*आप्पा*
तसा 30 वर्षांचा कालावधी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील फार मोठ्या परिवर्तनाचा काळ. जन्मापासून ते 30 वर्षे म्हणजे संगोपन, शिक्षण, नोकरीची सुरुवात , लग्न आणि कुटुंब वृद्धीस सुरुवात असते. या 30 वर्षानंतरची म्हणजे, पूर्णता नोकरी, व्यवसाय मुलांचे शिक्षण, त्यांच्या नोकरी, व्यवसायाचे गणित, त्यांची लग्न, आणि सेवानिवृत्तीचा काळ.
याच दोन 30 वर्षांच्या परिवर्तन काळाचा आढावा आज घ्यावासा वाटतोय. पहिल्या 30 वर्षात माझ्यासाठी होते ते पितृछत्र आप्पा. पहिल्या तीन वर्षापर्यंत संगोपनाची जबाबदारी त्यांच्या अर्धांगिनी अर्थात आईकडे कडे होती, पण आईच्या अकाली निधनाने, तीन ते तीस वर्षे आप्पांनी आई आणि वडील अशा दोन्ही नात्यात गुंतून संगोपन, सांभाळ करून एका महत्त्वाच्या टप्प्यावर आणून उभे केले. शिक्षण, नोकरी, लग्न आणि नातीचा पण सांभाळ करून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील दुसरा 30 वर्षांचा कालखंड जगले.
त्यांच्या दुसर्या 30 वर्षांच्या काळात त्यांनी अनेक परिवर्तने पाहिलीत. सुखाच्या गोष्टी दूरच पण दुखा:सही हिमतीने कवटाळून सर्वावर मात करीत, सुखी राहण्याचा प्रयत्न करून खरोखरच सुखात परिवर्तन केले. एकूण सहा जणांचे संगोपन, सांभाळ, त्यांची शिक्षणे आणि त्यांची सर्वांचीच योग्य स्थळी विवाह करणे, एवढे सोपे नसणारे कार्य त्यांनी लीलया केले. या कार्यात ते एवढे गुंतून गेले होते की, संसार हाच त्यांचा परमार्थ होता. त्यासाठी त्यांना तीर्थ क्षेत्री जाण्याचा मोह झाला नसला , तरी सद्गुरू चरणी त्यांची सेवा कायम होती. श्री नवनाथ, श्री गुरू चरित्र पारायणे, नित्य पूजेचा संस्कार तर आजतागायत श्री व्यंकटेश स्तोत्र, रामरक्षा आणि श्री दत्त आरतीच्या रूपाने सुरू आहे.
संसाराच्या कार्यात झोकून दिलेला ह्या देहाने, 1957 ते 1990 अशी 33 वर्षे जगविख्यात फियाट कंपनीत सेवा केली. सेवेत सुद्धा प्रामाणिक आणि खडतर मेहनतीने स्टोअर्स इनचार्ज म्हणुन सेवानिवृत्त झाले. संसार, नोकरी या व्यतिरिक्त सामाजिक कार्यातही मुंबई विभागातून जबाबदारीने कार्य केले. पंढरपुर धर्मशाळा, शैक्षणिक ट्रस्ट या महाराष्ट्र पातळीवरील संस्थेत विश्वस्त म्हणुन कार्य केले. अनेक सामाजिक संस्थांचे उत्तरदायित्व स्विकारुन त्यांना मुंबईतून आर्थिक सहाय्य मिळवून दिले. नात्यातील, समाजातील शिक्षित तरुणांना नोकरी मिळवून देऊन त्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्था आणि लग्न करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला.
अशी अनेक कार्ये कमी म्हणुन की काय, राजकीय क्षेत्रातही आप्पा वाणी रूपाने मुंबई भाजपाच्या वर्तुळात नावारूपास आलेले व्यक्तिमत्त्व. दिवंगत खासदार जयंतीबेन मेहता , प्रमोद महाजन , राम नाईक या सर्वांसाठी आदरार्थी आप्पा होते. या व्यतिरिक्त विक्रोळी विभागातील सर्व पक्षीय, सर्व जाती धर्माच्या पुढाऱ्यांशी जवळीक होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सल्लागारही होते. त्यांच्या मृदू स्वाभाविकतेने आप्पांच्या घराशी सर्वाचेच संबंध होते. या कारणाने आप्पांच्या निधनाने संपूर्ण विक्रोळी परिसर श्रध्दांजली अर्पून बंद ठेवण्यात आला होता, एवढी लोकप्रियता आप्पांना होती.
होय, आज 3 जून, आज तीस वर्षांपूर्वी आप्पांचे निधन सर्वांच्याच हृदयाला धक्कादायक होते. सकाळी 1030 वाजता नित्यकर्म आवरून निघालेले आप्पा सर्व प्रिय जणांना भेटून एक दीड तासात घरी आले आणि आई आणि सून सुवर्णाशी छोटासा संवाद साधत असतानाच अति तीव्र हृदयातील वेदनेने निधन झाले. त्यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली पण त्यांच्या संस्कारांनी निर्माण केलेली पिढी त्यांच्या कार्यातून स्वर्गीय आप्पांची आठवण कायम ठेवत आहेत, हिच *आप्पांना आदरांजली श्रध्दांजली*.