शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०१०

तुमच्या ताकदीने लढा, इतरांच्या कमजोरीने नको. कारण खरे यश हे इतरांच्या पराभवात नसून तुमच्या प्रयत्नांमध्ये असतं ।

तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुम्ही ज्याला कुणाला भेटता त्या व्यक्तीचे एक ध्येय असते । काही लोक तुमचा वापर करतील , तर काही जण तुम्हाला काही शिकवतील , कुणी तुमच्याकडून सर्वोत्तम परफॉर्मंस काढून घेईल , तर कुणी तुम्हाला दुःख पण पोचवेल , पण या सर्वांतून तुम्ही काही ना काही शिकाल . जीवनाची भेट जीवन हेच आहे .

तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवत असाल तर तो तुमचा सर्वात चांगला मित्र आहे । पण मनाद्वारे जर तुम्ही स्वतः नियंत्रित होत असाल तर तो तुमचा सर्वात मोठा शत्रु होऊन जातो ।

बी वाढत असते तेव्हा आवाज करत नाही , पण झाड पडते तेव्हा खूप आवाज होतो । विनाशात आवाज असतं तर सृजन नेहमी शांत असतो ।

मच्छिमारांना माहिती असतं की समुद्र खवळलेला असून वादळ घोंघावतय । पण ते त्यांच्यासाठी इतका मोठा धोका नसतो की ते किना - यावर राहतील ।

दोन परिस्थितीत शांत रहा - तुम्हाला लक्षात येत असेल की समोरची व्यक्ती तुमच्या शब्दात तुमच्या भावना समजून घेत नाहीए अशा वेळी आणि दुसरं , समोरची व्यक्ती तुमच्या शब्दाशिवाय तुमच्या भावना समजतोय ।

सुशिक्षित लोक परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतात .... मात्र अनुभवी लोक आपल्या मर्जीनुसार परिस्थिती बदलतात ।

चर्चा करते वेळी स्वतःचा आवाज चढवू नये । फक्त तुम्ही मांडत असलेल्या तर्कचा दर्जा वाढवण्यावर लक्ष द्या । गुड डे ...

एखाद्या व्यक्तीला समजून घेणं कठीण नाही ' आणि ' व्यक्ती वेगवेगळ्याप्रकारच्या असतात '। आम्ही केवळ एवढं लक्षात ठेवलं तर आमच्या जीवनात संबंध तुटण्यापासून वाचवू शकतो .






१ जुलै

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व
आपल्या मुलांची जडणघडण चिरेबंदी चारित्र्याची व्हावी, त्याच्या ठायी अक्षय मूल्यांची पायाभरणी व्हावी यासाठी किल्ला, चिरोटे, फराळ, धन्वंतरी- पूजन या साऱ्या गोष्टींचा आग्रह. या गोष्टींनी बालपण समृद्ध केले. चारित्र्य हे असे कळत-नकळत घडत गेले. पर्सनॅलिटी फार नंतर अवतरली.चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व या नाण्याच्या दोन बाजू. छापा आणि काटा एकमेकांपासून जितके वेगळे, तितक्याच निराळ्या या बाजूही. पण नाणं पूर्ण व्हायचं असेल आणि त्याला ‘चलनी’ म्हणून व्यवहारात चालवायचे असेल तर दोन्ही आवश्यक. मग त्या दोन बाबींत नेमका फरक तो कोणता? चारित्र्य दिसत नाही; ते असते. व्यक्तिमत्त्व दिसते, त्याची छाप पडते. चारित्र्य हा अस्तित्वाचा गाभा असतो, तर व्यक्तिमत्त्व हा अस्तित्वाचा एक भाग असतो. चारित्र्य उजळते, व्यक्तिमत्त्व झळाळते. चारित्र्य म्हणजे माजघरात किंवा देवघरात तेवणाऱ्या नंदादीपाची ज्योत. व्यक्तिमत्त्व म्हणजे उघडझाप करणारी इलेक्ट्रिकची चायनीज माळ. चारित्र्य उघडय़ा दारातून आत येते, व्यक्तिमत्त्व खिडकीतून डोकावते. चारित्र्य टिकाऊ असते, तर व्यक्तिमत्त्व दिखाऊ असते. व्यक्तिमत्त्व म्हणजे वड, तर चारित्र्य म्हणजे चंदन. वडाच्या पारंब्यांनी जसा त्याचा संभार पसरतो, तद्वतच व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे अनुयायांची मांदियाळी वाढते. चंदनाच्या अस्तित्वाची साक्ष पटविण्यासाठी त्याला पारंब्यांची गरज नाही, तर त्याचा गंधच रानोमाळी त्याची महती सांगतो. थाळीत टाकलेला भाकरीचा तुकडा तोंडाला लावण्यापूर्वी डोळ्यांतून निष्ठा, भक्ती, कृतज्ञता आणि स्नेहबंध यांची पोचपावती देणाऱ्या घरातल्या श्वानासारखे चारित्र्य हे नि:शब्द बोलते. तर मालकाला मिळो- ना मिळो; मला माझे दूध कमी पडता कामा नये; आणि पडलेच, तर ओटय़ावरच्या भांडय़ाला पंजा मारायला मागे-पुढे न पाहणाऱ्या मन्यासारखे व्यक्तिमत्त्व हे मतलबी, आत्मकेंद्रित आणि स्वत:पुरते असते. चारित्र्य घडते ते संस्कारांतून, शिकवणीतून आणि अनुकरणातून. व्यक्तिमत्त्व घडविले जाते ते आकारातून, अंधानुकरणातून आणि प्रसंगी अविचारातून.पण मग आज व्यक्तिमत्त्वाचाच बोलबाला का? त्याच्या संपादनासाठी पदरमोड करून क्लासेस कशासाठी? उत्तर सोपे आहे. व्यक्तिमत्त्व विकले जाते. त्याची बोली लागते. चारित्र्य विकावू नसतेच मुळी. आणि त्याची किंमत जगाच्या बाजारात सहजासहजी ठरविता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा व्यवहार होतो आणि म्हणूनच आजच्या देवाणघेवाणीच्या जगात त्याची चलती आहे. त्याच्यासाठीच सारे काही.. कोणते कपडे घालायचे? कोणत्या जिममध्ये जायचे? पर्सनल ट्रेनर ठेवायचा की एरोबिक्स इन्स्ट्रक्टरला बोलवायचे? कोणते अन्नपदार्थ खायचे? काय टाळायचे म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसेल? याचीच सर्वत्र चर्चा.

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०

माघार म्हणजे हुकलेले नव्हे, तर लांबलेले यश.

माघार
आता माघार शक्य नाही,’ हे वाक्य अनेकदा ऐकतो. कधी एखाद्या राजकीय पुढाऱ्याकडून, तर कधी मागणीसाठी अडून बसलेल्या ‘लडके लेंगे..’ ब्रीदवाक्य असणाऱ्या युनियनच्या पुढाऱ्याकडून, इरेला पेटलेल्या एखाद्या वादपटूकडून..
व्यक्ती बदलतात, वृत्ती बदलत नाही. व्यासपीठं बदलतात, आवेश ओसरत नाही. बोच याची असते की, आपण हरलो, पराभूत झालो. अपयशाचा शिक्का माथी बसला, ही जळती ज्वाला अहंकार फुलवत राहते आणि कधी कधी आग विझली तरी राख धुमसत राहते. या धुमसणाऱ्या राखेत करपत राहते, ते आपले उर्वरित आयुष्य. पुढे कितीही यश मिळाले तरी ही अदृश्य काळी किनार आपल्याला अस्वस्थ करते. इतरांना ती अज्ञात असते, पण आपल्याला मात्र ‘ती आहे’, हे तिचं असणं नजरेआड करता येत नाही. आपली ‘माघार’ इतरांना आठवत नसली तरी. आपल्याला तिचा विसर पडणे शक्य होत नाही.
काळा बोका आडवा गेल्यावर चार पावलांची माघार तत्क्षणी घेणारे आपण पुढच्या आक्रमणात दडलेला काळा धोका पाहून माघार का घेऊ शकत नाही? तो कायमचा पराजय थोडाच असतो? माघार ही हार नसते. माघार ही मिटून संपल्याची साक्षही नसते. माघार म्हणजे मागासलेपण नव्हे आणि माघार म्हणजे ‘सीदन्ति मम गात्राणि, मुखंच परिशुष्यति’ म्हणून गाळलेले अवसानही नव्हे. माघार अवसानघातकी नसून अवधानी चाणाक्षतेची चुणूक आहे. अव्यवहारी करंटेपणापेक्षा व्यवहारी कच परवडली. माघार आपल्याला अवकाश देते, आत्मपरीक्षणाची संधी देते, कच्चे दुवे जोखण्याचा, धागे घट्ट विणण्याचा मोका देते. ज्याच्यावर चाल करून जायचे, त्याची शक्ती पुन्हा एकवार तपासून पाहण्याची सूचना देते. माघार म्हणजे पराभव नव्हे, तर लांबणीवर टाकलेला विजय. माघार म्हणजे हुकलेले नव्हे, तर लांबलेले यश.
यश जेव्हा विनासायास किंवा सहजसाध्य मिळते, तेव्हा त्याची फारशी किंमत राहत नाही. पण एखाद्या तुरट, आंबट, तिखट गोष्टींनी जीभ उष्टावल्यावर साखरेची गोडी जशी शतगुणित होते, तसेच माघारीनंतर आलेल्या यशानंतर होणाऱ्या आनंदाचे आहे. तेव्हा आता गरज आहे, ती अल्प पराभवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची. 'winning wars and loosing battles' किंवा ‘युद्धात जिंकायचे आणि तहात हरायचे’ ..हे दोन्ही दाखले व्यवस्थापन क्षेत्रात मोलाचे ठरतात. व्यवस्थापन करायचे, तर वाटाघाटी आल्या, करार आले, तहाचे मसुदे आले आणि देवाणघेवाण आली. कसलेला व्यवस्थापक प्रसंगी चार पावले मागे येतो, पण चर्चा विस्कटू देत नाही. चर्चा हमरीतुमरीवर आली की, ती त्या दिवसापुरती आटोपती घ्यायची आणि चार दिवसांनी पुन्हा बसायचे. वरवर पाहता ती माघार वाटली तरी प्रत्यक्षात ती जिंकण्याची पहिली पायरी ठरते, पण म्हणून माघारीला कोणी वेळकाढूपणा म्हणून तिची संभावना करू नये. यशाची वेळ अद्याप आली नाही, एवढाच मर्यादित अर्थ तेथे अभिप्रेत असावा.
उज्जैनच्या जवळ एका गावात एक महान गणितज्ज्ञ राहात होता. तो राजाचा आर्थिक सल्लागारही होता. उत्तरेला तक्षशिलेपर्यंत आणि दक्षिणेला कांचीपीठापर्यंत त्याची कीर्ती पसरली होती. गावातले गावकरी जेव्हा त्याला त्याच्या मुलाच्या अडाणी अज्ञानाबाबत सांगत, तेव्हा तो व्यथित होत असे. ‘तू असशील थोर गणिती, पण तुझ्या मुलाला सोने आणि चांदी याच्या किमतीतला फरकही कळत नाही. ..या उद्गारांनी त्याची खिल्ली उडवत असत.
एके दिवशी उपहास असह्य होऊन त्याने आपल्या मुलाला बोलावले. ‘काय रे, सोने आणि चांदी यात अधिक मूल्यवान काय?’ ..‘अगदी सोप्पं आहे बाबा, अर्थात सोने.’, ‘मग तू गावकऱ्यांना उलटे का सांगतोस?’ यावर चिरंजीव वदले, ‘रोज सकाळी शाळेच्या वाटेवर असताना गावचे पाटील आणि त्यांचे टोळभैरव मला बोलवतात. त्यांच्या दोन बंद मुठीत एकीकडे सोन्याचे तर दुसरीकडे चांदीचे नाणे असते. ते मला विचारतात, या दोन नाण्यात अधिक मूल्यवान काय? मी उत्तरतो, चांदी. लोक खो-खो हसतात, विजयोन्माद साजरा होतो, माझी टर उडवली जाते, एवढय़ा मोठय़ा पंडिताचा पढतमूर्ख मुलगा म्हणून माझा गौरव होतो आणि मला ते चांदीचे नाणे बक्षीस मिळते. हा उपक्रम रोज होतो.’
..वडिलांच्या चेहऱ्यावर संताप असतो.. मुलाच्या मूर्खपणाबद्दल चीड.. अपमानित झाल्याची बोच.. आणि या साऱ्याला नि:शब्द उत्तर देण्यासाठी मुलगा उघडतो, त्याची शिसवी लाकडाची पेटी- चांदीच्या नाण्यांनी शिगोशिग भरलेली.. चमचमणारी.
‘बाबा, ज्या दिवशी मी ‘सोने’ असे उत्तर देईन, त्या दिवशी मला चांदी मिळणे बंद होईल आणि त्या दिवशी माझा पराभव होईल. आज रोज मी जी घेतो आहे, ती ‘माघार’ आहे; ‘हार’ नव्हे.
..माघारीत एक घार दडलेली आहे,
पुन्हा अचूक लक्ष्यवेध घेण्यासाठी.

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

बुधवार दी। ११ अगस्त २०१० पासून श्रावण मास सुरु होत आहे। पूर्वी च्याकाळात म्हणजे वीस पंचवीस वर्षांपूर्वी श्रावण मासात नित्य नियमाने कहाणी वाचली जायची। सोमवार म्हटला म्हणजे श्री शंकराची कहाणी , मंगलवारी देवीची, बुधवारी ब्रुहस्पतिची, गुरुवारी दत्ताची, शुक्रवारी देवीची, शनिवारी शनि देवाची, रविवारी आदित्य म्हणजे सुर्याची कहाणी वाचली जायची। कहाणी च्या सुरवातीला श्री गणेशाची स्तुति करून, प्रत्येकाच्या हातात, अक्षता दिल्या की, कहाणी संपेपर्यंत त्या अक्षता मनोभावे हातात धरून तास दिड तास सर्व लहना पासून मोठ्या पर्यंत बसायचे आणि कहाणी एकून सर्व सार ग्रहण करायचेत। अशी मजा रोजच असायची, मग नाग पंचमी च्या दिवशी वेगळी कहाणी, वेगला आहार, असायचा। प्रत्येक श्रावण सोमवारी उपवास, मग रक्षा बंधन, न दही हंडी , या सनांची मजा कही औरच। त्यात श्रावण सरी बरसलयत तर, बाल कविंची कविता आठवते,
श्रावण मासी, हर्ष मानसी,
हिरवल दाते, चोहिकडे,
क्षणात येते, सरसर शिरवे,
क्षणात फिरुने उन पड़े,