१)पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?
वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे पहाणे म्हणजे गुणमेलन. पत्रिका-गुणमेलन करताना वर्णगुणाला १, वैश्यगुणाला २, तारागुणाला ३, योनिगुणाला ४, ग्रहमैत्री गुणाला ५, गणगुणाला ६, राशीकूटगुणाला ७ आणि नाडीगुणाला ८ अशा चढत्या क्रमाने गुण दिलेले असून सर्व गुणांची बेरीज ३६ होते.
हे सर्व गुण वधू-वरांच्या पत्रिकेत चंद्र कुठल्या नक्षत्रात कितव्या चरणात आहे यावर ठरलेले असते. त्यासाठी पंचांगात रेकनर सारखे कोष्टक असते. ते पाहून ३६ पैकी १८ पेक्षा अधिक गुण जमले तर विवाह जमवण्यास हरकत नाही असा निकष असतो.
खरं तर या गुणमेलनात फक्त चंद्राचाच विचार होतो म्हणून ते परिपूर्ण किंवा ' शास्त्रीय ` नाही असे काही ज्योतिष्यांचंच म्हणणं आहे. एकंदरीत, परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमात कुठल्या टॉपिकला किती गुण हे जसे दिलेले असते तसाच इथे प्रकार आहे. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली असावी. प्रेम, त्याग, सांमजस्य, या गोष्टी सुखी वैवाहिक जीवनास पोषक असतात. दोन भिन्न प्रकृतीची माणसं जर एकत्र आली तर वैवाहिक जीवनाचा समतोल ढासळतो. तसे होउ नये म्हणून त्यांच्या प्रकृतीचे मूल्यमापन पत्रिकेच्या माध्यमातून करून त्याचा निष्कर्ष सांगण्याचा प्रयत्न गुणमेलनाद्वारे केला गेला असावा.
२)विवाह जुळवण्याचे वेळी पत्रिका बघावी का?
छत्तीस गुण जुळूनही मने न जुळल्याने अयशस्वी ठरलेल्या वैवाहिक जीवनाची उदाहरणे आहेत. पत्रिका न जुळताही समाधानी वैवाहिक जीवन जगणारी माणसं आहेत. पत्रिकेवरून वजन, उंची, छाती, शिक्षण, विचारश्रेणी, अर्थिक क्षमता, रक्तगट, आरोग्य इत्यादि गोष्टी अजिबात समजत नाहीत. त्यामुळे पत्रिका बघण्यात काही अर्थ नाही.
मात्र विवाह जुळवण्याची पद्धत जरूर विचारात घ्यावी. कारण प्रेमविवाहांची संख्या जशी वाढलीय् तशी घटस्फोटांची संख्याही वाढलीय्. शारिरिक आकर्षणातून निर्माण झालेलं प्रेम हे तकलादू असतं. त्यात विवेकापेक्षा भावनेचा पगडा जास्त असतो. तर दुसरीकडे सध्या प्रचलित असलेली विवाह जमवण्याची रीत ही एक प्रकारच्या जुगारासारखी आहे. तिच्यात केवळ व्यावहारिक गोष्टींसाठी बायोडाटा देतात व 'स्थळ बघण्याचा` कार्यक्रम होतो. त्यात मुलगा-मुलगी एकमेकांना थोडेबहुत प्रश्न विचारतात.यातून एकमेकाच्या व्यक्तिमत्वाचा काय अंदाज येणार? तसं ही 'माण्ूास` ओळखणं हे अवघडच काम. एकमेकाच्या सहवासात जन्म काढूनही परस्परांची खऱ्या अर्थानं ओळख न झालेली माणसं आढळतात. तिथं आपल्या आयुष्याचा साथीदार इतक्या तकलादू पद्धतीने निवडणे कितपत उचित होईल ? परिचयोत्तर विवाह हा एक चांगला पर्याय होउ शकेल. मैत्रीतून स्वभावाविषयी थोडाफार तरी अंदाज आलेला असतो. त्यामुळे अशा रितीने होणारा विवाह हा जुगार ठरण्याची शक्यता कमी. पण शेवटी, मैत्री आपल्या जागी रहाते व विवाह आपल्या जागी रहातो.
विवाह ही व्यावहारिक बाब आहे. नुसत्या उदात्त कल्पनेने वैवाहिक जीवन काही जगता येत नाही. सांपत्तिक स्थिती, स्थावर, मानलौकीक, कौटुंबिक स्थिती या गोष्टी वा व्यावहारिक गरजा ही महत्वाच्या आहेत. फिल्मी स्टाईल प्रेमाच्या व त्यागाच्या बाता व्यवहारात कुचकामी ठरतात हे ध्यानात आल्यावर भ्रमनिरास होउन विवाह अयशस्वी ठरतात. म्हणूनच 'घटस्फोट मिळेल का?` असे ज्योतिषाकडे विचारायला जाणारा वर्ग वाढलाय. विवाह हा संस्कार न ठरता सोपस्कार व्हायला लागला आहे.
३)मंगळदोष म्हणजे काय?
जन्मकुंडलीत १, ४, ७, ८, १२ यापैकी कुठल्याही स्थानात मंगळ असेल तर तो मंगळदोष आहे असे समजले जाते. ताऱ्यांच्या तेजाची जशी प्रतवारी असते तशी या मंगळाच्या कडकपणाचीही प्रतवारी आहे. कडक मंगळ, सौम्य मंगळ, क्षम्य मंगळ ही प्रतवारी कशी ठरवतात तर पत्रिकेतला मंगळ राशीबल व स्थानबळ यांच्यामुळे किती पॉवरफुल आहे यावरून ठरवतात.
जन्मकुंडलीत बारा स्थाने असतात त्यातल्या पाच स्थानात मंगळ असण्याची शक्यता जवळजवळ चाळीस टक्के असते. म्हणजे शेकडा ४० टक्के कुंडल्यात हा पीडादायक मंगळ असणारच! त्यामुळे विवाह जुळवणे फार मुश्कील व्हायचे म्हणून पूर्वाचार्यांनी काही अपवाद शोधून काढले.
सौम्य मंगळ, क्षम्य मंगळ असे ते अपवाद आहेत. मंगळ-दोषाचा हा इतिहास काही फार प्राचीन नाही, अलीकडचाच म्हणजे १७ व्या शतकापासूनचा आहे पण त्याचा जबरदस्त पगडा लोकांच्या मनावर बसला आहे. मंगळदोषाचे उल्लेख हे मुहूर्त गणपती, मुहूर्त चिंतामणी, भाव चिंतामणी, ज्योतिर्महार्णव अशा ग्रंथांमध्ये आढळतात. मुहूर्तचिंतामणी या ग्रंथामध्ये मंगळदोषासाठी अपवादही सांगितले आहेत. वधूच्या पत्रिकेत जर वरील स्थानापैकी एकात मंगळ असून वराच्या पत्रिकेतही तशाच स्थानात असेल तर मंगळाने मंगळास जाब पाहिला असे म्हटले जाते. पत्रिका गुणमेलनात जर २७ किंवा त्यापेक्षा अधिक गुण झाले तर मंगळाकडे काणाडोळा करू लागले. अशा रितीने मंगळाचे अपवाद वाढू लागले. अनेक मान्यवर ज्योतिषांनी सुद़्धा मंगळ-दोष हे खूळ आहे अशी सडेतोड भूमिका घेतली.
४)एकनाड असल्यास रक्तगट एक येतो व संतती होत नाही अथवा अडचणी येतात यात तथ्य काय?
फलज्योतिषात नाडी या शब्दाचा नेमका अर्थ काय ते कुठेही स्पष्ट सांगितलेले नाही. एकनाड-दोषामुळे होणारे दुष्परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगितले आहेत. नाडीग्रंथात नाडी म्हणजे एक पळाचा अवधी. शरीरशास्त्रात नाडी म्हणजे रक्तवाहिनी. फलज्योतिषात अमुक नक्षत्रावर जन्मलेल्या माणसाची नाडी अमुक एवढेच सांगितले आहे. अंत्य, आद्य, मध्य अशा तीन प्रकारच्या नाड्या सांगितलेल्या आहेत. जगातला प्रत्येक माणूस या तीनपैकी कोणत्या तरी एका नाडीचा असतोच. पंचांगात अवकहडा चक्र नावाचे एक कोष्टक असते. त्यावरून जन्मनक्षत्राच्या आधारे तुमची नाडी कोणती ते कळते. उपवर मुलगा व मुलगी या दोघांची नाडी एकच आहे असे दिसले तर तिथे एकनाडीचा दोष आहे म्हणून त्या दोघांचे लग्न करू नये कारण अशा जोडप्याला संतती होत नाही अशी वेडगळ श्रद्धा प्रचलित आहे.
पत्रिका-गुणमेलनात नाडीला सर्वात जास्त म्हणजे आठ गुण दिले आहेत. नाडीचा संबंध रक्तगटाशी जोडण्याचा प्रयत्न काही ज्योतिषीलोक करतात पण तो त्यांचा कावेबाजपणा आहे. का? ते पहा. रक्तगट हे अे, बी, अेबी, ओ, आरएच पॉझिटीव्ह व निगेटीव्ह असे एकूण आठ प्रकारचे आहेत. तीन नाडया व आठ प्रकारचे रक्तगट यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. पत्नीचा रक्तगट आरएच निगेटिव्ह व पतीचा रक्तगट आरएच पॉझिटिव्ह असल्यास एक प्रॉब्लेम निर्माण होतो तो असा की, त्या जोडप्याच्या पहिल्या अपत्याला जरी काही त्रास झाला नाही तरी नंतरच्या अपत्याला धोका संभवतो. पण यावरही आता डॉक्टरी उपाय निघाला आहे. एकनाड-दोषामुळे जोडपे निपुत्रिक रहाते ही समजूत जर खरी असती तर संभवनीयतेच्या नियमानुसार जगातली एक-तृतीयांश जोडपी निपुत्रिकच राहिली असती! पण तसे काहीच आढळत नाही. यावरून उघड दिसते की ही समजूूत म्हणजे एक खुळचटपणा आहे. एकनाड-दोषाला काही अपवाद गर्गसंहितेमध्ये दिले असले तरी पूर्वीच्या - व आजच्याही -ज्योतिष्यांच्या अडाणीपणामुळे म्हणा किंवा अंधानुकरणाने म्हणा एकनाडीचे फालतू स्तोम माजले आहे.एकनाड-दोषावर आजवर झालेल्या टीकेचा एक परिणाम असा झालेला दिसतो की आता दाते पंचांगात पृष्ठ ८६ वर नाडी-दोषाचे वेगळेच परिणाम सांगण्यात आले आहेत. तिचा संबंध आता संततीशी नसून माणसाच्या स्वभावाशी जोडण्यात आला आहे, संतती बाबत मौन पाळण्यात आले आहे, पण एकनाडीमुळे मृत्यूदायक दोष निर्माण होतो अशी दहशत आता पृष्ठ ९० वर घातली आहे ! दुसरा महत्वाचा बदल म्हणजे एकनाड -दोष ठरवण्यासाठी आख्ख्या नक्षत्राऐवजी त्याचा फक्त एक चरणच विचारात घ्यावा असे नरपतिजयचर्या स्वरोदय या ग्रंथाचा आधार देउन सांगितले आहे. या बदलामुळे एकनाड -दोषाच्या केसेसचे प्रमाण एकदम खाली येउन ते फक्त २५ टक्क्यावर येते असा दावा केला आहेे. पण या प्रकाराचा खरा अर्थ काय होतो ते पहा. गेली शेकडो वर्षे चालत आलेल्या रूढीमुळे ७५ टक्के केसेस मध्ये निष्कारणच एकनाड-दोष मानून स्थळे नाकारली गेली असाच याचा अर्थ होत नाही का ?
५) मृत्यूषडाष्टक काय आहे?
समजा तुमची जन्मरास मेष आहे व तुम्हाला सांगून आलेल्या जोडीदाराची रास कन्या आहे. मेषेपासून कन्या रास ६ वी येते. कन्येपासून पुढे मोजल्यास मेष रास आठवी येते. सहा-आठ म्हणजे षडाष्टक. असा योग असलेल्या जोडीदारांचे एकमेकाशी पटत नाही अशी समजूत आहे. षडाष्टक शब्दामागे मृत्यू हा शब्द जोडला म्हणजे एकदम दहशत निर्माण होते. ज्योतिषांना तेच हवे असते. ते अशी समजूत घालतात की मृत्यू शब्दाचा अर्थ वैवाहिक सुखाचा मृत्यू असा घ्यायचा. हाच अर्थ शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. ज्योतिष्यांचे एकूण धोरण काय तर विवाह या गोष्टीसंबंधात मंगळ, मृत्यूषडाष्टक, एकनाड असे काहीतरी प्रश्न वा अडचणी आपणच आधी निर्माण करायच्या व आपणच त्याला 'शास्त्राधार` देउन मार्गदर्शन करण्याचा आव आणायचा व स्वत:च्या तुमड्या भरायच्या.
६) मुहूर्त पहाणे योग्य का अयोग्य?
मुहूर्त म्हटले की भास्कराचार्य-लीलावतीची गोष्ट हमखास सांगितली जाते. लीलावती ही भास्कराचार्यांची लाडकी लेक. तिच्या कुंडलीत वैधव्ययोग होता. पण भास्कराचार्यांनी असा विवाहाचा मुहूर्त शोधून काढला की तिचा वैधव्ययोग टळेल. पण विवाहाचे वेळी अक्षतेचा दाणा का मणी घटिकापात्रात पडलेने तो तळाशी जावून भोकात अडकला व मुहूर्त चुकला व शेवटी व्हायचे तेच झाले. या दंतकथेच्या छटा बदलतात पण आशय तोच. मुहुर्ताची महती. थोडा इकडेतिकडे झाला की काय उलथापालथ? मे महिना म्हणजे सुट्टी,लग्नसराईचे दिवस. आता या काळात लग्नाचा मुहूर्त नाही म्हणजे गैरसोयच नाही का? कार्यालयाची उपलब्धता हा पण हल्ली एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. मुहूर्त असलेल्या तारखांना कार्यालय मिळणे हे देखील भाग्यच मानायची वेळ आली आहे. पंचांगात रेडीमेड मुहूर्त दिलेले असतात. पण हे रेडिमेड मुहूर्त सुद्धा 'लाभतात` की नाही हे बघावे लागते. जसे रेडिमेड कपडे सर्वांनाच 'फिट` होतील असे नसतात कधी कधी ते 'अल्टर` करावे लागतात तसेच मुहूर्ताचे आहे. एखादी वेळ ही कुणासाठी आनंदाची असते तर कुणासाठी दु:खाची असते, कुणासाठी कसोटीची असते तर कुणासाठी निवांतपणाची असते, कुणासाठी जोडायची असते तर कुणासाठी तोडायची असते, कुणाची जन्माची असेल तर कुणाची मृत्यूची असेल. कुणाची कशीही असो ती ग्रहांच्या सोयीची असते म्हणून तिला मुहूर्त म्हणायचे. मुहूर्ताना महत्व देणं - न देणं हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे.
७) गुरुबल कशासाठी बघतात?
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या शुभ ग्रहाची साथ आहे की नाही हे पहातात. हे मंगल प्रसंग असतात त्यामुळे अशा प्रसंगी अमंगल ग्रहांची वाकडी नजर पडून काही अमंगळ होउ नये म्हणून गुरुबळ बघितले जाते. गुरु हा ग्रह नैतिक बळ देतो, चांगले गुण वृद्धिंगत करतो. गुरु जर अनुकूल नसेल तर गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन करून तो अनुकूल करून घेता येतो.
८) मूळ नक्षत्रावर जन्मल्यावर शांंती करावयास का सांगतात?
मूळ नक्षत्र हे तमोगुणी, दारूण, अनिष्ट मानले गेले आहे. त्यामुळे मूळ नक्षत्रावर मूल जन्मले तर ते आईबापाच्या मूुळावर आले आहे असा समज निर्माण झाला. त्यातला अनिष्ट भाग काढून टाकण्यासाठी त्याची शांती करण्याचे प्रकार अर्थातच भीतीपोटी निर्माण झाला.
९) मूळ नक्षत्र सासऱ्यास वाईट आश्लेषा नक्षत्र सासूस वाईट असे म्हणतात ते कितपत बरोबर आहे?
वर आपण मूळ नक्षत्राच्या इतिहासात जे बघितले त्याचीच ही पुढची मालिका आहे. जेष्ठा नक्षत्र दीरास वाईट वगैरे वगैरे. मुलगी सासरी आल्यानंतर जर काही दुर्घटना घडली तर त्याचे खापर लगेच मुलीच्या पायगुणाशी जोडून काहीतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच कुठतरी नक्षत्राशी संबंध जोडून काहीतरी बादरायण संबंध प्रस्थापित केला जातो.
१०) गुरु संततीकारक ग्रह का मानतात?
गुरुलाच संतती देण्याचा मक्ता कुणी दिला याविषयी खुलासा सापडत नाही. तसे सर्वच ग्रहाचे कारकत्व कुणी ठरविले यालाही समर्पक उत्तर नाही. केवळ ग्रंथप्रामाण्य हेच त्याचे उत्तर आहे. पण गुरु हा संततीकारक ग्रह आहे याविषयी मात्र ज्योतिषांचे एकमत आहे!