गुरुवार, १९ मे, २०११

उपनयन

उपनयन म्हणजे काय ?

मुंज/उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रियैश्य या वर्णांतील तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठीच सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होउन स्वत:च्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.

काही वर्षांपर्यंत फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य वर्णांतील पुरुषांना हा संस्कार करवून घेण्याचा अधिकार असे. नवीन मतप्रणालीनुसार, विशेषत: नागरी महाराष्ट्रात, हे बंधन शिथिल होत चालले आहे.

गायत्री मंत्राचा उपदेश देवासवितरेश ते ब्रम्हचारी आणि मंगलाष्टका नंतर बटूचे आचार्य जे मुख निरीक्षण करतो, यापैकी, प्रत्येकाला उपनयन समजणारे तीन पक्ष होतात. वेदाध्यानाला सुरवात या दृष्टीने गायत्री मंत्राच्या उपदेशाला अनन्य साधारण महत्व देण्यात येते. आपल्या हिन्दु धर्माचा, या विश्वाचा मुळ जो प्रजापति, त्याला बटु (कुमार) अर्पण करणे हा ऐतेहासिक व अत्यन्त महत्वाचा भाग आहे. म्हणून त्याचे सोळा संस्कारात , परम्परा या दृष्टीने विशेष महत्व आहे. य्द्नोपवित, जान्वे वैगेरे, प्रजापतिचे रुप घेण्याची साधने आहेत. उपनयन म्हणजे आपला मुळ जो प्रजापति, आत्म्याने त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे, त्याची विद्या आपण मिळविण्याचा प्रयत्न कारणे , केवळ या प्रमाणावरून पहाता ज्याना वेदाधिकार पाहिजे असेल त्यानी हा संस्कार करावयाचा आणि वैदिक व्हावयाचे असा मुळ उद्देश उपनयन संस्करात दिसतो सर्व सोळा संस्कारात उपनयन संस्कार श्रेष्ट होय. हा संस्कार केल्याने बटुला वेदाध्यानाचा अधिकार प्राप्त होतो. तसेच त्याला वैदिक धर्मात संगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो.
शास्त्रता: हा संस्कार त्रिवर्णकाना करण्याचा अधिकार आहे. परन्तु सध्या हा संस्कार विशेषता: ब्राह्मणात, फार तर थोड्या क्षत्रियात आणि वैश्यात करण्यात येतो. याला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे. पहिला जन्म आई बापा पासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून आणि आचार्य यांच्या मुळे प्राप्त होतो. असे या संस्काराचे वर्णन वेदांतात वर्णिलेले आहे.
उप नयनाचा काल:
प्रत्येक वर्णाच्या लोकांना उप नयनाचा काल वेगळा सांगितला आहे. आठ, अकरा, व बारा अशा क्रमाने, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांना काल सांगितला आहे. अनुक्रमे सोळा, बावीस, व चोवीस वयाच्या पुढे तरी उपनयन रहाता उपयोगी नाही.
उपनयन संस्कार बंद पडला असल्यास ;
उपनयन संस्कार तिसऱ्या पिढीत बंद पडला असल्यास, चौथ्या पिढीस प्रायच्शित देवून, पुन्हा संस्कार सुरु करण्याचे सर्वं ग्रंथकारांचे एक मत आहे. काही ग्रंथ कारांच्या मते बारा पिढ्यातही संस्कार बंद पडला असल्यास सुरु करता येतो,आणि काही ग्रंथाच्या मते हा संस्कार केव्हाही सुरु करता येतो.
घाणा भरणे, मंडप प्रतिष्टा हे काही गौण विधी आहेत.
अधिकारी :
उपनयन करण्यास मुख्य अधिकारी पिता होय.त्यानंतर आजोबा, भाऊ, किंवा जातीचा कोणीतरी, परंतु ज्याची मुंज करावयाची त्या पेक्षा वडील असावा.

उपनयन, मुंज:

महाराष्ट्रात मुंज या नावाने लोकप्रिय असलेला उपनयन हा अत्यंत महत्त्वाचा शुद्धिसंस्कार आहे. तेणेकरून मुलास अध्ययन व ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा दिली जाते. ब्राह्मण आपल्या मुलांची मुंज जन्मानंतर आठव्या वर्षी साजरी करतात, तर क्षत्रिय अकराव्या वर्षी आणि वैश्य बाराव्या वर्षी करतात. तथापि कालावधीबाबत थोडेफार स्वातंत्र्य दिलेले आहे. उपनयनाच्या सुयोग्य मुहूर्ताबद्दल धर्मशास्त्राने गुंतागुंतीचे नियम विहित केलेले आहेत.

धार्मिक विधीच्या प्रारंभी घाणा, गणपतिपूजन, मातृकापूजन आणि पुण्याहवाचन हे उपचार यथास्थित केले जातात. जर चौल ह्यापूर्वीच केलेले नसेल तर उपनयन प्रसंगी उरकून घेतात. वडील आपल्या मुलाचे डोक्यावरील काही केस कापतात. तदनंतर शेंडी व्यतिरिक्त उर्वरित केस न्हाव्याकडून कापून घेतात. बटूस (मुलास) स्नान घातले जाते. मुंज झालेल्या अविवाहित मुलांसोबत आई बटूस आपल्या मांडीवर बसवून भरविते आणि त्याच थाळीमधून स्वतः अन्नग्रहण करते.

मुंजीची मुहूर्तवेला समीप येत असताना बटू आणि त्याचे वडील ह्यांच्या दरम्यान दोन पुरोहित कुंकवाने स्वस्तिकचिन्ह रेखाटलेला अंतरपाट धरतात. पुरोहित मंगलाष्टके म्हणतात आणि आमंत्रित पाहुणे बटू आणि त्याच्या वडिलांवर अक्षता टाकतात. मुहूर्तसमयी पुरोहित मंगलाष्टके समापत करून उत्तरेकडे अंतरपाटा ओढतात. बटू वडिलांना साष्टांग नमस्कार करतो. मंगल वाद्ये वाजू लागतात आणि पानसुपारी देऊन आमंत्रितांचा सत्कार केला जातो.

उपनयन संस्काराचा आता प्रारंभ होतो. होमाग्नी प्रज्वलित करून त्यात तूप, तीळ आणी सात प्रकारच्या समिधा अर्पन करतात. लंगोट आणि पंचा असा पोषाख करून बटू ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा देण्यास्तव पुरोहितास हात जोडून विनंती करतो. पुरोहित विनंती मान्य करून त्यास पवित्र यज्ञोपवीत आणि पलाश वृक्षाचा दंडा देऊन ज्ञानार्जनास्तव उपदेश करतो. सूर्याची प्रार्थना केल्यावर बटूदेखील अग्नी समिधा अर्पण करतो. पुरोहित यज्ञाची सांगता करतो, आणि बटूस कानमध्ये गायत्रीमंत्र सांगतो. बटू गायत्रीमंत्राचा पुनरुच्चार करतो.

तदनंतर महत्त्वाचा विधी म्हणजे भिक्षावळ. गणेशमंदिरात जाऊन गणेश स्तोत्रा म्हणतात. कार्यस्थळी परतल्यावार `ओम भवति, भिक्षाम देहि' अशा शब्दात बटू आईचे आर्जव करतो, आई वात्सल्याने ओतःपोत अंतःकरणाने बटूस आशीर्वाद देऊन मिठाई तसेच सोन्या चांदीचे नाणे भिक्षा म्हणून देते. इतर आंमत्रित महिलासुद्धा भिक्षा घालतात. ब्रह्मचाऱ्याने भिक्षा मागूनच उदरनिर्वाह करावा अशी या विधीमागची भावना आहे. उपनयनातील अंतिम विधी मेधाजनन हा होय. मेधा म्हणजे बुद्धी. मेधाजनन विधीमुळे बटूची बुद्धी अध्ययन व वेदाभ्यास करण्यास समर्थ बनते अशी श्रद्धा आहे. म्हणून ज्ञान आणि वैभव यांच्या प्राप्तीस्तव बटू बुद्धिदेवतेची प्रार्थना करतो. पूर्वीच्या काळी हा विधी उपनयनाच्या चौथ्या दिवशी साजरा करीत असत. अलीकडे मात्र मेधाजनन त्याच दिवशी उरकून घेतात.

उपनयनाची सांगता करताना सुपारी आणि कलश या रुपातील अनुक्रमे गणपती आणि वरुण या देवतांना आवाहन करून नमस्कार करतात. आता बटू ब्रह्मचर्यातश्रमात पदार्पण केलेला असतो. त्याने बारा वर्षे अध्ययन करावयाचे असते. अध्ययनांनतर त्याचा समावर्तन म्हणजे सोडमुंज हा विधी करणे अगत्याचे असते. आधुनिक काळात मात्र सोडमुंज उपनयनानंतर लगेच उरकतात. त्यामध्ये बटू दर्भाची मुंज तसेच लंगोटी काढून टाकतो. जरीकाठी धोतर, कोट उपरणे, जरीची टोपी आणि पादत्राणे परिधान करून बनारसच्या यात्रेस जाण्याचे नाटक करतो. तथापि त्याचा मामा त्या मार्गापासून त्यास परावृत्त करतो आणि आपल्या मुलीचा त्याच्याशी विवाह करून देण्याचा संकल्प सोडतो, की जेणेकरून बटूने पुढे योग्य वेळी विवाहबद्ध होऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: