बुधवार, २ जून, २०२१

आप्पा

 *आप्पा*


तसा 30 वर्षांचा कालावधी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील फार मोठ्या परिवर्तनाचा काळ.   जन्मापासून ते 30 वर्षे म्हणजे संगोपन, शिक्षण,  नोकरीची सुरुवात , लग्न आणि कुटुंब वृद्धीस सुरुवात असते.   या 30 वर्षानंतरची म्हणजे,  पूर्णता नोकरी,  व्यवसाय मुलांचे शिक्षण, त्यांच्या नोकरी,  व्यवसायाचे गणित,  त्यांची लग्न,  आणि सेवानिवृत्तीचा काळ.  


याच दोन 30 वर्षांच्या परिवर्तन काळाचा आढावा आज घ्यावासा वाटतोय.   पहिल्या 30 वर्षात माझ्यासाठी होते ते पितृछत्र आप्पा.  पहिल्या  तीन वर्षापर्यंत संगोपनाची जबाबदारी त्यांच्या अर्धांगिनी अर्थात आईकडे कडे होती,  पण आईच्या अकाली निधनाने,  तीन ते तीस वर्षे आप्पांनी आई आणि वडील अशा दोन्ही नात्यात गुंतून संगोपन,  सांभाळ करून एका महत्त्वाच्या टप्प्यावर आणून उभे केले.  शिक्षण,  नोकरी,  लग्न आणि नातीचा पण सांभाळ करून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील दुसरा 30 वर्षांचा कालखंड जगले.  


त्यांच्या दुसर्‍या 30 वर्षांच्या काळात त्यांनी अनेक परिवर्तने पाहिलीत.  सुखाच्या गोष्टी दूरच पण दुखा:सही हिमतीने कवटाळून सर्वावर मात करीत,  सुखी राहण्याचा प्रयत्न करून खरोखरच सुखात परिवर्तन केले.   एकूण सहा जणांचे संगोपन,  सांभाळ, त्यांची शिक्षणे आणि त्यांची सर्वांचीच योग्य स्थळी विवाह करणे,  एवढे सोपे नसणारे कार्य त्यांनी लीलया केले.  या कार्यात ते एवढे गुंतून गेले होते की,  संसार हाच त्यांचा परमार्थ होता.  त्यासाठी त्यांना तीर्थ क्षेत्री जाण्याचा मोह झाला नसला , तरी सद्गुरू चरणी त्यांची सेवा कायम होती.  श्री नवनाथ,  श्री गुरू चरित्र पारायणे, नित्य पूजेचा संस्कार तर आजतागायत श्री व्यंकटेश स्तोत्र,  रामरक्षा आणि श्री दत्त आरतीच्या रूपाने सुरू आहे.  


संसाराच्या कार्यात झोकून दिलेला ह्या देहाने,  1957 ते 1990 अशी 33 वर्षे जगविख्यात फियाट कंपनीत सेवा केली.   सेवेत सुद्धा प्रामाणिक आणि खडतर मेहनतीने स्टोअर्स इनचार्ज म्हणुन सेवानिवृत्त झाले.  संसार,  नोकरी या व्यतिरिक्त सामाजिक कार्यातही मुंबई विभागातून जबाबदारीने कार्य केले.   पंढरपुर धर्मशाळा,  शैक्षणिक ट्रस्ट या महाराष्ट्र पातळीवरील संस्थेत विश्वस्त म्हणुन कार्य केले.   अनेक सामाजिक संस्थांचे उत्तरदायित्व स्विकारुन त्यांना मुंबईतून आर्थिक सहाय्य मिळवून दिले.   नात्यातील,  समाजातील शिक्षित तरुणांना नोकरी मिळवून देऊन त्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्था आणि लग्न करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला. 


अशी अनेक कार्ये कमी म्हणुन की काय,  राजकीय क्षेत्रातही आप्पा वाणी रूपाने मुंबई भाजपाच्या वर्तुळात नावारूपास आलेले व्यक्तिमत्त्व.  दिवंगत खासदार जयंतीबेन मेहता , प्रमोद महाजन , राम नाईक या सर्वांसाठी आदरार्थी आप्पा होते.   या व्यतिरिक्त विक्रोळी विभागातील सर्व पक्षीय,  सर्व जाती धर्माच्या पुढाऱ्यांशी जवळीक होती.   सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सल्लागारही होते.   त्यांच्या मृदू स्वाभाविकतेने आप्पांच्या घराशी सर्वाचेच संबंध होते.  या कारणाने आप्पांच्या निधनाने संपूर्ण विक्रोळी परिसर श्रध्दांजली अर्पून बंद ठेवण्यात आला होता,  एवढी लोकप्रियता आप्पांना होती. 


होय,  आज 3 जून,  आज तीस वर्षांपूर्वी आप्पांचे निधन सर्वांच्याच हृदयाला धक्कादायक होते.   सकाळी 1030 वाजता नित्यकर्म आवरून निघालेले आप्पा सर्व प्रिय जणांना भेटून एक दीड तासात घरी आले आणि आई आणि सून  सुवर्णाशी छोटासा संवाद साधत असतानाच अति तीव्र हृदयातील वेदनेने निधन झाले.   त्यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली पण त्यांच्या संस्कारांनी निर्माण केलेली पिढी त्यांच्या कार्यातून स्वर्गीय आप्पांची आठवण कायम ठेवत आहेत,  हिच *आप्पांना आदरांजली श्रध्दांजली*.

शनिवार, २२ मे, २०२१

श्री नवनाथ

 प्रणाम अलख आदेश,

गोरक्ष खंड २
श्री नवनाथ संप्रदायाची वेशभूषा

नाथसंप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्रीदत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे, तर सिद्धिदाता गुरू आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेत ‘ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया’ असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धिसामथ्र्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यांमध्ये नाथसंप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यत: इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथसंप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथसंप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्तगोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयाने गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पाहावयास मिळतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नागनाथ आदि नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे सातशे वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार या संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्रीदत्तप्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ, रेवणसिद्ध व गहनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्रीदत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते.

नाथपंथीयांची वेशभूषा

१) भस्म- भस्माला विभूती असेही म्हणतात. काही ठीकाणी क्षार असाही उल्लेख आढळतो. भस्म हे योग्याच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे. ते काही असले तरी नाथपंथीयाने भस्म हे लावले पाहीजे. सर्व देहाचे अखेर भस्मच होणार आहे. यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्माकडे मन केंद्रित करा असा संदेशच जणू काही भस्म देत आहे. शिवाय भस्मधारणेमुळे त्या त्या ठिकाणची शक्तिकेंद्रेही जागृत होतात. भस्माचे असे महात्म्य असल्यानेच नाथपंथीयांनी त्याचा अगत्याने स्वीकार केल्याचे दिसते.

२) रूद्राक्ष- हे एका झाडाचे फळ असून त्यास रूद्र अक्ष म्हणतात. शिवाचा नेत्र असा शब्दाचा अर्थ आहे. जपासाठी रूद्राक्ष माळ वापरतात. लक्ष्मी स्थिरावणे, शस्त्राघात न होणे अशा काही हेतूंसाठीही रूद्राक्षांच्या माळा विशेष करून वापरल्या जातात. शिवाय रूद्राक्षांचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत.

३) मुद्रा- मुद्रा हे नाथपंथातील एक महत्वाचे साधन आहे. ही मुद्रा कानाच्या पाळीस छिद्र पाडून त्यात घातली जाते. ही बहूदा वसंत पंचमीच्या शुभ दिवशीच धारण केली जाते. अशा मुद्राधारक योग्यांनाच कानफाटे योगी असेही म्हणतात.कारण ते कानात छिद्र पाडून ती धारण केलेली असते.

४) कंथा- कंथा हे भगव्या रंगाचे वस्त्र. यालाच गोधडी अथवा गुदरी असेही नाव आहे, आपल्या वाकळेसारखे चिंध्यांचे हे बनविलेले असते.

५) मेखला- सूमारे २२ ते २७ हात लांबीची ही लोकरीची बारीक दोरखंडासारखी दोरी असून, नाथ योगी ही कमरेपासून छातीपर्यंत विशिष्ट पद्धतीने गुंडाळतात. ही कटिबंधिनी मोळ्याच्या दोरीची करतात. कधी ही मेंढीच्या लोकरीचीही असते. मेखला दुहेरी पदरात असून तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू लावलेले असते.

६) हस्तभूषण मेखली- बारीक सुतळीएवढ्या जाडीची ही लोकरीची दोरी असून ती मनगटावर बांधतात. चार फुटांच्या या मेखलीवर रूद्रमाळ बांधलेली असते.

७) शैली- ही सुद्धा लोकरीची असून दुपदरी शैली जानव्यासारखी घातली जाते. शैलीच्या टोकाला लोकरीचा गोंडा असतो.

८) शृंगी- जानव्याच्या शेवटी अडकवलेली हरणाच्या शिंगाची बनवलेली ही एक प्रकारची शिट्टीच होय. शृंगी बांधलेले जानवे ''शिंगीनाथ जानवे'' म्हणून ओळखले जाते. शृंगीची वा शिंगीची लांबी साधारणपणे एक इंच असते. भिक्षेचा स्वीकार केला, की शिंगी वाजविण्याचा प्रघात आहे.

९) पुंगी- ही सुद्धा हरणाच्या शिंगाची बनविलेली असते. साधु दारासमोर भिक्षेसाठी आला, की पुंगी वाजवितो. पुंगी शृंगीपेक्षा बरीच मोठी म्हणजे ७ ते ८ इंच लांबीची असते पुंगी डाव्या खांद्यात अडकवून ठेवलेली असते.

१०) जानवे- नाथपंथीयांचे जानवे हा एक विशेष प्रकार आहे. ते लोकरीच्या पाच -सात पदरांचे असून त्यात शंखाची चकती अडकवलेली असते चकतिच्या छिद्रात तांब्याच्या तारेने एक रूद्राक्ष बसविलेला असतो.त्याच्या खालीच शृंगी अडकवलेली असते. हा गोफ म्हणजेच नाथपंथी जानवे होय.

११) दंडा- दिड हात लांबीची ही एक काठी असते.हीस गोरक्षनाथ दंडा असे नांव आहे. नाथपंथी साधूच्या हातात ती असते.

१२) त्रिशूळ- साधनेत विशेष अधिकार प्राप्त झाला, त्रिशूळ वापरतात.नवनाथश्रेष्ठी त्रिशूळधारी होते सामरस्यसिद्धी ज्यांनी प्राप्त केली ते केवळ त्रिशूळधारी होत.

१३) चिमटा- अग्निदीक्षा घेतलेला साधक चिमटा बाळगतो. याची लांबी साधरणतः २७, ३२, ५४, इंच अशी असते. चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते. त्यात पुन्हा नऊ लहान कड्या असतात. नाथपंथीयांची चाल या विशिष्ट नादावर व धुंदीत असते. अग्निचे उपासक नाथपंथी धुनी सारखी करण्यासाठी चिमट्याचा उपयोग करतात.

१४) शंख- शंखास फार पुरातन काळापासून महत्व आहे. भगवान विष्णूंच्या हातातील शंख हेच दर्शवितो. भिक्षेच्या अथवा शिवाच्या दर्शनाच्या वेळी नाथपंथीय साधू शंख वाजवितात. शंखनाद हा ओंकाराचा प्रतिक मानला आहे.

१५) खापडी (खापरी)- नाथपंथी साधू फुटक्या मडक्याच्या तुकड्यावर भिक्षा घेतात. हा तुकडा म्हणजेच खापडी किंवा खापरी. कधी खापरी नारळाच्या कवटीची अथवा कांशाची बनवितात.

१६) अधारी- लाकडी दांडक्याला खालीवर पाटासारख्या फळ्या बसवून हे एक आसनपीठ तयार केलेले असते. कोठेही बसण्यासाठी योगी याचा उपयोग करतात.

१७) किंगारी- हे एक सारंगीसारखे वाद्य असून भिक्षेच्या वेळी नाथपंथी याच्यावर नवनाथांची गाणी म्हणतात.

१८) धंधारी- हे एक लोखंडी वा लाकडी पटट्यांचे चक्र असून त्याच्या छीद्रातून मालाकार असा मंत्रयुक्त दोरा ओवलेला असतो. याचा गुंता सोडविणे अतिशय अवघड असल्याने त्याला "गोरखधंधा" असेही नांव आहे. गुरूकृपेने हा गुंता सुटला तर संसारचक्रातून सुटका होईल अशी कल्पना आहे.

१९) कर्णकुंडले - जो कानफाट्या नावाचा संबंध नाथपंथाशी आहे. तो कानांस छिद्रे पाडून त्यात कुंडले अडकवितात. कुंडल धातुचे किंवा हरणाच्या शिंगाचे किंवा सुवर्ण गुंफित असते.

शनिवार, ८ मे, २०२१

राधेय - केशवसुत*

 ( आपल्या परिवारातील पाचोरा स्थित मेव्हणे आबासाहेब यांचे गुरुवार दिनांक 8 एप्रिल 2021 रोजी सकाळी 5 वाजता कोरोनाच्या आजारामुळे दुःखद निधन झाले.   अत्यंत दुःखदायक वृत्त पण ताई सुद्धा या आजाराने त्रस्त असल्यामुळे आपल्या सर्वांस कर्णोपकर्णी हे वृत्त समजले. त्यांच्या छोट्याश्या आठवणी लघुरुपात देत आहे.) 



*राधेय - केशवसुत* 

*एक आसामी,  एक रूबाबदार, एक मिश्किल,  भारदस्त आवाज,  साजेशी उंची,  टपोरे अन बोलके डोळे. भाषेवर प्रभुत्व आणि भविष्याची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने साजेशा असलेला स्वभाव म्हणुनच की काय आयुर्विमा महामंडळात विकास अधिकारी म्हणुन काम, पण तेही करताना अभिकर्त्यास, शिस्त आणि जबाबदारीचे भान ठेवून उत्पन्न मिळवून देण्याचे कार्य*. 


*विवाहोत्तर पावणेतीन तपाच्या (तीन दशके अधिक) कालखंडात महामंडळातील नियोजनबद्ध कार्याचे ठसे, दोन्ही सुतांच्या विवाहोत्तर सांसारिक आणि पारमार्थिक जगण्यातही जबाबदारीने उमटविलेत.  केशवसुत आणि राधेय पुत्र म्हणुन सार्थ अभिमान होता*. 


*आप्तस्वकीयांतील उपस्थिती आल्हाददायक असायची.  आदरयुक्त भाव , जिव्हाळा आणि नम्र विनोदी स्वभावाने अल्प काळातील भेट हि स्मरणीय ठरायची.  आदरातिथ्यशील स्वभावामुळे सगळ्यांना आपलेसे वाटत. एखाद्या गोष्टीतील त्यांचे हास्य बरेच काही सांगून जाई.* 


*व्यावहारिक,  प्रापंचिक,  पारमार्थिक आणि सामाजिक या सर्व बाबतीत उच्च पातळीवर कार्यरत असताना, गत वर्षभर अत्यंत घातक अशा विषाणू पासून स्व आणि कुटुंबाचे रक्षण करीत असतानाच अत्यंत क्रूरतेने, या   दाम्पत्यावर विषाणूने जीवघेणा हल्ला केला. अर्धांगिनी हि रूग्णालयात कडवी झुंज देत, यातून बाहेर येत होती.  आणि क्षणात कोणतीही आणि कुणालाही पूर्वसूचना न देता या जगाचा निरोप घेण्यास यांना भाग पडले.  एक धगधगता यज्ञ अचानकपणे कुणीतरी येऊन विझवावा अशी कृती झाली.  जाणे एवढे धक्कादायक आणि अकस्मात होते की,  अर्धांगिनीस याची कल्पना तरी कशी द्यावी,  नियती अत्यंत क्रूर पणे दोन्ही बालकांची परीक्षा पहात होती.*


*निर्माण झालेली पोकळी कशी भरून निघणार,  पुन्हा होणार्‍या अल्पशा भेटीत, बोलके डोळे आणि खुलून टाकणारे हास्य असणार का? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असणार आहेत,  हे ठावूक आहे,  पण मन यातून बाहेर येण्यास आणि सत्य स्विकारण्यास राजी नाही.* *साश्रू नयनांनी आदरांजली*. 

                       ---------

कोरोना काळातील आचार संहिता

 *वाणी समाज कोरोना काळातील आचार संहिता आणि उपाय योजना*


गेल्या २२ मार्च २०२० लॉक डाऊन  पासूनच्या काळापासून सामाजिक जाणीवांमध्ये पुन्हा पुन्हा त्याच चुका होत आहेत . त्याची काही ठळक कारणे : 

१) लग्न जमविण्याचा काळ साधारणपणे मार्च  ते मे  जून  असा असतो , गेल्या वर्षी संपूर्ण भारतभर लॉक डाउन असताना , आपल्या तिन्ही जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे सुरक्षेचे नियम न पाळता साखरपुडा, लाल गंध, शिष्टाचार , लग्न, लग्नानंतर विधी  अगदी हनिमून , परदेश दौरे सुद्धा असे कार्यक्रम बिनदिक्कत पणे होत राहिलेत . याचा परिणाम साधारणपणे, मे , जून  २०२० च्या महिन्यानंतर  तिन्ही जिल्ह्यासह मुंबई पुणे बांधवांमध्ये झाला आणि  हॉस्पिटलायझेशन , होम कोरंटाईन चे प्रमाण वाढू लागले.  


२)  लॉक डाऊन काळात सर्वच नोकरी , व्यवसायावर बंधने होती / आहेत . परंतु आपल्या  बांधवांचा सरासरी फार्मसी चा व्यवसाय किंवा शासकीय हॉस्पिटल मध्ये नोकरी , त्या करणे अत्यावश्यक सेवेत यांचे कार्य रात्रंदिवस सुरु  दुसरा व्यवसाय किराणा दुकान, हे हि  अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे निम्म्याच्यावर बांधव या सेवेत गुंतल्यामुळे संसर्गाचा धोका अधिकच जाणवत आहे .  


३) या व्यतिरिक्त दिवाळी नंतरच्या कालावधीत पुन्हा एकदा लग्न समारंभ धूम धडाक्यात झालेत .  गावातील , शहरातील एकमेकांच्या घरी जाणे , छोटे छोटे कार्यक्रम करणे असेही सुरु होते .  तसेच जानेवारी  ते  मार्च च्या  दरम्यान डिस्कॉउंटेड सहलींना  जाण्याने संसर्ग वाढत राहिला .  अंत्ययात्रांनाही गर्दी जमू लागली . दिवस कार्येही झालीत.  त्याचे परिणाम हळू हळू जाणवू लागले. 


४)  याचे परिणाम वाढू लागल्यानंतर जून २०२० पासून मृत्यूचे प्रमाण दिसू लागले , सुरवातीस दिवसास एक प्रमाण असलेला मृत्यू दर दिवसाला चार , पाच कधी कधी सहा पर्यंत पोहोचला.  पण यातही सुरक्षेचे सर्व नियम टाळून हॉस्पिटलात जाऊन रुग्णाची चौकशी , मृत्यू नंतर अंत्ययात्रेत सहभाग , द्वार दर्शनासाठी जाणे आणि दिवस कार्यांचे आयोजन, या सर्व  गरबडीत संसर्गाचे प्रमाण वाढत गेले आणि  हॉस्पिटलायझेशन , होम कोरंटाईन, मृत्यू दराचा आलेख वाढतच राहिला .  या ४२५ दिवसात एकूण  ११०० ते ११५० आसपास  मृत्यू झालेले आहेत . यातील स्त्री /पुरुष  प्रमाण , वयोमानाचे प्रमाण , मिळालेले उपचार किंवा उपचारा अभावी मृत्यू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक याचे अजून ठळकपणे विश्लेषण झालेले नाही, जे सामाजिक अभ्यासासाठी आवश्यक आहे . 

कोरोना काळात किंवा या पुढील काळात वाणी समाजाने काही नियम स्वतः साठी आणि आप्त स्वकीयांसाठी घालून द्यावे लागणार आहेत . 


१) सर्वात महत्वाचे लसीकरण , स्वतःचे , कुटुंबाचे , नातेवाईकांचे संपूर्ण समाजाचे.

२) विनाशुल्क, शुल्क, लसीकरण केंद्रासाठी मार्गदर्शन करणे , नोंदणी साठी आग्रही राहणे.

३) रोगप्रतिकारक औषधे आणि इंजेक्शनचा साठा / उपलब्ध ठेवणे 

४) आय सी यु केअर फॅसिलिटी, व्हेंटिलेटर , ऑक्सिजन व्यवस्था पाहणे 

५) सुरक्षित अंतर , मास्क , सॅनिटायझशन म्हणजेच वैद्यकीय प्रोटोकॉलची खबरदारी घेणे 

आणि

६) नातेवाईक, आप्तेष्ट यांना सर्वतोपरी सर्व नियमांचे पालन करूनच सहकार्य करा, त्यासाठी आवश्यक असेल तरच प्रवास करा, एकाच भेटीत, एकाच वेळेत शक्य असलेली सर्व कार्ये उरकून घ्या.

७) आप्तेष्टांचा मृत्यू झाल्यास, अमरधाममध्ये जाताना खूप काळजी घ्यावी, शक्यतो या कार्यात सहभागी होणाऱ्यांकडूनच कार्ये करून घ्यावीत, फुकाचा आत्मविश्वास दाखवून काही होत नाही म्हणुन अंतिम कार्ये म्हणुन स्वतःवर आणि उर्वरित कुटुंबावर संकट ओढवून घेऊ नका. सारी सरकवणे, अस्थी विसर्जन, दशक्रिया , गंधमुक्त आदी कार्यक्रम शक्यतो लांबणीवर टाकावेत आणि सर्व वातावरण निवळल्यावर करावेत, कोणत्याही नातेवाईकाचा, आप्तेष्टांचा विरोध असेल तर तो दुर्लक्षित करावा.



या साठी आर्थिक दुर्बल घटकांसाठी निधीची गरज / निकड भासल्यास तातडीची उपाययोजना 

१) साधारणतः एक कोविड पेशंट - ७ दिवस ऍडमिशन - अंदाजे खर्च रु २.७५ ते ३ लक्ष 

२) महिना भरात कमीत कमी ४ पेशंट गृहीत - रु .  १० लक्ष 

यावर  उपाय 

उपचारांसाठी नाशिक मध्यवर्ती स्थान ( हॉस्पिटल असल्यास प्राधान्य) निवडले जावे आणि त्या साठी , १) दोन फिजिशियन ची  नेमणूक केली असता , त्यांचा अंदाजे मासिक खर्च रु . ४ लक्ष   

२) स्वतः समाजाने प्राथमिक उपचार खर्चासाठी oxygen concentrator machine खरेदीचा प्रस्ताव ठेवला तर , कमीत कमी २५ मशिन्स रु . १२. ५० लक्ष (एकदाच ) 

३) औषधे आणि इंजेक्शन उपलब्धता अंदाजे खर्च रु. २ लक्ष  महिना 

४) अँब्युलन्स प्रवास खर्च रु . १ लक्ष 

५) लसीकरणासाठी (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे) अंदाजे २५००० पुरुष/स्त्री - खर्च रु. ७.५० लक्ष 

६) कोरोना काळात अर्थाजन करणारे घटकांचे निधन झाल्यामुळे तातडीचे आर्थिक सहाय्य्य रु. १ लक्ष प्रत्येकी , अंदाजे रू. २० लक्ष 

अशा प्रकारे 

रु.,४ लक्ष  + रु . १२. ५० लक्ष  + रु . २ लक्ष + रु. १ लक्ष +  रु.  ७. ५० लक्ष + रु . २० लक्ष  = एकूण  रु. ५० लक्ष अंदाजे 

आथिर्क तरतूद  : 

रु. १०००/- प्रत्येकी या प्रमाणे ५००० समाज बांधवांकडून एका वेळेस जमा आवश्यक , अथवा कायम स्वरूपी रु. १००००/- प्रत्येकी ५००० समाज बांधवांकडून रु. ५ कोटी जमा करणे आवश्यक . 


या साठी प्रत्येक गावातून २ प्रतिनिधी , तालुक्यातून २ प्रतिनिधी , जिल्ह्यातून ३ प्रतिनिघी या प्रमाणे एका जिल्ह्याची १५ जणांची कोअर कमिटी , तसेच ६ जिल्ह्यांची ६० जणांची कोअर कमिटी काम करेल .  

विजयकुमार वाणी
07052021.
------- 

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

खैरनार आप्पा पुणे

 श्री सिताराम विठ्ठल खैरनार ऊर्फ श्री खैरनार आप्पा, यांच्यावरील श्रध्दांजली पर लेख. 


*आप्पा*

एक अजोड व्यक्तिमत्त्व, पहिल्या भेटीतच त्यांच्या प्रेमात पडावे इतके लाघवी आणि प्रेमळ. स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्म पण मैत्री मात्र एकविसाव्या शतकातील सर्वांशीच . व्यवसायाची प्रचंड आवड आणि त्यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी. व्यवसाय वृद्धी साठी अगणित वेळा आणि अगणित ठिकाणी सरकारी, खाजगी वाहनाने अगणित मैल प्रवास करणारे एकमेव व्यावसायिक.

स्वातंत्र्योत्तर काळात खरे तर खान्देशवासी , धुळे, जळगाव, किंवा नाशिक या जिल्हय़ाच्या ठिकाणी व्यवसाय, नोकरी साठी स्थायिक होत होते, पण वेगळी वाट स्वीकारणाऱ्या आप्पांनी मावळातील पुणे निवडले, आणि विद्येच्या या माहेरघरात व्यवसायासाठी सुरवात केली. परंतु व्यवसायासाठी पुणे निवडणारे आप्पांनी कोकणात रोहा, महाड माणगाव, चिपळूण पर्यन्त व्यवसाय नव्हे तर नाते, स्नेह निर्माण केला .

स्वतः व्यवसाय करणार्‍या आप्पांनी 1960 पासून अगदी या दशकापर्यंत अनेक समाजातील हजाराहून अधिक तरुणांना शिक्षण मिळवून दिले, नोकरी मिळवून दिली, त्यासोबत राहण्यासाठी घर आणि लग्न सुद्धा करून दिलेत. स्वतः व्यवसाय करणार्‍या आप्पांनी ,तरुणांना व्यवसाय करावा, यासाठी आग्रही राहिलेत, त्यातील अनेक व्यवसायिक, उद्योजक आज कोटींची उलाढाल करणारे पुण्यातील, कोकणातील नामवंत उद्योजक आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळानंतर शिक्षित पिढी सामाजिक कार्यात सहभागी झाली त्याचे नेतृत्व आप्पांनी केले. सामाजिक मुखपत्र उन्नती चे प्रारंभिक कार्य आप्पांनीच केले. समाजातील अनेक संस्था, अनेक रुढी परंपरा, अनेक सामाजिक मेळावे, सामाजिक संमेलने, उपवर वधू परिचय संमेलने, या सर्वांत आप्पांचा सहभाग अग्रेसर नव्हे तर पुढाकार असायचा. स्पष्टवक्तेपणा ,परखड मते आणि पुरोगामी विचार यामुळेच समाजाच्या प्रगतीचा आलेख उंचावला. पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदी येथील धर्मशाळा आप्पांच्या कार्यकाळात उभ्या राहिल्या.

आज मितीला प्रत्येक शहरात जसे धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई या शहरात अनेक सामाजिक संस्था प्रचंड व्याप्तीने उभ्या आहेत. आप्पांसोबत कार्य करणारे अनेक समाज नेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. पण त्यांच्यासोबत काम करणार्‍यांची दुसरी पिढी सुद्धा आता समाज कार्यात कमी आहे, त्यामुळे आप्पांचा कामाचा कामाचा आवाका, आप्पांचे कार्य, याचा उलगडा होणे फार कठीण आहे. परंतु समाज कार्यात अढळ स्थान असणार्‍या या कर्मविराचे योगदान लक्षात रहावे आणि त्यांचे स्मरण व्हावे हिच आप्पांना, आप्पांच्या सान्निध्यातील सारे निकटवर्तीय यांच्याकडून *भावपूर्ण आदरांजली*. 

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

 दाढी कालची आणि आजची 


दाढी नित्यनियमाने रोज सकाळी उठून करण्याचा एक सोपस्कार.   ऑफिसला जाणारे,  स्वतःचा व्यवसाय असणारे, वेळेनुसार सवडीनुसार रोज किंवा एक दिवसाआड दाढी स्वतः,  घरी किंवा जमेल तेव्हा सलून मध्ये जावुन करत असतात.   

फार पूर्वी ते अगदी आताच्या दशकापर्यंत दाढी करणार्‍यांचा एक डब्बा असायचा, त्याची एक ठरलेली जागा असायची.  डब्बा कसा असावा याचे सुद्धा प्रमाण असायचे. अर्ध्या फुटाचा आणि दोन पेर बोट आत जाई एवढी खोली असलेला पत्र्याचा किंवा नंतर प्लॅस्टिकचे उपलब्ध होऊ लागल्यामुळे सर्रासपणे त्याचाच वापर होऊ लागला.   

तर या डब्यात असणार्‍या वस्तु सुद्धा प्रमाणशीर असायच्या.   बहुधा गोदरेज कंपनीचा गोल शेव्हिंग साबण डबी सह मिळायचा.  लाकडाचा निमुळता वर चॉकलेटी कलर तंतूमय मऊशार केस असलेला ब्रश,  रेझर म्हणजे स्टीलचे एक दांडी,  त्यावर एक ब्लेड राहील असे पाते मध्ये ब्लेड आणि त्यावरून पून्हा एक जाड पाते असा सेट,  सेव्हनओक्लॉक, टोपाझ, सुपरमॅक किंवा त्या त्या काळात/वेळेत/ठिकाणी उपलब्ध असणारी ब्लेड.  दाढी झाल्यावर फिरवण्यासाठी तुरटीचा खडा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्टँड असणारा डब्यात राहणारा आरसा, अशी सगळी सामुग्री असणारा दाढीचा डब्बा, याची जागा सुद्धा ठरलेली,  त्यात इकडे तिकडे सुद्धा हललेली किंवा जागा बदललेली कुटुंब प्रमुखांस चालायचे नाही. 

नित्य नियमाने दाढी करणारे म्हणजे कुटुंब प्रमुखच. शिक्षक असो,  कार्यालयात असो,  बँकेत असो किंवा व्यावसायिक असो त्यांचा एक सन्मान असायचा धाक असायचा.  सकाळी प्रातर्विधी आटोपल्यावर,  चहाचा कप आणि वर्तमानपत्राचे वाचून झाल्यावर, आंघोळी आधी दाढी असायची.  दाढी करण्याची जागा ठरलेली, उजेड हवा म्हणुन खिडकी जवळ किंवा अगदी दारातच येण्या जाण्या मार्गात असायची.   दाढीचा डब्बा घेऊन बसण्याआधी वाटीत / मग भर पाणी ठेवले जायचे.  

दाढीचे प्रकार पण मजेशीर.  संपूर्ण गालावर फेसयुक्त ब्रश फिरवायचा.  मिशी असणारे गालावरून आणि मिशी नसणारे, ब्रश फिरवताना दोन्ही ओठ आत दाबून ब्रश फिरवायचे.  ब्रश फिरवून झाल्यावर दाढी नरम होण्यासाठी गप्पा किंवा चर्चा करीत,  हळूच ब्लेड काढून,  दांडी आणि पात्यात अडकविले जाई.  कल्लेपासून हनुवटी पर्यन्त ब्लेड फिरवताना गाल अशा रीतीने फुगवले जाई की ब्लेड सरसर फिरवून गुळगुळीत करीत असे. मिशी नसणारे पुन्हा ओठ आत दाबून ब्लेड फिरवत.  दाढी पूर्ण झाल्यावर तुरटीचा खडा पाण्यात बुडवून दाढीवरून फिरविणे,  ब्लेड स्वच्छ करून पुन्हा पाकिटात ठेवणे,  एका ब्लेडने किती दाढ्या केल्या याची नोंद ठेवणे,  आणि पुन्हा डब्बा योग्य त्याच ठिकाणी ठेवणे.  असे सारे सोपस्कार मर्यादित वेळेतच व्हायचे हे महत्वाचे असे. 

आता या सर्व सोपस्कारत पूर्णपणे बदल झाल्याचे जाणवत आहेत.   डब्याची जागा मिरर सेल्फ मधील कंपार्टमेंट ने घेतली.  ब्लेड आणि त्याची सामग्री ची जागा युज अँड थ्रो ब्लेड,  मॅक थ्री,  ट्रिमर , गोल साबणाची जागा शेव्हिंग क्रिम, फोम, आणि हे सर्व सोपस्कार वॉशरूम मधील आरश्यात घाईघाईत काही क्षणात केले जातात.  पूर्वी दाढी कुटुंबातील सदस्यांसमोर केला जाणारा एक संस्कार होता.  त्यात दाढी करणाऱ्याचे वर्चस्व दिसत असले तरी त्यात प्रेमरुपी आदर असायचा,  जो आजही असला तरी पूर्वीचे असे बंध असंख्य चित्रपटात,  गोष्टीत अजूनही रेखाटलेली जातात.  आता तर कोविड प्रादुर्भाव प्रेरित असलेल्या विश्वात मास्क लावणे क्रमप्राप्त बंधनकारक असल्यामुळे मिशी आहे का? दाढी केली का? हेच मुळी दिसत नाही,  त्यामुळे दाढी केली का नाही केली काय फरक पडतोय. 


विवा 
060421

सोमवार, २९ मार्च, २०२१

. . . . रुग्णालयातील बेडवरून . . .

 . . . . रुग्णालयातील बेडवरून . . .


शनिवार 13 मार्च, (का कुणास ठावूक 13 शुभ का अशुभ), सकाळी-सकाळी 07.40 च्या सुमारास शरीराच्या मध्यवर्ती केंद्राने काही मागण्यांसाठी संप पुकारण्याची हाळी दिली, पेशी सैरावैरा धावून घामाघूम झाल्या आणि बाह्यांग हादरल्याची जाणीव झाली. सौ ने काहीतरी धोक्याची सूचना दिली. पण मेंदूला त्वरित सूचना केली आणि तडक स्वतःहून सोसायटीतील मित्र डॉक ला समोरून साद घातली. डॉक आणि अन्य सवंगडी सावरले आणि त्वरेने प्राथमिक तपासणी करून कार्डियोलॉजिस्ट ना कल्पना देऊन अ‍ॅडमिट केले. कार्डियाक नियमानुसार चाचणी, उपचार सुरू झाले. परंतु मध्यवर्ती संस्था ऐकण्याच्या स्थितीत अजिबात नव्हती. रुसुन हटुन बसली आणि उपचारकर्त्या डॉकची काळजी वाढविली. याची कल्पना या जागृत मनाने हेरली (हे विशेष होते की संपाने अजून मनावर ताबा मिळविला नव्हता) याच अनुषंगाने विचार करून जेएनपीटीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचा पाठ असलेला नंबर सांगून, पुढील ट्रिटमेंट साठी अपोलो रुग्णालयात जाऊया असे सुचवल्यावर मित्र डॉक आणि कार्डियोलॉजिस्ट ने आतापर्यंत धीराने आणि संयमाने उपस्थित असलेल्या सौ ला अणि चिरंजीवाला विचारून त्वरित निर्णय घेतला.

कार्डियाक रुग्णवाहिकेतला प्रवास सुरू झाला. एरवी हायवेवर पापु... पापु.... करत जाणारी रुग्णवाहिका दिसली तरी काळजात धस्स होते, कसा असेल आतला रुग्ण , आपण आपल्या वाहनात असल्यावर रुग्णवाहिकेला मार्ग देतो, सिग्नलला न थांबता वाट करून दिली जाते, असेच आता सुद्धा रुग्णवाहिकेचे होत असेल का ? असा पुसटसा विचार मनाला चाटून गेला आणि अपोलो आले, रुग्णवाहिकेतील डॉकने बॉईजना सूचना दिल्यात आणि सरळ प्रवेश देत चेकिंग सेंटर ला पोहोचलो.

जेएनपीटीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या आगाऊ सूचनेनुसार अपोलोचे कार्डियोलॉजिस्ट उपस्थित होतेच. जुजबी चाचण्या, ईसीजी, टूडिइको, कोरोना चाचणीचे सोपस्कार आटोपल्यावर ओटीकडे नेण्यात आले. या प्रवासात देखील ओटी म्हणजे लाल दिवा, बंद दाराआड चालू असलेली तोंडाला मास्क लावून डॉ ची धावपळ, ट्रे घेऊन इकडे तिकडे धावणाऱ्या नर्सेस आणि आत भितीने अधिक कुलिंगने गारठलेला पोटात पाय घालून बापुडा देह असे चित्र तराळून गेले.

ओटी टेबलावर विराजमान झाल्यावर शस्त्रक्रियेसाठी लागणार्‍या सर्व गोष्टींची पूर्तता होत होती. मुख्य डॉ सर्वाना सूचना देत होते. मघाशी म्हटल्याप्रमाणे गारठलेला देह आणखीनच गोठला कारण नाजूक जागेच्या दुखण्यावर नाजूक भागातूनच सुरुवात करणार होते त्यामुळे अनावृत्त करण्यात आले होते.

( अँजिओग्राफी - अ‍ॅन्जिओप्लास्टी थोडक्यात)

अँजिओग्राफी करण्यासाठी मांडीचा सांधा जवळ असलेले क्षेत्र ॲनस्थेटीकने  बधीर केले जाते. धमनीमध्ये एक लहान नळी घातली जाते जी कॅथेटर म्हणून ओळखली जाते. कॅथेटरमध्ये डाय टाकून इंजेक्शन दिले जाते आणि रक्तवाहिन्यांमधून डाय असलेल्या रक्तासहित एक्स रे घेतला जातो. याने रक्तपेशीतील कोणत्याही प्रकारचा अडथळा उठून दिसतो आणि या तपासणीत कोरोनरी आर्टरीला अवरोध (Block) असल्याचे निदर्शनास आले, आणि डॉ नी अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय त्वरित घेतला.

यामध्ये कॅथेटर मधून एक सूक्ष्म स्टीलची अशी गाइडिंग वायर पुढे सरकवतात. या वायरची हालचाल एक्स-रे स्क्रीनिंग मशीनमध्ये व्यवस्थित दिसते, नियंत्रित हालचाली करून हृदयरोगतज्ज्ञ ही वायर अवरोध असलेल्या आर्टरीमध्ये शेवटपर्यंत आत ढकलण्याचा प्रयत्न करतात. या वायरच्या साहाय्याने या वायरवरूनच डायलेटेशन कॅथेटरनामक एक छोटी नळी अवरोधापर्यंत (ब्लॉक पर्यंत) नेण्यात येते. या कॅथेटरच्या पुढील टोकास एक लांबूळका फुगा असतो ( बलून डिलेशन कॅथेटर) एक्स-रे स्क्रीनिंगच्या साहाय्याने समोरच्या मॉनिटरवर बघून हा बलून अवरोध जिथे आहे, त्या योग्य ठिकाणी ठेवून त्याला फुगवण्यात येते. काही वेळानंतर मग फुग्यातील दाब कमी करण्यात येतो. अवरोध हा मुख्यत: चरबीने बनलेला असल्यामुळे या बलूनद्वारे दाबला जातो व आर्टरी पूर्ववत होऊ शकते. मग वायर, बलून कॅथेटर आणि गाइडिंग कॅथेटर काढून घेण्यात येतात. बलून फुलवण्यात येतो तेव्हा ब्लेडद्वारे कडक अवरोध कापला जातो आणि मग तेथे अ‍ॅन्जिओप्लास्टी केली जाते. त्यानंतर त्याच जागी अवरोधाच्या आकारमानाप्रमाणे स्टेंट निवडला जातो आणि बलून अ‍ॅन्जिओप्लास्टी प्रमाणेच त्या ठिकाणी स्टेंट बसवण्यात येतो.

आणि या प्रकारे 13 मार्च शनी सकाळी 0740 सुरू झालेल्या त्रासाची सांगता 1230 ला झाली, आता देखरेखीखाली 24 तास आय सी यू मध्ये राहण्याचे आदेश देऊन डॉक मार्गक्रमित् झाले.

आय. सी. यू.चा गणवेश अंगावर चढला होता. पायजमा कमरेत ढीलाढाला, शर्टाला गुंडय़ा, हे सारं नवं होतं. कारण आता अस्तित्वच मुळी फक्त एक पेशन्ट असे उरले होते. पुढचे 24 तास तीच माझी ओळख होती. त्याच्याच जोडीला हॉस्पिटलचा एक बारकोड स्टिकर्सवर मनगटावर मिरवत होता. सत्तावन्न वर्षांचे माझे आयुष्य दोन सेंटिमीटरच्या बारकोडमध्ये सामावले गेले होते. माझी नोकरी, ज्ञान, अनुभव, पदे, प्रतिष्ठा जणू सारं काही विरघळलं किंवा वितळलं होतं आणि मी फक्त एक रुग्ण म्हणून उरलो होतो. पुढचे 24 तास माझ्या क्युबिकलमधून मी फक्त निरीक्षण करू शकत होतो. आय.सी.यू.तले सगळे उग्र वास, माझ्याच हृदयाची गती, स्पंदने आणि खाली वर होणारे प्राणवायूचे आकडे. दोन्ही हातांना थ्रीवे निडल्स खुपसलेले त्यातून विविध जातींची आयव्ही (आपल सलाईन) शरीरात झिरपत होते. फोन, चष्मा आणि घड्याळ नसल्यामुळे वेळेचे काही सोयरसुतक नव्हते. शेजारच्या रुग्णांपासून पडद्यांनी फारकत केलेली. आणि ते दोघेही व्हेंटिलेटरवर असल्यामुळे जाणिवा-नेणिवांच्या पलीकडे. ब्रदर्स, नर्सेस कामात प्रचंड व्यग्र आणि डॉक्टर मंडळी ठरावीक वेळेला येऊन ठरावीक विषय आणि पुढचे निर्णय याबद्दलच बोलणार. एकाकीपणा म्हणजे काय,  याचा मला खूप मोठा, अंगावर येणारा अनुभव आला. बेडवर आडवे पडून वरच्या पांढऱ्या छताकडे पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. आय.सी.यू.तल्या रुग्णाला एक मन असते.  त्यात काळजी, माया, विरह, ताटातूट आणि तडफड या भावना असतात. त्या कशा आणि कोणी मॉनीटर करावयाच्या? हे जाणवले. या आय सी यू ने एक आरसा आणि प्रतिबिंब हि दाखविले. गत आयुष्यात म्हणा किंवा अगदी कोरोना काळात साध ताप थंडी सर्दी पडसे खोकला यांना देखील रोखून धरले. आहार विहार देखील मर्यादित, मित्र, इष्ट मित्र, आप्तेष्ट परिवार यांच्याशी चांगल्याप्रकारे नाते. नातीगोती, मित्र, समाज आपले हे, आपण संपुर्ण असल्याने आपले असतात. आतापर्यंत हरवलेल्या वस्तुत आयुष्य शोधणे, निरोगी जगण्याचे स्वप्नं सगळ्यानी बाळगणे, ते प्रत्यक्षात आणणे खूप कठीण असते. प्रत्येक गोष्टीत प्रत्यक्षात आनंद मिळविणे आणि त्याचे मानसिक समाधान मिळणे हे अमृत साधने सारखे आहे. आपल्या प्रति आणि सर्वांप्रति आदर, प्रेम भावना निर्माण असणे आणि होणे अत्यंत गरजेचे आहे, हेच आपणास दुखा:तून तारून नेण्याचे मार्ग आहेत. आलेल्या संकटास धैर्याने तोंड देणे आणि स्वअनुभवातून इतरांना सावध करणे हे कर्तव्य आहे. आयुष्य आहे तोपर्यंत सुखदुःख येत राहतील पण त्यासाठी देवाने दिलेला हा देह अधिक सुंदर ठेवावा याचे प्रयत्न अवश्य करावेत. निरोगी मन आणि निरोगी तन या शिदोरीवर आपल्या सर्वांनीच सहस्त्रदर्शचंद्र सोहळ्याने व्हावी , असेच एक पूर्ण स्वप्नं पाहून आय सी यू बेडवर कधी पहुडलो हे कळलेच नाही.

(विजयकुमार वाणी)
------------
(याच लेखनातून सोसायटीतील जीवश्च एडव्हेंचर ग्रुप त्यातील प्रामुख्याने डॉक, सोसायटीतीलच कार्डियोलॉजिस्ट, जेएनपीटीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, अपोलोचे दोन्ही कार्डियोलॉजिस्ट आणि आप्तेष्ट मित्र अपोलोचे बालरोगतज्ज्ञ विभाग प्रमुख यांचे ऋणनिर्देश होणे आवश्यक आहे. संयमाने सर्व परिस्थिती हाताळत धीर देणारी सौ आणि चिरंजीव यांचे नव्या हृदयात स्वागत आणि आप्तेष्ट, इष्ट मित्र, ज्येष्ठ , कार्यालयीन सहकारी यांच्या शुभेच्छाच्या बळावर नव संजीवनी प्राप्त झाल्यामुळे सर्वांचेच मनःपुर्वक आभार)