गुरुवार, २१ एप्रिल, २०११

श्री कुलस्वामिनी पौर्णिमा महोत्सवकुलस्वामिनी नगर, ज्ञान मंदिर संकुल, डोम्बिवली (पूर्व) सर्वं कुलस्वामिनी भक्तांना सादर प्रणाम,
कुलस्वामिनी नगरात आपले सर्वं देवी भक्तांचे मन:पूर्वक स्वागत. गत वर्षाभरातील पौर्णिमांच्या व्रतांच्या उपासनेचे पहिले चरण आज संपन्न होत आहे. उपासना म्हणजे देवतांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न. या आशीर्वादाने, यश, प्रगती, आनंद, धन, आरोग्य मिळविण्याचा मार्ग सुकर होतो. उपासनेमध्ये एक अप्रतिम शक्ती आहे, जिच्या द्वारे अनेक अडथळे, दु:ख, प्रश्न, यावर मात करून आपला आत्मविश्वास वाढवू शकतो, आणि आत्मविश्वास वाढला तर अनेक गोष्टींची उकल सहज होऊ शकते, हे तर सर्वं ज्ञातच आहे. उपासनेवर विश्वास ठेवून आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता उपासना केली तर त्याचा जीवनात नक्कीच लाभ होईल. हाच एक धागा पकडून, डोंबिवलीतील कुलस्वामिनी भक्तांनी दर पौर्णिमेला, वेग-वेगळ्या निवासस्थानी हे उपासनेचे व्रत आरंभिले, या व्रताच्या सांगतेचे प्रथम चरण पूर्ण होत असल्या कारणे, कुलस्वामिनी पौर्णिमा महोत्सवाच्या रूपाने आपल्या सर्वासमोर सादर होत आहे. या कुलस्वामिनी महोत्सवात सामुहिक पूजा, होम, हवन करण्यात येत आहेत. हेतू हाच की, या द्वारे एकाच समाजाच्या १६ कुलदेवातांचे पूजन एकाच वेळेस, विद्या नगरीच्या पुण्य स्थळी आकाराला येवून मंत्र उच्चाराचा श्रवण लाभ सर्वं भाविकांना मिळून, एकत्रीकरणातून समाज उन्नती साठी याचा लाभ व्हावा. या कुलस्वामिनी महोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न होत आहे, सायं प्रार्थनेच्या समयी आदी शक्ती महा माया आणि स्त्री शक्ती या विषयावर जळगावस्थित आचार्य श्री दादा जोशी यांच्या प्रवचनाचा लाभ भाविकांना होणार आहे. याही कार्यक्रमाचे वैशिठ्य संस्कार वाणीने जपले आहे, ते आकर्षक अशा महाआरती सोहळ्याने, ते साकार होणार आहे, आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आणि सहकार्याने. श्री कुलस्वामिनी पौर्णिमा महोत्सवाची सर्व माहिती या पुस्तिकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. आदी माया , आदी शक्ती आणि साडे-तीन शक्ती पिठाची निर्मिती, लाड वाणी समाजाच्या १६ कुल्देवन्ताची सचित्र माहिती, जाण्या येण्याचे मार्ग, नकाशासह दाखविले आहे. या शिवाय संस्कार वाणीच्या समाज संस्कृती दिनाच्या दिवशीचे सर्वं स्त्रोत्र पुर्नमुद्रित करीत आहोत. श्री कुलस्वामिनी पौर्णिमा महोत्सव यशस्वितेसाठी पौर्णिमा उत्सवात सहभागी होणारे भाविक आणि सर्वं समाज बांधव तर आहेतच, पण सामुहिक पूजा करणारे सर्वं पुजार्थी, पूजा, होम हवन साठीचे खास चाळीसगावाहून आलेले ब्रह्मवृंद, डोंबिवली विभागात कार्यरत सर्वं सामाजिक, आर्थिक, समाजसेवा मंडळे, मुंबई विभागात कार्यरत असलेले समन्वय समिती, संस्कार वाणी यांचेही मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे श्री कुलस्वामिनी पौर्णिमा महोत्सव ज्या ज्ञान मंदिर शाळेच्या प्रांगणात आयोजित होत आहे, त्या उदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अनमोल सहकार्य शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्यांचे ऋणनिर्देश मानणे तर कर्तव्याचे ठरणार आहे. असेच सहकार्य भविष्यातील उपक्रमांना मिळेल हे निश्तितच आहे, पुन्हा एकदा आपले सर्वांचे ऋण व्यक्त करून, सर्वांचे आभार. आपले श्री कुलस्वामिनी पौर्णिमा महोत्सव समिती, संस्कार वाणी, डोंबिवली विभाग.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: