त्यातून विविध जातींची आयव्ही (आपल सलाईन) शरीरात झिरपत होते. फोन, चष्मा आणि घड्याळ नसल्यामुळे वेळेचे काही सोयरसुतक नव्हते. शेजारच्या रुग्णांपासून पडद्यांनी फारकत केलेली. आणि ते दोघेही व्हेंटिलेटरवर असल्यामुळे जाणिवा-नेणिवांच्या पलीकडे. ब्रदर्स, नर्सेस कामात प्रचंड व्यग्र आणि डॉक्टर मंडळी ठरावीक वेळेला येऊन ठरावीक विषय आणि पुढचे निर्णय याबद्दलच बोलणार. एकाकीपणा म्हणजे काय,  याचा मला खूप मोठा, अंगावर येणारा अनुभव आला. बेडवर आडवे पडून वरच्या पांढऱ्या छताकडे पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. आय.सी.यू.तल्या रुग्णाला एक मन असते.  त्यात काळजी, माया, विरह, ताटातूट आणि तडफड या भावना असतात. त्या कशा आणि कोणी मॉनीटर करावयाच्या? हे जाणवले. या आय सी यू ने एक आरसा आणि प्रतिबिंब हि दाखविले. गत आयुष्यात म्हणा किंवा अगदी कोरोना काळात साध ताप थंडी सर्दी पडसे खोकला यांना देखील रोखून धरले. आहार विहार देखील मर्यादित, मित्र, इष्ट मित्र, आप्तेष्ट परिवार यांच्याशी चांगल्याप्रकारे नाते. नातीगोती, मित्र, समाज आपले हे, आपण संपुर्ण असल्याने आपले असतात. आतापर्यंत हरवलेल्या वस्तुत आयुष्य शोधणे, निरोगी जगण्याचे स्वप्नं सगळ्यानी बाळगणे, ते प्रत्यक्षात आणणे खूप कठीण असते. प्रत्येक गोष्टीत प्रत्यक्षात आनंद मिळविणे आणि त्याचे मानसिक समाधान मिळणे हे अमृत साधने सारखे आहे. आपल्या प्रति आणि सर्वांप्रति आदर, प्रेम भावना निर्माण असणे आणि होणे अत्यंत गरजेचे आहे, हेच आपणास दुखा:तून तारून नेण्याचे मार्ग आहेत. आलेल्या संकटास धैर्याने तोंड देणे आणि स्वअनुभवातून इतरांना सावध करणे हे कर्तव्य आहे. आयुष्य आहे तोपर्यंत सुखदुःख येत राहतील पण त्यासाठी देवाने दिलेला हा देह अधिक सुंदर ठेवावा याचे प्रयत्न अवश्य करावेत. निरोगी मन आणि निरोगी तन या शिदोरीवर आपल्या सर्वांनीच सहस्त्रदर्शचंद्र सोहळ्याने व्हावी , असेच एक पूर्ण स्वप्नं पाहून आय सी यू बेडवर कधी पहुडलो हे कळलेच नाही.

(विजयकुमार वाणी)
------------
(याच लेखनातून सोसायटीतील जीवश्च एडव्हेंचर ग्रुप त्यातील प्रामुख्याने डॉक, सोसायटीतीलच कार्डियोलॉजिस्ट, जेएनपीटीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, अपोलोचे दोन्ही कार्डियोलॉजिस्ट आणि आप्तेष्ट मित्र अपोलोचे बालरोगतज्ज्ञ विभाग प्रमुख यांचे ऋणनिर्देश होणे आवश्यक आहे. संयमाने सर्व परिस्थिती हाताळत धीर देणारी सौ आणि चिरंजीव यांचे नव्या हृदयात स्वागत आणि आप्तेष्ट, इष्ट मित्र, ज्येष्ठ , कार्यालयीन सहकारी यांच्या शुभेच्छाच्या बळावर नव संजीवनी प्राप्त झाल्यामुळे सर्वांचेच मनःपुर्वक आभार) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: