Grandparents’ Day is celebrated by numerous countries on different days throughout the year. In the US, the day is marked as the first Sunday after Labor Day, which is celebrated on the first Monday of September. *This year Grandparents’ Day will be celebrated on September 11.* The day honours and celebrates the bond between grandparents and grandchildren.
*वेणू आजी*
साधारणतः १९०० व्या शतकाची सुरुवात, पूर्व खानदेशातील गिरणा काठावरील बहाळ ग्राम. या ग्रामातच अंदाजे १९१० च्या सुमारास , बेणीराम शिनकर कुटुंबातील पहिले अपत्य वेणुबाईचा जन्म झाला असावा. दोन बहिणी दोन भाऊ या परिवारात वाढलेल्या छोट्या वयातच विवाह झाला. बहिणी अनुक्रमे गुढे आणि उंबरखेड येथे तर बंधू बहाळ आणि जळगाव येथे राहिलेत.
खानदेशातीलच बोरी नदीच्या काठावरील बहादरपुर गावच्या बुधू कोनेरी माकडे यांच्या दोनच अपत्यातील धाकटे अपत्य विश्राम बाबा यांच्याशी विवाह झाला. शेतीवाडी, गुरेढोरे असलेले घर असल्याने मेहुणबाऱ्याच्या भिला बाबांचे दोन्ही घराण्याशी नाते असल्याने पुढे संबंध दृढ होत गेले. १९२६, २७ मध्ये पहिले अपत्य जगन्नाथ, दोन तीन वर्षात दुसरे अपत्य न जगण्याने, झालेले अपत्य म्हणून नाव ठेवलेले भिका, नंतर , वत्सला, इंदुमती, बबन आणि सिंधू अशी एकूण सहा अपत्य. १९४८ साली पातोंड्याच्या बारकु कुडे यांच्या घरातील वत्सला मोठी सून तर १९५२ मध्ये सोनगीरच्या चिंतामण देशमुखांची भटाबाई धाकटी सून. मुली वत्सलाबाई तामथरे येथील सिताराम राणे यांचा ज्येष्ठ मुलगा विठ्ठल, इंदुमती कजगाव येथील वामन बेणीराम येवले यांच्या ज्येष्ठ सून मुरलीधरची पत्नी,जळगाव येथील विठ्ठल येवले यांचा ज्येष्ठ तुळशीराम याची बबनताई पत्नी, आणि चिखल ओहोळ येथील नारायण फुलदेवरे यांच्या दत्तात्रेयची पत्नी सिंधूताई.
या दरम्यान बहाळ, गोंदेगाव, पोहोरे, खेडगाव, या माकडे घराण्याशी संबधित नात्यातील शिक्षणाची आवड असणारी मुले बहादरपुर येथे ११ वी पर्यंत शिक्षणाची सोय असल्याने एकत्रित कुटुंब असल्याने रहात होती. हि शिकणारी मुले अर्थात समाजातील मान्यवर झालीत हे नमूद करावेसे वाटते. संसार करतानाच, वेणु आजीची तीन वेळा चार धाम यात्रा झाली होती. असे १९६२ पर्यंत सर्वांचे विवाह करून वेणु आजींचा संसार बहादरपुर गावात सुख समृध्दीने सुरू होता. नात नातू होत होते, लग्न कार्याच्या निमित्ताने मुली माहेरी येत होत्या, सारे आनंदात सुरू होते. वेणु आजीचा धाकटा मुलगा भिकाआप्पा शिक्षणासाठी मेहुणबाऱ्याच्या जगन्नाथ आण्णांकडे चाळीसगाव येथे शिक्षणास होता. तेथील शिक्षण आटोपल्यावर पुणे येथे शिक्षण घेऊन १९५६ च्या सुमारास घाटकोपर येथे स्थायिक झाला. लग्न कार्य, यात्रा, कुलधर्म या निमित्ताने सहकुटुंब बहादरपुर येथे येणे असायचे, म्हणून वेणु आजीस चिंता नसायची.
पण सुखाला दृष्ट लागणे किंवा नियतीस सुख मान्य नसणे, याचा त्रास वेणु आजीला जाणविला. जुलै १९६६ मध्ये धाकट्या भिका आप्पांच्या पत्नीचे आकस्मिक निधन. पदरी ६ मुले असलेल्या आप्पाचे जग सुन्न जहाले. त्या काळातील दळणवळणच्या सोयीने एक दोन दिवसांनी साऱ्या नातेवाईकांना निरोप मिळाले. सारे कार्य आटोपले आणि पुढे काय ? प्रश्न साऱ्यांना पडला. तत्क्षणी कोणत्याही निर्णयाची वाट न पाहता , स्वतः वयाच्या साठीत असणाऱ्या वेणु आजीने मागचा पुढचा कोणताही विचार न करता, घाटकोपर गाठले आणि साऱ्या प्रश्नांची उत्तरे मुलाचा संसार सांभाळून दिलीत. घाटकोपर येथील राहायची जागा खूपच लहान असल्याकारणाने आणि विश्राम बाबांना मूळ गावाची ओढ, त्यामुळे त्यांनी जास्तीच गावीच राहणे केले. पण वेणु आजीस कर्तव्य निभवायचे होते, त्या कारणे, राहायची जागा, आजी आजोबांचे एकत्र राहणे , साठी नंतरचे जीवन या सर्वांवर पाणी सोडले आणि एकच तत्व बाळगून मुलाच्या संसाराची सुकाणू बनून उभी ठाकली.
आप्पाची मुले मोठी होऊ लागली, प्रसंगानुसार त्यांनाही आवरण्याची जाणीव होऊ लागली आणि आजीचा भार हलका होऊ लागला. आजी सत्तरीकडे सरकू लागली आणि आप्पांच्या दोन मुलींचे लग्न झाले. त्याच काळात आजीवर संकट कोसळले, १९७८ साली बाबांचे निधन. आजी घाटकोपर येथे आणि बाबा बहादरपुर येथे. मध्ये कधी भेट झाल्याचे स्मरत नाही, पणं बाबांच्या निधनाने आजी खचली पणं पुन्हा उभी राहून मुलासाठी उभी राहिली न राहिली तोच पुन्हा आघात झाला आजीचा मोठा आण्णा याचे अल्पशा आजाराने निधन. पुन्हा संकट, चक्र काही थांबत नव्हते , सारे दुःख गाठीशी बांधून सत्तरीतल्या आजी सावली म्हणून थांबली. आप्पांच्या कंपनी बंदचे दिवस, मुलीचे लग्न या साऱ्यात स्वतःला गुंतवून घेतले. आप्पांचे समाजकार्य, राजकीय कार्य याच काळात उभे राहिले. येणारे जाणारे कार्यकर्ते म्हणा किंवा पै पाहुणे यांचा राबता कायम घरी असायचा. त्यामुळे या वयातही जागल्याची भूमिका घेत ८० व्या वर्षापर्यंत साऱ्या मुलांचे विवाह कार्य पार पाडलेत. पणतुंचे अंगावर खेळणे सुरू झाले होते.
पण निर्वाणीचा , शांत जीवनाचा क्षण जगण्याचं भाग्य तीच्या नशीबी नव्हत, अचानक ६२ व्या वर्षीच आप्पांचा आकस्मिक मृत्यू हे अत्यंत क्लेशकारक दुःख तिच्या वाटेस आले. अनेकांच्या तोंडी तेच आधी वयवृद्ध आजीने जायला हवे होते. काय असेल तेव्हा वृध्द आजीची स्थिती. बाबां, आण्णा आणि आप्पांच्या जाण्याने स्थितप्रज्ञ झालेल्या आजीस हे सारे जाणवित असेलच ना, पणं सारे सहन करण्याची शक्ती प्राप्त असलेल्या, अनेक दुःख झेललेल्या आजीस तीचे जाणे माहिती असावे. कोणतीही कुरकुर नाही, स्वतःची री ओढणे नाही, मुलाचा संसार करून त्याच्या आयुष्यातली दरी बुजवून त्यास एक सक्षम पिता बनवून आणि मातेचे गुण सुद्धा त्याच्या अंगी भिनवून, त्याच्या मुलांची आबाळ होऊ न दिली. त्यागाचे, निस्वार्थी सेवेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वेणुआजी , जन्मदात्या मुलाला सांभाळणे आणि त्याच्या अपत्यांनाही सांभाळणे हे जगावेगळे कर्म आजीने करून ठेवले आहे. १९६६ ते १९९३ या प्रदीर्घ २७ वर्षांच्या काळात फक्त आणि फक्त एकच डोळ्यासमोर ध्येय म्हणजे मुलाचा संसार आणि नातुंचा सांभाळ. या काळात स्वतःसाठी ना कोणते धाम केले, ना कोणती यात्रा केली, ना कोठे आनंदाचे क्षण वेचले , ना मैत्रिणीसोबत फिरायला गेली, ना कोणत्या नातेवाईकांच्या गावी गेली, ना कधी डॉक्टर, वैद्य , औषधे लागलीत, ना कधी कुणाशी भांडण तंटा केला, सारेच ना, मग केले काय तर फक्त एकच कर्म, जे विधात्याने तिच्याकडून करवून घेऊन एक संस्कारक्षम पिढी निर्माण केली. १९९३ साली तिच्या जाण्याने पोकळी निर्माण न होता, एक भक्कम, भरीव असा बंध निर्माण होऊन पुढील पिढीस मार्गदर्शक ठरेल असा आदर्श निर्माण झाला.
आजच्या घडीला आपल्याला कोठेही जावे लागले तरी आपले स्वार्थ आडवे येतात, अगदी सकाळच्या विधीपासून ते झोपे पर्यंत पद्धतशीर ऐसपैस सुखाचा उपभोग घेणारे आपण, या कर्तव्यापर्यंत पोहोचू न पोहोचू हा भाग वेगळा पण या कर्तव्याची जाणीव ठेवून *या वेणु आजीच्या कार्याची दखल ११ सप्टेंबर रोजी साजरी होणाऱ्या ग्रँड पेरेंट्स डे निमित्त विनम्र आदरांजली*.
******