मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०

माघार म्हणजे हुकलेले नव्हे, तर लांबलेले यश.

माघार
आता माघार शक्य नाही,’ हे वाक्य अनेकदा ऐकतो. कधी एखाद्या राजकीय पुढाऱ्याकडून, तर कधी मागणीसाठी अडून बसलेल्या ‘लडके लेंगे..’ ब्रीदवाक्य असणाऱ्या युनियनच्या पुढाऱ्याकडून, इरेला पेटलेल्या एखाद्या वादपटूकडून..
व्यक्ती बदलतात, वृत्ती बदलत नाही. व्यासपीठं बदलतात, आवेश ओसरत नाही. बोच याची असते की, आपण हरलो, पराभूत झालो. अपयशाचा शिक्का माथी बसला, ही जळती ज्वाला अहंकार फुलवत राहते आणि कधी कधी आग विझली तरी राख धुमसत राहते. या धुमसणाऱ्या राखेत करपत राहते, ते आपले उर्वरित आयुष्य. पुढे कितीही यश मिळाले तरी ही अदृश्य काळी किनार आपल्याला अस्वस्थ करते. इतरांना ती अज्ञात असते, पण आपल्याला मात्र ‘ती आहे’, हे तिचं असणं नजरेआड करता येत नाही. आपली ‘माघार’ इतरांना आठवत नसली तरी. आपल्याला तिचा विसर पडणे शक्य होत नाही.
काळा बोका आडवा गेल्यावर चार पावलांची माघार तत्क्षणी घेणारे आपण पुढच्या आक्रमणात दडलेला काळा धोका पाहून माघार का घेऊ शकत नाही? तो कायमचा पराजय थोडाच असतो? माघार ही हार नसते. माघार ही मिटून संपल्याची साक्षही नसते. माघार म्हणजे मागासलेपण नव्हे आणि माघार म्हणजे ‘सीदन्ति मम गात्राणि, मुखंच परिशुष्यति’ म्हणून गाळलेले अवसानही नव्हे. माघार अवसानघातकी नसून अवधानी चाणाक्षतेची चुणूक आहे. अव्यवहारी करंटेपणापेक्षा व्यवहारी कच परवडली. माघार आपल्याला अवकाश देते, आत्मपरीक्षणाची संधी देते, कच्चे दुवे जोखण्याचा, धागे घट्ट विणण्याचा मोका देते. ज्याच्यावर चाल करून जायचे, त्याची शक्ती पुन्हा एकवार तपासून पाहण्याची सूचना देते. माघार म्हणजे पराभव नव्हे, तर लांबणीवर टाकलेला विजय. माघार म्हणजे हुकलेले नव्हे, तर लांबलेले यश.
यश जेव्हा विनासायास किंवा सहजसाध्य मिळते, तेव्हा त्याची फारशी किंमत राहत नाही. पण एखाद्या तुरट, आंबट, तिखट गोष्टींनी जीभ उष्टावल्यावर साखरेची गोडी जशी शतगुणित होते, तसेच माघारीनंतर आलेल्या यशानंतर होणाऱ्या आनंदाचे आहे. तेव्हा आता गरज आहे, ती अल्प पराभवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची. 'winning wars and loosing battles' किंवा ‘युद्धात जिंकायचे आणि तहात हरायचे’ ..हे दोन्ही दाखले व्यवस्थापन क्षेत्रात मोलाचे ठरतात. व्यवस्थापन करायचे, तर वाटाघाटी आल्या, करार आले, तहाचे मसुदे आले आणि देवाणघेवाण आली. कसलेला व्यवस्थापक प्रसंगी चार पावले मागे येतो, पण चर्चा विस्कटू देत नाही. चर्चा हमरीतुमरीवर आली की, ती त्या दिवसापुरती आटोपती घ्यायची आणि चार दिवसांनी पुन्हा बसायचे. वरवर पाहता ती माघार वाटली तरी प्रत्यक्षात ती जिंकण्याची पहिली पायरी ठरते, पण म्हणून माघारीला कोणी वेळकाढूपणा म्हणून तिची संभावना करू नये. यशाची वेळ अद्याप आली नाही, एवढाच मर्यादित अर्थ तेथे अभिप्रेत असावा.
उज्जैनच्या जवळ एका गावात एक महान गणितज्ज्ञ राहात होता. तो राजाचा आर्थिक सल्लागारही होता. उत्तरेला तक्षशिलेपर्यंत आणि दक्षिणेला कांचीपीठापर्यंत त्याची कीर्ती पसरली होती. गावातले गावकरी जेव्हा त्याला त्याच्या मुलाच्या अडाणी अज्ञानाबाबत सांगत, तेव्हा तो व्यथित होत असे. ‘तू असशील थोर गणिती, पण तुझ्या मुलाला सोने आणि चांदी याच्या किमतीतला फरकही कळत नाही. ..या उद्गारांनी त्याची खिल्ली उडवत असत.
एके दिवशी उपहास असह्य होऊन त्याने आपल्या मुलाला बोलावले. ‘काय रे, सोने आणि चांदी यात अधिक मूल्यवान काय?’ ..‘अगदी सोप्पं आहे बाबा, अर्थात सोने.’, ‘मग तू गावकऱ्यांना उलटे का सांगतोस?’ यावर चिरंजीव वदले, ‘रोज सकाळी शाळेच्या वाटेवर असताना गावचे पाटील आणि त्यांचे टोळभैरव मला बोलवतात. त्यांच्या दोन बंद मुठीत एकीकडे सोन्याचे तर दुसरीकडे चांदीचे नाणे असते. ते मला विचारतात, या दोन नाण्यात अधिक मूल्यवान काय? मी उत्तरतो, चांदी. लोक खो-खो हसतात, विजयोन्माद साजरा होतो, माझी टर उडवली जाते, एवढय़ा मोठय़ा पंडिताचा पढतमूर्ख मुलगा म्हणून माझा गौरव होतो आणि मला ते चांदीचे नाणे बक्षीस मिळते. हा उपक्रम रोज होतो.’
..वडिलांच्या चेहऱ्यावर संताप असतो.. मुलाच्या मूर्खपणाबद्दल चीड.. अपमानित झाल्याची बोच.. आणि या साऱ्याला नि:शब्द उत्तर देण्यासाठी मुलगा उघडतो, त्याची शिसवी लाकडाची पेटी- चांदीच्या नाण्यांनी शिगोशिग भरलेली.. चमचमणारी.
‘बाबा, ज्या दिवशी मी ‘सोने’ असे उत्तर देईन, त्या दिवशी मला चांदी मिळणे बंद होईल आणि त्या दिवशी माझा पराभव होईल. आज रोज मी जी घेतो आहे, ती ‘माघार’ आहे; ‘हार’ नव्हे.
..माघारीत एक घार दडलेली आहे,
पुन्हा अचूक लक्ष्यवेध घेण्यासाठी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: