मंगळवार, २४ जून, २०२५

लेख (१९९) २५ जून २०२५


श्वेतपत्रिकेतील कार्यवाहीत प्रवाशांचाही विचार व्हावा.

म.टा.  दिनांक २४ जून २०२५ अंकातील "एस टी महामंडळाची श्वेतपत्रिका "लेख वाचला. एस टी महामंडळाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढून परिवहन मंत्र्यांनी स्वतःच्याच खात्याची खरी परिस्थिती समोर आणली आहे, त्याबद्दल त्यांचे  अभिनंदन. "प्रवाशांच्या सेवेसाठी" ब्रीद वाक्य असणाऱ्या, प्रवाशांना कशा सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत, याचाही विचार व्हावा.  प्रत्येक स्थानक, स्टँड, आगार यांची आजची परिस्थिती अत्यंत दयनीय, दुर्लक्षित आहे.  कानाकोपऱ्यात उभ्या असलेल्या एस्ट्या, त्यांची तुटलेली तावदाने, गावांच्या नावांच्या वाकड्या तिकड्या ठेवलेल्या पाट्या, आगारातील खड्डेमय रस्ते, तुटलेल्या शेड्स, त्यामधील आसन,  अर्धवट जाळीची चौकशी केबिन, फुटलेल्या फरशा , अस्वच्छता, रात्री अंधारलेले फलाट, दुर्गंधीयुक्त उघड्या मुताऱ्या, शौचालयाची तर बोंब असते. आदी सर्व त्रासांसह प्रवासी प्रवास करत असतात.  लांबच्या प्रवासातील चहा पानासाठी दिलेल्या रेस्टॉरंटचे वर्णन तरी काय करावे. जास्तीचा मोबदला घेऊन,  गल्लाभरू मालक  प्रवाशांवर उपकार करत असतात.  परिवहन मंत्र्यांनी, सर्व आगारांची, बसेसची योग्य निगा राखण्यासाठी विभागावर विशेष भरारी पथकाची स्थापना करून दैनंदिन लेखाजोगा घ्यावा, त्यास वर्तमान पत्रात प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून संबंधित काम करण्यांवर दबाव राहील. आधुनिकतेसाठी रेल्वेचे यूटीएस ,खाजगी बसचे रेडबस सारखे ऍप बनवून ऑनलाईन तिकिटे बुकिंगची सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. यामुळे शासनाच्या उपक्रमातील महामंडळ चांगल्या स्थितीत राहिल्यास प्रवासी जास्तीत जास्त एस टी चा वापर करतील.

विजय आप्पा वाणी,  पनवेल 

लेख (१९८) २४ जून २०२५


 

परिपक्व, प्रबळ दावेदार होण्यासाठी काँग्रेसमध्ये परिवर्तन आवश्यकच.

दिनांक २३ जून २०२५ लोकसत्ता अंकातील "लाल किल्ला सदरातील भाजप विरोधी अजेंड्यात रोजगार मेळावा " लेख वाचला. २०११ पासून केंद्रात, राज्याराज्यांत काँग्रेस कमकुवत होत चालली आहे. गेल्या अकरा वर्षात म्हणावी तशी सकारात्मक घटना किंवा निवडणुकीत मोठा विजय न मिळाल्यामुळे काहीशी मरगळ झाली आहे. तरीही काँग्रेसचे नेते सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडत प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्नात आहेत. राहुल यांच्या किसान पदयात्रा, भारत जोडो यात्रे नंतर आत्मविश्वास वाढेल असे वाटले होते, पणं केवळ मणिपूर मुद्दा, अडाणी, मोदाणी, संविधान बचाव, निवडणूक आयोग, काश्मीर, पाक युद्ध आरोपांच्या चक्रव्यूहाच्या नाऱ्यात अडकले. युद्ध माघारीचा मुद्दा अधिकच प्रभावी केला पाहिजे होता. भाजपच्या लोकसभेतील निसटत्या जयावर धन्यता मानून, राज्याराज्यांत पराभव पत्करावा लागला. 
.सोनियांच्या अनुपस्थितीत अध्यक्ष खरगे आणि दोन चार प्रवक्ते सोडल्यास काँग्रेसला चेहरा नाही. काँग्रेस नेत्यांचे अजूनही संस्थानिकांसारखे वागणे पक्षाच्या ऱ्हासाची मुख्य कारणे आहेत. सद्यकाळात एकही विश्वासू चेहरा काँग्रेसकडे नाही, त्यामुळे नवीन विचार , ध्येय धोरणे , संकल्पना घेऊन पुढच्या सार्वत्रिक , राज्यांच्या निवडणुकीत उतरावे लागेल. भाजपच्या यशामागे मजबूत संघटन, प्रचारतंत्र, आणि जनतेशी सतत संवाद हे प्रमुख घटक आहेत. काँग्रेसने भाजपकडून, संघटनात्मक बळकटपणा, ठोस आणि साधी संदेशवाहन पद्धत, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शक्तिशाली सर्वसमावेशक नेतृत्व, सतत संवाद आणि जनतेशी नाळ जोडणे, निवडणुकीसाठी दीर्घकालीन योजना, भावनिक कनेक्शन ठेवावे, स्वतःची वैचारिक ओळख (सेक्युलरिझम, सामाजिक न्याय, आणि समतोल विकास) अधिक ठामपणे लोकांसमोर मांडावी, प्रादेशिक नेत्यांना अधिक शक्ती द्यावी, स्थानिक विकासाला प्राधान्य, तरुणांसाठी नोकरी संधी उपलब्ध करण्याची हमी, आरोग्य आणि शिक्षणासाठी क्रांतिकारी योजना, स्त्रियांसाठी स्वतंत्र कार्यक्रम, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, इंडिया - महाविकास आघाडी मजबूत करणे, सुसंगत आणि दीर्घकालीन रणनीती आखून पक्षाला पुनरुज्जीवित करणे हाच एकमेव मार्ग आहे. तरच काँग्रेस परिपक्व, प्रबळ दावेदार होऊ शकते. दक्षिण राज्ये वगळता देशात प्रादेशिक पक्षांची दावेदारी संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे, त्याचा लाभ राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसने नक्कीच घ्यावा.

विजय आप्पा वाणी, पनवेल